तंत्र गेलं तेल लावत!

तंत्र गेलं तेल लावत!

खूप काही हातून निसटून गेल्याची जाणीव आता होऊ लागली आहे. गेली सतरा वर्षे शिक्षक म्हणून वावरत असताना ह्या तरुण मुलांच्या दोन वर्षांचा आपण कळत नकळत भाग होऊन गेलेलो असतो. आता जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा गेल्या काही वर्षातले अनेक प्रसंग आठवतात. काही कटू गोड आठवणींना उजाळा मिळतो. त्यादिवशी संध्याकाळी नेहमीसारखा मैदानात चालत असताना कोणी ना कोणी भेटते. त्यादिवशी एक जुना विद्यार्थी भेटला. त्याने आजूबाजूच्या चार माणसांना ऐकू जाईल एवढ्या मंजुळ आवाजात काय सर्र. कशे आहात?….सर्र पैल अबिनंदन तुमचं. तुमाला कुठला तरी पुरस्कार भेटला ना!. त्याच्या ह्या बोलण्याने मैदानातल्या इतर चार डोक्यांनादेखील कळल की, मी शिक्षण क्षेत्रात आहे. त्यात हा पुरस्कार वगैरे मिळाला त्यामुळे त्या सगळ्यांनी माझ्याकडे अगदी आदरार्थी भावाने बघितले. असे विद्यार्थी रोज भेटतात.

आता फेसबुकवर तर कुठल्याना कुठल्या प्रसंगी अभिनंदनाचे संदेश फुलाबिलांचा बुके देऊन पाठवत असतात. आज भेटलेल्या ह्या विद्यार्थ्याने कहर केला. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या भिडूला खरं तर मला पंटरला म्हणायचं होतं, त्याने आदेश वजा केकाटून ऐ, त्या आण्णाकडून एक मोठा बुके घेवन ये सरांना, आपल्या सरांना पुरस्कार भेटला हाय. सत्कार तो बनता है. वास्तविक ह्या अनपेक्षित सत्काराने मला काय बोलावं हे कळेना. एकतर संध्याकाळी फिरायला आलो की अंगात स्पोर्ट्स टी शर्ट, पायात स्पोर्ट्स शूज अशा अवतारात होतो.

समोरून त्याच्या पंटरने बुके आणला. तो बुके देताना ह्या विद्यार्थ्याने फोटो काढला. सगळे सोपस्कार झाले आणि सर्र, तुमाला काय रूम बीम घ्यायची तर सांगा,गावात आपल्या सायबांची साईट चालू हाय. सर, एक काम करता काय ह्या साईटसाठी मला एक मस्त अ‍ॅड लिवून देता काय. तुमी लेखन वैगरे करता ना मग तुमाला लगेच जमेल. मला हसावं की रडावं हे कळेना. अजून दोन-चार मिनिटे झाली. त्याने कुठल्या पक्षात आहोत. सध्या युवा नेता म्हणून खूप मान आहे हे सगळं सांगत होता. शेवटी निरोप देताना सर्र, तेवड अ‍ॅडचं लक्षात ठेवा आणि मला पाठवा. मी पुन्हा गार्डनमध्ये फेर्‍या मारू लागलो. मी तो बोलत असताना एक गोष्ट समजून घेत होतो ती म्हणजे त्याची बिनधास्त भाषा, जी नक्कीच कुठल्या शाळेत शिकवली नव्हती. ही शहरातल्या पांढरपेशा शाळेत शिकणारी मुलं. कुठलीही भाषा असो मराठीच नव्हे, तर हिंदी असो इंग्लिश असो, दोन वाक्य ही मुलं नीट बोलू शकत नाहीत. ह्याला जबाबदार कोण?.

त्यानंतर फेर्‍या मारताना मी ह्या विचारात गढून गेलो तेव्हा कॉलेज मधले दिवस आठवले. अकरावीत असताना ज्ञानसाधनामध्ये अशोक बागवे सरांचे लेक्चर ऐकले आणि त्यांना भेटून आम्ही विद्यार्थी सर तुमचं लेक्चर ऐकणे ही विलक्षण अनुभूती असते असं म्हणालो. सरांनी आम्हा सगळ्यांकडे चमकून बघितलं आणि शब्द जपून वापरा रे. अनुभूती वेगळी,अनुभव वेगळा. त्या एका वाक्यावर सरांनी उभ्या जागेवर तासभर लेक्चर दिलं. प्रत्येक शब्द जरी समानार्थी वाटला तरी तो अर्थाने समानार्थी असेलच असं नाही. शब्द हे वरवर समान दिसतात, पण प्रत्येकाचा अर्थ किंवा जाणण्याचा परिणाम एक असेल, पण प्रत्येकाचा लहेजा वेगळा, मैदानातून घरी आल्यावर माझी आंघोळ आटोपून मी स्वस्थ बसून या सगळ्याचा दोष फक्त शिक्षक म्हणून मी का घेऊ?, आजूबाजूला बदलत जाणारे वर्तमान ह्याला तेवढेच जबाबदार नाही का?. रोज सकाळी येणारी वर्तमानपत्रे, रोज टीव्हीवर ठणठण करणारी न्यूज चॅनेल, आजूबाजूला वावरणारी सतत संपर्कात येणारी माणसे ही सगळी याला जबाबदार नाही का?, या सर्वाचे उत्तरदायित्व शिक्षणव्यवस्थेचा एक भाग म्हणून मीच का घेऊ?

जवळपास नव्वद-पंच्याण्णव टक्के गुण घेणारी मुलं जेव्हा काही बोलण्यासाठी किंवा काही स्वमत मांडण्यासाठी सरसावतात तेव्हा ती बोलू शकत नाहीत किंवा लिहिण्याच्या माध्यमातून व्यक्त होऊ शकत नाहीत ही व्यवस्थेची हार नाही का?. गुणांचा फुगा इतका फुगला की नक्की ही गुणवत्ता कुठे लपून होती याचा मुळात शोधच लागत नाही. कमीत कमी मेहनत घेऊन जास्तीत जास्त टक्के कसे मिळवता येतील याचे क्रॅश कोर्स काय कमी नाहीत. टक्क्यांचा फुगा फुगवून गुणवत्ता वाढवता येईल या धोरणाने आपण कुठलीतरी गुणवत्ता पुढे आणत आहोत. दहावी-बारावीत कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थी आत्महत्या करतात हे कारण पुढे करून प्रश्नपत्रिकेचा दर्जा आम्ही कमी केला. बहुपर्यायी प्रश्नांचा मारा केला. याचा परिणाम झाला काय तर मुलांना कठीण प्रश्नांना सामोरे जायची सवयच आम्ही लावत नाही. साच्यातले गणपती तयार करण्याचे कारखाने तर निर्माण होत नाहीत ना, अशी भीती माझ्या मनात निर्माण होत चालली आहे.

तंत्र किती घोटवून घ्यायचं असतं. एखाद्या गोष्टीशिवाय, तंत्राशिवाय कशी पार पाडता येईल. त्यादिवशी माझा एक सहकारी तणतणत स्टाफ रूममध्ये आला. त्याला विचारलं नक्की कशामुळे एवढा आटापिटा करून तणतण करतोस, त्यावर त्याने सांगितलं की, त्याने एक नवीन घटक शिकवायला घेतलं. मुलांना तो घटक नीट कळावा म्हणून घटकाची माहिती अगदी खोलात जाऊन देऊ लागला तर कोणी मुलाने त्याला विचारलं की, हे सगळं परीक्षेत येणार नसेल तर कशाला जादाचे तास घेऊन तुम्ही हे शिकवता. परीक्षेला येईल तेवढं शिकवा ना!. हे आम्हा लोकांसाठी काही नवीन नाही. पुस्तकात आहे तेवढं शिकायचे एवढेच मुलांना अपेक्षित आहे. समोर बसलेल्या मुलांमध्ये ही तांत्रिक शिक्षणाची भाषा जेव्हा येऊ लागते, तेव्हा ती धोक्याची घंटा असते. मुलांना अवांतर शिकण्याची सवय जेव्हा निघून जाते तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग कमी होतो. शब्दातून व्यक्त होण्याचे एक मध्यम कमी होते.

मुलांची गुणवत्ता ठरवताना किंवा एकंदरीत व्यक्तिमत्व ठरवताना त्यांनी परीक्षेत मिळवलेल्या गुणांना ग्राह्य धरले जाते. मुळात ह्या परीक्षेचा स्तर बघता आपण कुठल्या थराला येऊन पोचलो आहोत याची सतत जाणीव होत असते. प्रयोगाचे गुण, अंतर्गत मूल्यमापन, अनेक पर्यायी विषय यात गुणांची टक्केवारी वाढवण्यास कितीतरी संधी आहे. मुलांची मानसिकता जपण्यासाठी पुन्हा परीक्षेचा दर्जा कमी करा. एकूण काय सगळं घरगुती वातावरण. सगळं सोप्प झालं पाहिजे. अशी मुलं जगण्याच्या कसोटीत कशी पुढे जातील. हे सगळं टी ट्वेंटीसारखं झालं आहे. फक्त हाणामारी करा आणि धावा करा. तंत्र गेलं तेल लावत. सगळ्यांच्या तोंडी फ्रंट लिफ्टिंग, बॅक लिफ्टिंगची भाषा, पण मनोधैर्य वाढवणे, एकाग्रता, तंत्र ह्या गोष्टी कोणी बोलताना आढळत नाहीत. मला आठवत जेव्हा मी क्रिकेट खेळायचो तेव्हा मला अण्णा वैद्य कोचिंग करायचे. बॅटिंग करताना एखादा फटका शिकवत असतील तर पुढचे तीन दिवस एकच फटका. तोदेखील प्रत्येक चेंडू बॅटच्या मधोमध लागला पाहिजे. तुम्ही तंत्र शिका, धावांचे मनोरे केव्हाही बांधता येतील हा एक मंत्र त्यांनी तेव्हा दिला.

शिक्षणाचा मुख्य हेतू काय तर मुलांचा सर्वांगीण विकास. ह्या शिक्षणाने मुलांचा कुठला विकास होणार हे त्या व्यवस्थेला माहीत. जगण्याच्या प्रत्येक क्षणाला खाली पायघड्या नक्कीच घातल्या नसतील. कधीतरी काटे हे बोचणारच ना!. आधी उल्हास होताच आता तर काय फाल्गुन मास. गेल्या दोन वर्षात मुलं नक्की काय शिकली असतील. पुढे काय करतील, परीक्षा न देता पास होण्याच्या दिवसात ही मुलं जीवनाच्या कोणत्या संघर्षाला कशी सामोरी जातील. अर्थात ह्या सर्वाला अपवाद असतीलच. ह्या सगळ्यात भाषा तर गुदमरून गेली आहे. त्याबद्दल काय करता येईल?. भाषा तर ह्या सगळ्या गोष्टींना व्यक्त करायचे माध्यम आहे. या दिवसात पुन्हा दुकानाच्या पाट्या तिथल्या स्थानिक भाषेत असाव्यात ही संकल्पना मूळ धरते आहे. नक्कीच हा स्तुत्य उपक्रम असेल, पण काल बाजारात जाताना एका ठिकाणी संक्रातीच्या सणासाठी इथे वहाणे भेटतील आणि तिथल्या दुसर्‍या बोर्डावर आमच्या इथे संक्रातीच्या सणासाठी व्हाने मिळतील अशा पाट्या लावल्या होत्या. इथल्या भाषेचे काय करायचे राव?

रात्रीचे जेवण आटोपून मी मोबाईल हाती घेतला तेव्हा मघाशी मैदानात भेटलेल्या विद्यार्थ्यांनी मघाशी सत्कार करताना काढलेला फोटो मला पाठवला होता. आपली ओळख युवा नेते वगैरे करून खाली ठळक अक्षरात माझे सर आणि त्याच्यावर आम्ही यांच्यामुळे घडलो असे बोल्ड टायपात छापले होते. खरच पुढची पिढी आम्ही घडवतो आहोत की बिघडवतो आहोत, असा प्रश्न मला छळतोय.

First Published on: January 30, 2022 4:45 AM
Exit mobile version