बॉयकॉट भेदणारे ब्रम्हास्त्र!

बॉयकॉट भेदणारे ब्रम्हास्त्र!

समाज म्हणून प्रतिक्रियावादी बनणं, कुणाच्याही फायद्याचं ठरत नाही. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाचं काही ना काही मत असतंच आणि ते त्याचं वैयक्तिक मत असतं, पण सोशल मीडियाच्या काळात त्याचं हे मत वैयक्तिक राहत नाही. फेसबुक, ट्विटरवर दोन ओळीत आणि इंस्टाग्रामवर एका फोटोत ती व्यक्ती त्याचं मत लगेच सार्वजनिक करून टाकते, लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहेच, पण हे मत मांडतानादेखील त्याला काही मर्यादा असाव्यात… गेल्या काही काळात या मर्यादा मात्र कुठेच पाळल्या जात नाहीत. म्हणूनच की काय प्रत्येकाला प्रतिक्रिया देण्याची घाई झालेलीआहे, ती सवय इतकी आतवर रुजलीये की, विषय माहीत नसतानाही आपण प्रतिक्रिया नोंदवून मोकळं होतो. न्यूज चॅनलवर ज्याप्रकारे प्रत्येक विषयाची जाण असणारा एखादा व्यक्ती आपण अनेकदा पाहतो अगदी तसंच आता प्रत्येक विषयात प्रतिक्रिया देणारा व्यक्ती निर्माण करण्याचं काम या सोशल मीडियातून राबविण्यात येत असल्याचं दिसतंय.

गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर विविध प्रकारचे ट्रेंड आपण पाहिलेत आणि त्यांचा अनुभवदेखील घेतलाय. त्या ट्रेंड्सचा फटका बॉलिवूडच्या मोठ्या सिनेमाला बसला हे सत्य नाकारूनदेखील चालणार नाही. दाक्षिणात्य सिनेमांना हिंदीपट्ट्यात मिळणारा प्रतिसाद आणि बॉलिवूडमध्ये गर्दी खेचणार्‍या सिनेमाची कमतरता यामुळं हिंदी सिनेमा विश्व गेल्या काही महिन्यांपासून चिंतेत होतं. सुपरस्टार म्हणून ओळख असलेल्या अनेक अभिनेत्यांचे सिनेमे जेव्हा सपाटून आपटले. तेव्हा बॉलिवूड आता पुन्हा उभारी घेऊ शकेल काय, हा प्रश्न देखील उपस्थित राहू लागला. लाल सिंगचड्ढा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर ‘ब्रम्हास्त्र’सारखा प्रोजेक्टदेखील बॉयकॉट करण्याचा ट्रेंड याच सोशल मीडियावर राबविला गेला.

‘ब्रम्हास्त्र’ सिनेमाचं फ्लॉप होणं हे संपूर्ण बॉलिवूडसाठी मोठा फटका होऊ शकत होता, ज्याची काही मुख्य कारण आहेत, पहिलं म्हणजे या सिनेमाचं भरमसाठ बजेट, यात काम करणारे तीन आघाडीचे सुपरस्टार, मोठा दिग्दर्शक आणि सिनेमा बनविण्यासाठी लागलेला १० वर्षांचा कालावधी…पण सुदैवाने ब्रम्हास्त्र सिनेमाचे हाल लालसिंग चड्ढासारखे झाले नाही आणि रिलीजनंतर त्याला उत्तम प्रतिसाददेखील मिळतोय. ज्याप्रकारे ब्रम्हास्त्रचं अपयश बॉलिवूडसाठी धक्का होऊ शकत होतं, अगदी तसंच ब्रम्हास्त्रचं यशदेखील बॉलिवूडसाठी फायद्याचं ठरू शकतं. दाक्षिणात्य सिनेमांच वाढतं प्रस्थ आणि हिंदी सिनेमांना मिळणार्‍या प्रतिसादात झालेली घट, अशा परिस्थितीत बॉलीवूडला अशाच एका हिटची गरज होती आणि ती गरज ब्रम्हास्त्रच्या रूपानं भरून निघू शकते.

कोरोना काळानंतर बॉलिवूडमध्ये बोटावर मोजता येतील इतक्याच सिनेमांना यश मिळालं आहे, तुलनेत दाक्षिणात्य सिनेमांना हिंदी पट्ट्यात न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद मिळालाय. लॉकडाऊननंतर अनेक मोठे हिंदी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते, त्यातील अक्षयकुमार आणि रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी सिनेमाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. २०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर २५२ कोटींच्या आसपास कमाई केली होती, कोरोनानंतर तिकीटबारीवर चाललेला हा पहिलाच हिंदी सिनेमा होता. त्यानंतर दुसरा सिनेमा हिट होण्यासाठी आपल्या इंडस्ट्रीला ४ महिने वाट पाहावी लागली, कारण नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या सूर्यवंशीने पैसे कमावल्यानंतर अनेक हिंदी सिनेमे फ्लॉप ठरले, कबीर खानचा ८३ हा त्यापैकीच एक… २५ फेब्रुवारी २०२२ मध्ये संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी सिनेमा प्रदर्शित झाला, ज्याने सुरुवातीच्या दिवसात चांगली कमाई केली होती, पण तरीही ती कामे त्याचा खर्च पूर्ण करू शकली नाही. परंतु नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाने आपला सर्व खर्च वसूल तर केलाच, पण सोबतच वॉच टाईमचा नवीन विक्रमदेखील आपल्या नावावर केला होता.

मार्च महिन्यात आपल्याकडं काश्मीर फाईल्स नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला, ज्याने कमाईचे नवीन विक्रमच प्रस्थापित केले… पुन्हा ३ महिन्यांचा काळ निघून गेला आणि त्या दरम्यान साउथचे २ मोठे सिनेमे आपल्याकडं प्रदर्शित झाले, ज्यांनी हिंदी पट्ट्यात मोठी कमाई केली. २० मे २०२२ साली हिंदीत एक सिनेमा प्रदर्शित झाला, जो अनेक अर्थांनी बॉलिवूडसाठी महत्वाचा ठरला… त्याची काही कारणं होती, पहिलं यात सुपरस्टार नव्हता, याचं बजेट शेकडो कोटीत नव्हतं आणि यांनी तिकीट कमी दरात विकून केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर आपल्या सिनेमाला सुपरहिट केलं. ७५ कोटींच्या बजेटमध्ये तयार होऊन तब्बल २०० कोटींची कमाई करणारा हा सिनेमा होता. कार्तिक आर्यनचा भूल भुलैय्या २… या सिनेमाला मिळालेलं यश बघता बॉलिवूड पुन्हा भरारी घेईल, असं वाटलं होतं.. पण घडलं या उलट सम्राट पृथ्वीराज, जुगजुग जियो, शमशेरा, एक व्हिलन रिटर्न आणि आमिर खानचा लालसिंग चड्ढा असे सगळेच मोठे सिनेमे धडाधड आपटले. पुढचे ३ महिने बॉलिवूडसाठी असेच बॉयकॉटवाले गेले आणि मग ब्रम्हास्त्र प्रदर्शित झाला. ज्या सिनेमाकडून निर्माते, अभिनेते, हिंदी प्रेक्षक आणि संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला अपेक्षा होत्या.

अनेकवेळा तुम्हीही असं ऐकलं असेल की, कोरोनानंतर बॉलीवूडला आलेली मरगळ झटकण्यासाठी फक्त एकाच सुपरहिट सिनेमाची आवश्यकता आहे. आता हे वाक्य कितपत खरं? तर मला वाटतं की, एक चांगला सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच खेचून आणू शकतो. प्रेक्षक एकदा थिएटरकडे आला तर तो वारंवार येऊ शकतो, गेल्या काही महिन्यांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की, प्रेक्षकांनी थिएटरकडे पाठ फिरवलेली नाही. कारण तसं असतं तर मग साउथचे सिनेमे आपल्याकडं चालले नसते, प्रेक्षकांनी केवळ हिंदी सिनेमांकडे पाठ फिरवली होती. ब्रम्हास्त्रच्या रूपात प्रेक्षकांना एक चांगला अनुभव मिळाला आहे आणि असाच अनुभव पुन्हा घेण्यासाठी ते येणार्‍या काळात पुन्हा एकदा हिंदी सिनेमांकडे वळू शकतात. पण जो प्रेक्षक पुन्हा हिंदी सिनेमाकडे येतो आहे, त्याला कायम करण्यासाठी आता बॉलीवूडला देखील आपल्या सिनेमांमध्ये तितकीच ताकद ठेवावी लागेल.

विशेषतः या महिन्यात आणि पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार्‍या सिनेमांवर बॉलिवूडचं बरंच गणित ठरलेलं असेल, कारण या महिन्याच्या शेवटी पुन्हा एक मोठा हिंदी सिनेमा प्रदर्शित होतो आहे, ज्याच्याविरुद्ध एक मोठा दाक्षिणात्य सिनेमादेखील आहे. हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या विक्रमवेधा विरुद्ध पीएस वन सिनेमांच्या या लढाईत विजय कुणाचा होईल, यावर खूप काही अवलंबलेलं आहे. म्हणून ब्रम्हास्त्र सिनेमाला आजवर मिळालेला आणि यापुढे मिळणारा प्रतिसाद फक्त त्या सिनेमाच्या निर्माते आणि अभिनेत्यांसाठी नाही तर संपूर्ण बॉलिवूडसाठी महत्वाचा आहे. सध्या तर ब्रम्हास्त्रची बॉक्स ऑफिसवर चांगली घोडदौड सुरु आहे, पहिल्या आठवड्यात २०० कोटींचा टप्पा गाठणारा हा सिनेमा, आता आपलं ४०० कोटींचं बजेट वसूल करतो की, त्याहून ही अधिकची कमाई करतो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.

First Published on: September 18, 2022 5:30 AM
Exit mobile version