एक सर्वांगसुंदर कलाकृती ‘महाराष्ट्र शाहीर’

एक सर्वांगसुंदर कलाकृती ‘महाराष्ट्र शाहीर’

— आशिष निनगुरकर

‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट केवळ शाहीर साबळे यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य याबद्दलच भाष्य करीत नाही, तर एकंदरच महाराष्ट्राला आकार देण्यासाठी ज्या ज्या थोर लोकांचे योगदान लाभले त्यांना हा चित्रपट म्हणजे मानवंदना आहे. चित्रपट जरी शाहीर साबळे यांच्यावर बेतलेला असला तरी तो त्यांच्याबरोबरच या अखंड महाराष्ट्राचा प्रवास आपल्यासमोर उलगडतो अन् ‘महाराष्ट्र शाहीर’ या नावाला योग्य न्यायदेखील देतो. चित्रपटाचा पूर्वार्ध हा शाहीर साबळे यांचं बालपण, तरुणपण आपल्यासमोर सादर करतो. अर्थात हा पूर्वार्ध काहीसा खेचलेला आणि काही ठिकाणी विनाकारण विनोदी झाल्यासारखा वाटतो खरा, पण त्या सीन्सकडे दुर्लक्ष केलं तर काही सीन्स अक्षरशः तुम्हाला चांगलेच लक्षात राहतात आणि मनावर कायमची छाप सोडतात.

शाहीर यांची घरची परिस्थिती, त्यांची गाण्याची आवड, वडिलांमुळे लाभलेला गाण्याचा वारसा, चूल आणि मूल या नेहमीच्या जीवनगाड्यात अडकलेली त्यांची आई या सगळ्या गोष्टी फार प्रभावीपणे मांडल्या आहेत. शिवाय साने गुरुजी यांचा शाहीर साबळे यांना लाभलेला सहवास हा अगदी आटोपशीर घेतला आहे. शाहीर यांचं तरुणपण दाखवताना काही ठिकाणी दिग्दर्शकाने घेतलेली लिबर्टी ही थोडीफार खटकते पण ती तेवढ्यापुरतीच. शिवाय भानुमती आणि शाहीर यांच्यातील काही प्रसंग रंगवताना ते थोडे बालिश वाटतात, पण त्यानंतर शाहीर यांचं मुंबईला जाणं आणि मग साने गुरुजींच्या सान्निध्यात आल्यावर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात संगीताच्या माध्यमातून सहभागी होणं हे सगळं अगदी हुबेहूब पडद्यावर मांडलं आहे.

सिनेमाची कथा सुरू होते जागतिक शांतता परिषदेपासून. तिथे भारताची आणि महाराष्ट्राची महती सांगायला शाहीर साबळे आलेले असतात. ‘महाराष्ट्र धर्म बहुगुणी’ गात शाहीर साबळे सर्वांना मंत्रमुग्ध करतात. पुढे मुलाखतीच्या माध्यमातून शाहीर साबळे त्यांच्या आयुष्याची कहाणी उलगडतात. आईपासून लपत गात असलेलं गाणं, पुढे आजीचा धाक, नंतर मुंबईत गिरणी कामगार म्हणून झालेली ओढाताण, अशातच भानुमतीचं आयुष्यात येणं, स्वातंत्र्य चळवळ ते ‘महाराष्ट्राची लोकधारा’ अशा अनेक गोष्टींना सिनेमा स्पर्श करतो. साने गुरुजी ज्याप्रमाणे म्हणतात की, संगीत हा शाहीर यांचा श्वास आहे, तसंच या चित्रपटाचा उत्तरार्ध हा त्याचा श्वास आहे आणि या उत्तरार्धात प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात दिग्दर्शकाला यश मिळालं आहे. पूर्वार्धापेक्षा उत्तरार्ध पाहताना खास केदार शिंदे टचची प्रकर्षाने जाणीव होते.

शाहीर यांना मिळणारी लोकप्रियता, यामुळे दुरावलेली त्यांची पत्नी भानुमती, त्यानंतर एक शाहीर म्हणून त्यांचा प्रवास, जनजागृतीसाठी त्यांनी केलेलं कार्य, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचं योगदान, वेगवेगळी नाटकं, राजकीय नेत्यांबरोबरचे त्यांचे संबंध ते महाराष्ट्राची लोकधारापर्यंतचा शाहीर साबळे यांचा प्रवास अगदी समर्पकपणे केदार शिंदे यांनी मांडला आहे. जेव्हा भानुमती शाहीर यांना सोडून जातात तेव्हाचा सीन तर अगदी तुमच्या डोळ्यांत पाणी आणतो. याबरोबरच शाहीर साबळे आणि तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अन् बाळासाहेब ठाकरे यांच्यातील प्रसंग आणि ‘आंधळं दळतंय’ या नाटकामुळे मुंबईतील बिघडलेले वातावरण हे सगळं आपल्यासमोर फार उत्तमरित्या सादर करण्यात आलं आहे. अर्थात जर पूर्वार्धात काही गोष्टी टाळल्या असत्या तर या सगळ्या गोष्टी आणखी खुलवून आणि विस्तृतपणे उत्तरार्धात मांडता आल्या असत्या पण असो, त्या गोष्टी तुमच्यावर प्रभाव पाडतात हे नक्की.

शाहीर साबळे यांनी लोकधाराच्या माध्यमातून अनेक कलाकार घडवले. शाहीर हे असं नाव होतं ज्यांचा शासन दरबारीही आदब होता, पण ज्या कलेमुळे शाहीर प्रसिद्ध झाले त्याच कलेला त्यांच्या घरच्यांनी कसून विरोध केला. अगदी त्यांनी गाणं सोडावं म्हणून नाना प्रयत्न केले, पण ऐकतील ते शाहीर कसले. त्यांनी अनेक शिक्षा भोगल्या, पण शाहिरी सोडली नाही. कलाकार म्हणून घडत असताना त्यांचा हा प्रवास मात्र मुळीच सोपा नव्हता. अगदी घरातूनच त्यांना गाण्याला विरोध पत्करावा लागला. शाहीर साबळे यांची लेक वसुंधरा साबळे यांनी या चित्रपटाचे कथानक लिहिले आहे. त्यामुळे बाबांच्या खडतर प्रवासाच्या त्या साक्षीदार आहेत. शाहिरांच्या बालपणीपासूनचा किस्सा या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. शाहिरांच्या आजीच्या भूमिकेत अभिनेत्री निर्मिती सावंत झळकणार आहेत. निर्मिती सावंत या चित्रपटात विरोधी भूमिकेत पाहायला मिळतील. शाहीर यांना गाणं सोडावं म्हणून तापलेल्या तव्यावरही उभं करण्यात आलं होतं, पण तरी त्यांनी गाणं सोडलं नाही.

शाहीर यांनी ‘मोबाईल थिएटर’ सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ अन् त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक समस्या आणि त्यात होरपळून निघणारं त्यांचं कुटुंब हेदेखील फार प्रभावीरित्या चित्रपटात मांडलं आहे. खासकरून यावेळी अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘पाऊल थकलं नाही’ हे गाणं पाहताना अंगावर काटा नक्की येईल. खरंतर संगीत हा या चित्रपटाचा आत्मा आहे अन् ती धुरा अजय-अतुल यांच्या खांद्यावर आहे आणि त्यांनी यातील गाण्यांना योग्य तो न्याय दिला आहे. काही गाणी पुन्हा रिक्रिएट करण्यात आली असून काही नवीन गाणीही यात आहेत आणि त्यातलं नावीन्य हे आपल्याला खूप भावतं. खूप दिवसांनी अजय-अतुल या जोडीकडून काहीतरी फ्रेश ऐकायला मिळालं याचा आनंद आहे.

याबरोबरच वासुदेव राणे यांच्या सिनेमॅटोग्राफीने वेगळीच जान आणली आहे. वसुंधरा साबळे, ओंकार दत्त आणि प्रतिमा कुलकर्णी यांची पटकथा आणि संवाद लाजवाबच आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे पूर्वार्धातील काही सीन्स सोडले तर पटकथा अगदी उत्तम बांधली आहे. अंकुश चौधरीने शाहीर साबळेंची भूमिका प्रामाणिकपणे साकारली आहे. अंकुश शाहिरांच्या देहबोलीला शोभत नसला तरीही त्याने समरसून भूमिका साकारली आहे. विशेषतः शाहिरांच्या उतारवयातील काळ अंकुशने सुंदर दाखवलाय. अंकुशला साथ मिळाली ती सना शिंदेची. सनाने भानुमतीच्या भूमिकेत सुंदर अभिनय केलाय. पहिलाच सिनेमा असला तरीही सनामध्ये आत्मविश्वास दिसतो.

सनाने संवादफेकीवर थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं असं राहून राहून वाटतं. शाहीर आणि भानुमती यांच्यातला रोमान्स पडद्यावर पाहणं गोड आहे. अश्विनी महांगडेसुद्धा राधाबाईंच्या भूमिकेत छान शोभली आहे. इतर सगळ्यांची कामं अप्रतिम झाली आहेत. कधी कधी हुबेहूब दिसण्यापेक्षा ते पात्रं योग्यरित्या सादर करणं महत्त्वाचं असतं, जे अंकुश चौधरीने करून दाखवलं आहे. खासकरून चित्रपटाच्या शेवटी शाहीर जेव्हा फ्लॅशबॅकमध्ये हा प्रवास उलगडताना कॅमेर्‍यात बघून प्रेक्षकांशी संवाद साधतात तो सीन आणि त्यानंतर येणारं महाराष्ट्र गीत पाहून एक प्रेक्षक म्हणून तुम्ही संतुष्ट होता. बायोपिक जरी असला तरी कथा, पटकथेच्या बाबतीत कुठेही तडजोड न करता एक उत्तम कलाकृती केदार शिंदे यांनी सादर केली आहे.

चित्रपटाच्या शेवटी ‘महाराष्ट्र गीत’ दाखवण्यात आलं आहे. त्यात एक सरप्राईज आहे, ते मात्र तुम्हाला चित्रपट बघूनच कळेल. केदार शिंदेंचा नवा चित्रपट, शाहीर कृष्णराव गणपतराव साबळेंबद्दलची उत्सुकता, अंकुश चौधरी शाहिरांची भूमिका चांगली वठवेल का, अजय-अतुल यावेळी संगीतात काय धमाल करतात हे सगळे प्रश्न ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मनात गर्दी करीत होते. चित्रपटाची लांबी अडीच तासांची. त्यामुळे हा चित्रपट खेचलेला वाटेल की शाहिरांसाठी अडीच तास कमी पडतील अशी धाकधूक मनात होतीच, पण चित्रपट बघितल्यानंतर मनात संमिश्र भाव उमटले.

चित्रपटाचा पूर्वार्ध खूप खेचलेला वाटला, तर उत्तरार्ध संपू नये असं वाटत होतं. चित्रपट चांगला की वाईट यापेक्षा शाहिरांवर चित्रपट आला हे खूप महत्त्वाचं आहे. अडीच तासांत शाहिरांना समजून घेणं अशक्य गोष्ट आहे, पण शाहीर साबळे कोण होते, त्यांनी देशासाठी, महाराष्ट्रासाठी काय केलंय हे जाणून घेण्यासाठी, अंकुश चौधरीच्या अभिनयासाठी आणि शाहिरांचा जुना काळ पुन्हा अनुभवण्यासाठी ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा एकदा पाहायला हरकत नाही.

–(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)

First Published on: April 30, 2023 3:45 AM
Exit mobile version