फलज्योतिषाचा फुसका बार!

फलज्योतिषाचा फुसका बार!

दिवस उन्हाळ्याचे होते. वेळ भर दुपारची. परिचयातील एक मध्यमवयीन गृहस्थ कार्यकर्त्याच्या घरात प्रवेश करते झाले. घामाघूम झालेले होते. नेहमीच हसतमुख असणारी ही व्यक्ती आज फारच अस्वस्थ असल्याचे कार्यकर्त्याला लगेच जाणवले. बसायला खुर्ची दिली. माठातलं पेलाभर थंडगार पाणी दिलं. पण ते फक्त अर्धाच ग्लास पाणी प्यायले. खरं तर त्यांनी अजून एक पेला पाणी कार्यकर्त्याकडे मागायला होते. कारण अतिशय तीव्र उन्हातून ते आले होते. ते इतके अस्थिर, अस्वस्थ होते की, तहान लागली आहे, याची ही आठवण त्यांना आहे की नाही, असे दिसत होते. सहज बोलावे म्हणून कार्यकर्त्याने कुटुंब, व्यवसाय, आरोग्य यांची विचारपूस सुरू केली. जमेल तेवढे ते गृहस्थ बोलत होते, सांगत होते. त्यांचे मन मात्र स्थिर नसल्याचे जाणवत होते.

‘अचानक एवढ्या उन्हात आपण आलात. मला निरोप दिला असता तर मीच आपल्याकडे आलो असतो’, असे कार्यकर्त्याने आपुलकीने सांगितले. खरं तर, ह्या गृहस्थाचे व्यक्तिमत्त्वही उमदे आहे. तसे ते नेहमी हसतमुख, प्रसन्न असतात. मात्र आज ही व्यक्ती काहीतरी गंभीर अडचणीत असल्याचे कार्यकर्त्याला जाणवले. म्हणून कार्यकर्त्याने थेट प्रश्न केला. ‘आपण आज फारंच थकल्यासारखे जाणवता, तब्येत बरी नाही का? काही गंभीर समस्या आहे का?

तेव्हा त्यांचा बांध फुटला. त्यांचे डोळे भरून आले. त्यांच्या तोंडातून शब्दही फुटेना. ह्या घडीला त्यांना पूर्णपणे मोकळे होऊ देणं आवश्यक आहे, असं कार्यकर्त्याने ओळखलं. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून,कार्यकर्त्याने त्यांना आश्वासक धीर दिला. शांत केलं. थोड्यावेळाने ते शांत झाले.

मग ते सावरले. त्यांना एक मुलगा आहे. दोन वर्षांपूर्वी औषध निर्मिती शास्रात तो पदवीधर झाला आहे. त्यांची घरची आर्थिक परिस्थितीही चांगली आहे, हेही कार्यकर्त्याला माहीत होते. ‘काहीही समस्या असू द्या, आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न जरुर करु, जे काही घडले असेल ते मनमोकळेपणाने सांगा. आपण त्याच्यावर नक्कीच मार्ग शोधू. त्यामुळे तुमच्या मनाचा ताण हलका होईल,’ असं कार्यकर्त्याने समजावणीच्या स्वरात सदगृहस्थाला सांगितलं. त्यांना खूप बरं वाटल्याचे जाणवले. त्यांनी घडलेली हकीकत, जमेल तेवढी वस्तुनिष्ठपणे सांगण्यास सुरुवात केली.

‘मला एकुलता एक मुलगा आहे, हे तुम्हाला माहीतच आहे, दोन वर्षांपूर्वी तो औषध निर्मिती शास्राचा पदवीधर झाला. सर्व सोयींनीयुक्त असं औषध विक्रीचे दुकान शहरातील एका मोठ्या दवाखान्याला लागूनच त्याच्यासाठी टाकून दिलं आहे. त्याचा व्यवसाय अगदी छानपणे चालू आहे. त्याचं लग्न करावयास हवं, असं आम्ही पतीपत्नीनं ठरवलं. नात्यातील अनेक स्थळं येऊ लागली, पण मुलगा त्याबद्दल स्पष्टपणे होकार किंवा नकार सांगेना. तो असं का वागतो, म्हणून त्याला आम्ही विचारलं. तेव्हा त्याने थोडंसं गंभीर होऊन सांगितलं की, मागील सात-आठ वर्षांपासून त्याचे एका मुलीवर प्रेम आहे. तिच्याशी तो विवाह करू इच्छितो. हे ऐकून माझ्यापेक्षा माझ्या पत्नीला या गोष्टीचा भयंकर राग आल्याचे जाणवले. पण पुत्रप्रेमामुळे ती लगेच राग व्यक्त करू शकली नाही. आपल्या समाजात असं प्रेम करून, लग्न केलेलं खपत नाही. समाजाला, नातेवाईकांना ते चालत नाही. जर हे लग्न केलं तर, आपल्या कुटुंबाशी ते सर्वजण संबंध तोडतील. तेव्हा मुलाने सांगितले की, सदर मुलगी ही आपल्याच जातीची असून, ती आपल्याच लांबच्या नात्यातीलसुद्धा आहे. हे ऐकून मला ठीक वाटलं.

पण पत्नी तयार होईना. माझ्या आणि तिच्या आई-वडिलांना, भावा-बहिणींना हे पटणार नाही. ते लग्नाला येणार नाहीत. लग्न करताना त्यांना विचारायला हवं. त्यांचा सल्ला घ्यायला हवा. त्यांनी सुचवलेली, दाखवलेली स्थळंच आपण अगोदर बघायला हवीत आणि शक्य तर त्यातूनच आपण मुलगी पसंत करायला हवी, असं माझ्या पत्नीचं म्हणणं होतं. आणि ते तिनं आमच्या मुलाला स्पष्टपणे सांगितले. त्यावर मुलगा म्हणाला की, ज्या मुलीशी मी लग्न करू इच्छितो, तिचंही माझ्यावर प्रेम आहे. ती उच्चशिक्षित आहे. तुम्हा दोघांनांही आवडेल एवढी सुंदर, सुस्वरूप आहे. तुम्ही एकदा तिला आणि तिच्या आईवडिलांना भेटून चर्चा करा, माहिती घ्या. जर तुम्हाला काही वावगं वाटलं तर, मी त्याबाबत पूर्ण माहिती घेईन. मात्र माझं लग्न, मी आणि माझ्या आई-वडिलांशिवाय इतर कोणत्याही एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार अपरिचित मुलीशी ठरवणे, ही बाब मला योग्य वाटत नाही. ज्या मुलीवर माझं प्रेम आहे, तिच्या आवडी-निवडी,सवयी, एकूणच समजदारपणा, शिक्षण अशा आवश्यक गोष्टींची पडताळणी मी स्वतः केलेली आहे. तिनेही मला वारंवार पडताळले आहे. तुम्ही एकदा तिच्याशी आणि तिच्या आई-वडिलांशी बोलावं. असं माझा मुलगा म्हणाला.

मी पत्नीला समजावलं. पण जवळच्या नातेवाईकांच्या रोषाचं भूत तिच्या मानगुटीवरून उतरायला तयार नव्हतं. मात्र, आपल्याला एकुलता एक मुलगा आहे, त्याचं सुख ते आपलं सुख. नातेवाईकांचं आपण बघून घेऊ. एकदाचं लग्न झालं की पुढील काही महिन्यात,वर्षात सर्व ठीक होईल. अनेकांचं येणं जाणं सुरू होईल. जगात आता असं अनेक ठिकाणी घडू लागलेलं आहे. असं बरंच काही मी पत्नीला समजावून सांगितलं. मुलीच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी,आपण स्वतः पुढाकार घेऊन विवाह सोहळा धुमधडाक्यात करू, असेही मी म्हणालो. तेव्हा पत्नी काहीशी अनुकूल झाली.

मुलाचे लग्न करण्यापूर्वी, मुला-मुलीची जन्मकुंडली,नाडी, गुणमिलन, पत्रिका, लग्न योग, मुहूर्त अशा फलज्योतिषाशी संबंधित गोष्टी चांगल्या फलज्योतिषाकडून तपासू. म्हणजे काही अडचणी येणार नाहीत, असा आग्रह माझ्या पत्नीने धरला. तिच्या मनावरचा हा परंपरेचा पगडा हटायला तयार नव्हता. खरं तर, माझाही अशा गोष्टींवर थोडाफार विश्वास आहे. म्हणून आम्ही दोघं एका प्रसिद्ध फलज्योतिषाकडे गेलो. वरीलप्रमाणे सर्व माहिती त्यांना आम्ही सांगितली. ‘काहीही झालं तरी मुलगा त्याच मुलीशी लग्न करू इच्छितो. त्याच्या सुखासाठी आम्हीही ह्या लग्नासाठी तयार आहोत. मुलगी उच्चशिक्षित, सुंदर आहे. आम्हालाही आवडली आहे.

त्यांचे पुढील आयुष्य सुखासमाधानाचे जाण्याबाबत, फलज्योतिष जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत,’ असे आम्ही त्यांना सांगितले. त्यांनी काही जीर्ण पोथ्या, पुस्तकं चाळली. कागदावर आकडेमोड केली आणि अगदी काळजीच्या स्वरात सांगितले की, तुमचं म्हणणं जरी सर्व खरं असलं तरी, या दोघांच्या विवाहात मोठ्या अडचणी दिसत आहेत. काहीतरी अनिष्ट आणि भयंकर घडेल, असं दिसतं आहे. शिवाय त्यांची गुणपत्रिकाही जुळत नाही. मुलीला तर तीव्र मंगळदोष आहे. इतर ग्रहमानही फारसे अनुकूल नाहीत. एकनाड आहे. शिवाय मृत्यूषडाष्टक योग आहे. म्हणून हे लग्न झाले तर, पुढील सहा महिन्यात वराकडील कुटुंबात मोठे अरिष्ट घडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून हा संबंध टाळलेला बरा !

हे ऐकल्यावर आम्ही दोघं जाम हादरलो. आमच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. माझ्या मुलाचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेला. आता काय करावे ?

मात्र लगेच फलज्योतिष बुवा म्हणाले. ‘पण यावर तोडगा निघू शकतो. तुमची इच्छा असेल तर, तो करून पाहायला हरकत नाही. काही असंतुष्ट ग्रहांची शांती, होम-हवन, यज्ञ, विधी असे काही केले तर ग्रह अनुकूल होऊ शकतात.’ असे त्यांनी सांगितल्यावर आमच्या दोघांचा जीव भांड्यात पडला. या सर्व कर्मकांडाचा खर्च जवळपास एक लाख रुपये येऊ शकतो, असे फलज्योतिषी म्हणाले. मुलांच्या सुखापुढे एक लाख रुपये आम्हाला विशेष काही खर्च वाटला नाही. म्हणून आम्ही लगेच तयार झालो. मुलाला आम्ही यातल्या बर्‍याच गोष्टी सांगितल्याच नाहीत.

सलग तीन दिवस आमच्या बंगल्यात पूजापाठ, मंत्रघोष, होमहवन झाले. शेवटच्या दिवशी जाता जाता फलज्योतिषी म्हणाले की, ‘माझे प्रयत्न मी केले. पण तरीही नशिबाच्या पुढे कोणाचे काही चालते का? पुन्हा एकदा त्या दोघांची ग्रह स्थिती बदलली की नाही, ते मला पाहावे लागेल. अडथळे दूर करण्यासाठी, अजूनही काही विधी करावे लागले तर, ते करावे लागतील. त्यानंतरच मग विवाहाबद्दल तुम्हाला काय तो निर्णय घेता येईल.’ एवढे बोलून ते निघून गेले.

हे ऐकून माझ्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले. ती अत्यंत निराश झाली. तिची अन्न-पाण्यावरची वासनाच उडाली. मागील तीन दिवस झाले, ती झोपून आहे. आमच्याशी काहीही बोलत नाही. मुलाचे लग्न ठरवण्यासाठी आणि यथासांग पार पाडण्यासाठी आम्ही जवळच्या नातेवाईकांचे काही ऐकत नाही, त्यांच्या सल्ल्यानुसार काही करीत नाही, शिवाय प्रेमप्रकरणातून विवाह होणार असल्याची कुणकुण अनेकांना लागल्याने जवळच्या मित्रांचे, नातेवाईकांचे आमच्याकडे येणे-जाणे जवळपास पूर्णपणे थांबले आहे. लोक परस्पर हळूहळू काहीबाही बोलू लागले आहेत. आमच्याबद्दल अफवा पसरवित आहेत. त्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबालाच निराशेने व्यापले आहे. कुटुंबांत फार मोठा ताण-तणाव निर्माण झाला आहे. म्हणून तुम्ही तरी यातून काही मार्ग काढाल, ह्या मोठ्या आशेने तुमच्याकडे आलो आहे ’. एवढे सारे या गृहस्थाने अत्यंत विश्वासाने,आपुलकीने कार्यकर्त्याला सांगितले.

हे सर्व ऐकून कार्यकर्त्याला संबंधित फलज्योतिषाचा अतिशय राग आला, त्याचा संताप झाला. पण संताप व्यक्त करण्याची ही वेळ नव्हती. शिवाय असे नाजूक, भावनेशी निगडित प्रश्न अतिशय संवेदनशीलपणे हाताळावे लागतात. त्या पीडित व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वतः आहोत, असे समजून,अतिशय शांत डोक्याने, विचारपूर्वक सोडवावे लागतात.

‘हा विवाह झाला तर फार मोठे संकट, अरिष्ट कुटुंबावर कोसळेल, असे संबंधित फलज्योतिषाने आपणास तोंडी सांगितले की, लेखी स्वरूपात दिले,’ अशी विचारणा कार्यकर्त्याने सदर गृहस्थाला केली. ‘जन्मकुंडली, कर्मकांडासाठी लागणार्‍या साहित्याची यादी आणि इतर आकडेमोड अशा काही बाबीच फक्त फलज्योतिषांनी कागदावर लिहून दिल्याचे ते म्हणाले. मात्र,‘विवाह केल्यानंतर पुढील सहा महिन्यात वराकडील कुटुंबावर मोठे अरिष्ट कोसळेल, असे लेखी स्वरूपात मात्र फलज्योतिषांनी काहीही लिहून दिलेले नाही. त्यांनी तसे फक्त तोंडीच सांगितले आहे,’ असे ते म्हणाले. ‘संबंधित फलज्योतिषांशी मी बोलू शकतो का,’ असे कार्यकर्त्याने गृहस्थाला विचारले. सुरुवातीला त्यांनी आढेवेढे घेतले. ‘आमचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे, तुम्ही अंनिसचे कार्यकर्ते आहात, हे जर तुमच्या बोलण्यातून आले तर, ते आम्हालाच रागवतील. त्यातून जर त्यांनी आणखी काही उलटसुलट मंत्र- तंत्र, विधी केले तर आम्हाला पुन्हा त्रास होईल. आमची मोठी पंचाईत होईल,’ अशी भीती त्यांनी बोलून दाखवली.

‘मी कोण आहे, हे मी त्यांना सांगणार नाही. फक्त विवाहानंतर कुटुंबात कोणते अरिष्ट घडणार आहे , ते कशाच्या आधारे ते सांगत आहेत आणि तसे खात्रीने घडणारच आहे तर, तसे लेखी स्वरुपात त्यांनी द्यावे, एवढेच मी त्यांना बोलतो,’ असे कार्यकर्ता म्हणाला. एवढं बोलू द्यायला गृहस्थ तयार झाले. लगेच फलज्योतिषांना त्यांनीच फोन केला.

त्यांच्यासमोरच कार्यकर्त्याचे संबंधित फलज्योतिषांशी बोलणे सुरू झाले. ह्या प्रकरणातील विवाहाबाबतचे सर्व धोके फलज्योतिषांनी कार्यकर्त्याला कथन केले. तेव्हा, ‘ते सर्व एका कागदावर आम्हाला लिहून द्या,’ असा कार्यकर्ता म्हणाला. मग मात्र फलज्योतिषांनी घुमजाव केले. परिस्थिती ओळखून,थोडे सावधगिरीने त्यांनी बोलायला सुरुवात केली.

‘तुम्ही कोण, तुमचा आणि त्यांचा काय संबंध, फलज्योतिषाबाबत तुम्हाला काही माहिती आहे,काही अभ्यास केला आहे का, काही माहिती नाही, अभ्यास केला नाही तर मग कशाला बोलता, कित्येक वर्षे आम्ही लोकांची सेवा करतो, तो काय मूर्खपणा आहे काय, आमच्याकडे या, म्हणून आम्ही लोकांना बोलवायला जातो काय, फलज्योतिषशास्रावर तुमचा विश्वास दिसत नाही, श्रद्धा दिसत नाही, मग त्यातलं तुम्हाला काय कळणार, गप्प बस्सा’, असं बरंच काही तावातावाने बोलून, फलज्योतिष बुवांनी फोन बंद केला.

समोरच्या खुर्चीत बसलेले सद्गृहस्थ हे सर्व ऐकत होते. कार्यकर्त्याने अतिशय शांतपणे विचारलेल्या सरळसरळ प्रश्नांची रितसर उत्तरे देण्याऐवजी, फलज्योतिषी बुवा भयंकर चिडले होते. संतापले होते.

होऊ घातलेला विवाह झाल्यावर, सहा महिन्यानंतरच्या संकटाचे भविष्य वर्तवण्यात माहीर असलेल्या फलज्योतिषी बुवांना, फोन करून कुणी तरी प्रश्न विचारून,त्यांची पोलखोल करणार आहे, हे अगोदरच का समजले नाही, त्यांच्या स्वतःच्या भविष्यात पुढील काही मिनिटात काय घडणार, हेही जर ज्यांना माहीत नाही,तर ते तुमच्या कुटुंबांवर सहा महिन्यानंतर येणारे संकट कसे काय सांगू शकतात, कुटुबियांवर अरिष्ट कोसळण्याची फलज्योतिषांना एवढी खात्री आहे तर, मग ते ठामपणे लिहून का देत नाहीत, औषधांच्या बाहेरील आवरणावर उत्पादनाचा आणि वापराचा अंतिम दिनांक लिहिलेला असतो. कारण ते प्रमाणित करून, खात्री केलेली असते. हे आपण जाणतोच. अशा अनेक वस्तुनिष्ठ, खात्रीशीर बाबींची अतिशय आपुलकीने चर्चा करून, पीडित गृहस्थाचा खचलेला आत्मविश्वास सावरण्याचा प्रयत्न केला.

सामाजिक व्यवस्थेत दैनंदिन जीवन जगत असताना मानवी मनाच्या, विचारांच्या, वर्तनाच्या मर्यादा उदाहरणांसह स्पष्ट केल्या. काळजी घेतली तर काळजी करण्याचे प्रसंग उद्भवत नाहीत. कोट्यवधी किलोमीटर अंतरावरील निर्जीव ग्रहगोल, तारे पृथ्वीवरील एखाद्या सजीव व्यक्तीच्या आयुष्यात अनिष्टता निर्माण करतात, ही कल्पनाच मुळात अर्थहीन असल्याचे त्यांना सांगितले. फलज्योतिषाने कार्यकर्त्याशी केलेल्या संवादात किती संदिग्धता, संताप, अशास्रीयता मोघमपणा होता, हेही स्पष्ट केले. तुमच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या सामर्थ्यावर आणि कर्तृत्वावर तुम्ही विश्वास ठेवला तर हळूहळू सर्व सुरळीत होईल. फलज्योतिषाचे अशास्रीय आणि जीवघेणे लटांबर बाळगल्याने ही क्लेशकारक परिस्थिती उद्भवली. हे लक्षात घेतले पाहिजे,असेही सांगितले. फलज्योतिषाच्या मागे लागल्यामुळे माणूस दैववादी होतो. त्यातून प्रयत्नवाद पंगू होतो. मग कोणतेही परिवर्तन, बदल करणे व्यक्तीला,कुटुंबाला अशक्य होते.

म्हणून तुम्ही सर्वांना सोबत घेऊन, तुमच्या मुलाचे लग्न लवकर आणि आनंदात करा. काहीही वाईट घडणार नाही, याची खात्री बाळगा. यानंतरही जर तुम्हाला याबाबत काही अडचण,शंका वाटली तर, तुमच्या कुटुंबाशी, नातेवाईकांशी चर्चा करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते केव्हाही तुमच्या सोबत येऊ. पण तुम्ही होऊ घातलेला विवाह लगेच घडवून आणा. आमच्या सदिच्छा तुमच्यासोबत आहेतच.’

असं सांगितल्यावर, पीडित गृहस्थाच्या मनात एक जबरदस्त आत्मविश्वास निर्माण झाल्याचे त्यांच्या चेहर्‍यावर जाणवले.

‘कार्यकर्त्यांसह तुम्ही विवाहाला या, मी लवकरच कळवतो,’ असं म्हणून ते अतिशय उत्साहाने घराबाहेर पडले. त्यांनी कळविलेल्या दिवशी कार्यकर्ता विवाहात हजर झाला. गृहस्थाची भेट घेतली. ते आनंदात दिसले. त्यांच्या पत्नीशीही कार्यकर्ता बोलला. बोलताना, गृहस्थाच्या पत्नीच्या मनात, एका कोपर्‍यात काळजीचा किरण असल्याचे जाणवत होते. वधू-वर मात्र जाम खूश होते. सर्वत्र आनंदीआनंद होता. विवाहाला सहा महिने झाल्यावर, जाणिवपूर्वक त्या सद्गृहस्थाची भेट घेतली. विचारपूस केली. सहा महिन्यानंतर कुटुंबात काही तरी अरिष्ट घडणार, असे फलज्योतिषी बुवाने सहा महिन्यांपूर्वी सांगितले होते, याची त्यांना आठवण करून द्यावी लागली. तेव्हा ते जोरात हसले. हसता हसताच त्यांनी सांगितले की, पुढील सहा महिन्यानंतर ते आजीआजोबा होणार आहेत. त्यांनतर तब्बल दोन वर्षांनी भेट झाली तेव्हा, त्यांच्या कडेवर दीड वर्षाची गोंडस नात होती. खूप आनंद वाटला.

कार्यकर्त्याच्या मनात क्षणभर विचार आला की, त्या सद्गृहस्थाला सांगावे, ह्या सुंदर, गोंडस नातीला सोबत घेऊन, संबंधित फलज्योतिषाकडे जा. त्यांना नात दाखवा आणि विचारा की, त्यांच्या सल्ल्यानुसार जर निर्णय घेतला असता तर, कदाचित सर्व कुंटुंबियांचा जीव धोक्यात आला असता. मग अशी सुंदर, गोंडस नात पाहणे तर दूरच राहिले असते. पण….कार्यकर्त्याने हा सूडभावनेचा विचार लगेच सोडून दिला. कारण, ही संघटनेची कार्यपद्धती नाही. हे त्याला पक्के ठाऊक होते. लोकप्रबोधन करणं, संवेदनशील आणि संवादीत राहणंं, हेच कार्यकर्त्यांचे प्राधान्याने करावयाचे काम आहे…तेच त्यांनी न थकता,निराश न होता शांत राहून, सातत्याने करीत राहिले पाहिजे…

First Published on: September 12, 2021 5:00 AM
Exit mobile version