सर्किट हाऊस : फास्ट-फार्सिकल एक्स्प्रेस

सर्किट हाऊस : फास्ट-फार्सिकल एक्स्प्रेस

– अरविंद जाधव

मराठी रंगभूमीवर अनेक अजरामर नाटकं आली. त्यात विनोदी नाटकांच्या रांगेतील वेगळ्या ढंगातील निराळ्या जातकुळीचा नाट्यप्रकार फार्स होय. मराठीतील प्रहसन इंग्रजीत फार्स हा सुखात्म नाट्यप्रकार अतिशयोक्त, असंभवनीय घटना, विदुषकी चाळे, शाब्दिक कोट्या याद्वारे प्रेक्षकांना हसवणे हे प्रयोजन, गोंधळ धिंगाणा घालण्याच्या मानवी स्वभाव प्रवृत्तीत या नाट्यप्रकाराची मुळे आहेत, असे मराठी वाङ्मयकोशात सांगितले आहे. बासुंदीचा मनोरंजक फार्स, अनारशाचा फार्स, नारायणरावाच्या वधाचा फार्स हे फार्स गाजले, पण पुढे मराठीत साजबा प्रभू म्हणजेच बबन प्रभू यांनी वेगळ्या शैलीने नावारूपाला आणले त्यात चोरावर मोर, दिनूच्या सासूबाई राधाबाई, पळा पळा कोण पुढे पळे तो आणि झोपी गेलेला जागा झाला यांसारखे त्यांचे फार्स खूप लोकप्रिय ठरले. अलीकडे संतोष पवार आणि विजय केंकरे हे फार्सिकल नाटकांसाठी वेगळा प्रयत्न करीत आहेत. कोविड काळात मराठी रंगभूमीवर आलेलं गौतम जोगळेकर लिखित व विजय केंकरे दिग्दर्शित ‘सर्किट हाऊस’ हे फार्सिकल नाटक प्रचंड गाजलं. आता पुन:श्च हे नाटक नव्या नाट्यसंचात रंगभूमीवर आलं आहे.

सर जॉर्ज ग्रोव्ह यांच्या मते प्रहसन लॅटीनमध्ये मिसळलेल्या सामान्य फ्रेंच भाषेतील कॅन्टीकल म्हणून सुरू झाले. हे व्यंग किंवा गंमत म्हणून एक वाहक बनले. त्यामुळे आधुनिक फार्स हास्यास्पद कृती विनोद निर्मिती करणारे नाटक असे एका संदर्भात दिसून येते. म्हणजे फार्स नाट्यप्रकार अतिशय जुना म्हटला तरी आजही त्याला तितकेच महत्त्व आहे. ते जीवनाशी निगडित असून हास्य गंमत, विनोदातून बरंच काही सांगून जाणारा व कायम लक्षात राहणारा नाटकाचा भाग अगदी मॅड कॉमेडी असेल तर तिचा हास्यस्फोट माणसाला विचार करायला लावण्याआधी गतीने गंमत घडून प्रेक्षक हसून बेजार होतो. असाच अनुभव ‘सर्किट हाऊस’बाबत येतो. या नाटकात दिग्दर्शक विजय केंकरे यांचे दिग्दर्शकीय कसब दिसून येते आणि त्याला उत्तम साथ अभिनयाची प्रचंड ऊर्जा असणारे अभिनेते संजय नार्वेकर यांनी दिली आहे.

नाटकाची गोष्ट अशी पोपटराव चावरे हा राज्याचा मंत्री विरोधी पक्षाच्या पीए डॉली लोगोला सर्किट हाऊसवर मजा करण्याच्या हेतूने घेऊन येतो, मात्र तिथे घडते भलतेच! आणि पोपटराव चावरेंचा अपेक्षाभंग होतो. सर्किट हाऊसवर एक अज्ञात जासूस खिडकीच्या तावदानाचा मार बसल्याने गतप्राण झालेला असतो. त्याचे प्रकरण अंगलट येऊ नये व त्यातून बाहेर पडावे म्हणून मंत्री पोपटराव त्यांचा पीए चिंतामणी धुरंधरला बोलावतो. त्यामुळे आणखी घोळ वाढत जातो. कारण वेटर आणि मॅनेजरच्या संशयातून सुटण्यासाठी पोपटराव डॉलीला चिंतामणीच्या गळ्यात बांधतो व निसटण्याचा प्रयत्न करतो, मात्र आणखी गृुंता वाढत जातो. चिंतामणी आपल्या आजारी आईच्या देखभालीसाठी ठेवलेल्या नर्स सिंधूच्या फोनवर संपर्कात असतो तसेच नवर्‍याशी संग करण्यासाठी गुरूवारची वाट पाहणारी पोपटरावची पत्नी मैना चावरे अपत्य नसल्याने एकाकी आहे. ती सतत मद्य सेवन करीत असते. तिची व्यथाही मजेदार पद्धतीने मांडली आहे. कारण फार्समध्ये फारसे शोक व्यक्त करण्याला तितके स्थान नसते. नवरा घरी येत नाही म्हणून ती सर्किट हाऊसवर येते. तसेच डॉलीचा नवरा रॉनी लोगो हा तिच्या शोधात तिथेच येतो. दुसरीकडे सिंधू नर्स चिंतामणीवर अव्यक्त प्रेम करणारी, तिचंही सर्किट हऊसवर येणं होतं आणि मग एकच गोंधळ निर्माण होतो, गुंता वाढत जातो. पोपपटराव प्रत्येक प्रसंगातून तो गुंता निस्तरण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा नवीन भानगड निर्माण होते. ती भानगड दूर करावी तर आणखी गैरसमज, त्यामुळे प्रसंगनिष्ठ विनोदातून धो धो हशा आणि टाळ्या मिळत राहतात. मनोरंजनाचं हे ‘सर्किट हाऊस’ प्रेक्षागृहाचाही ताबा घेते हा अतिशयोक्तीचा भाग नाही.

या नाट्यातून फार्सच्या सर्व वैशिष्ठ्यांचा अनुभव प्रत्येक प्रवेशागणिक येतो. धावत्या गतीने घडणारा प्रसंगनिष्ठ विनोद शब्दाशब्दाला हास्यस्फोट घडवतो. येथे लेखक व दिग्दर्शकांनी काळजी घेतली आहेच. तशी भूमिका साकारणार्‍यांनीही लक्ष देत शाब्दिक विनोदाची भट्टी जमवून आणली आहे. ‘करायला आलो काय आणि घेऊन चाललोय मुडद्याचे दोन पाय’, ‘साहेब कामात बिझी मी घामात भिझी’, ‘अरे गड्या नाही साहेबांनी बघितल्यावर आमच्या बरगड्या बाहेर काढतील…!’ तसेच ‘आता आमच्या बायकोच्या येण्याने ‘डाव’ पण बदलला आहे आणि ‘पेच’ पण बदलला…’ ‘आमी पन नाकासमोर चालणारी माणसं आमचं नाकच वाकडं त्याला आमी तरी काय करणार’ अशी भाषिक मोडतोड करून विनोदी अर्थ असणारी नाटकभर वाक्ये हसणावळ पिकवतात. यातील नऊ कलावंत आपापल्या सहजाभिनयाने वावरतात. काही ठळक तर काही ठळकपणाला उभारी देणारी वाटतात.

अंकूर वाढवे याने उभा केलेला छोटा जासूस अविस्मरणीय आहे. आपल्या कमी उंचीचा वापर कसलेल्या नटाप्रमाणे वाटतो. वेगवेगळ्या पोझिशन्सने उभे राहणे मृत, जिवंत असण्याचा अभिनय नैसर्गिक. विरोधी पक्षाची पीए डॉली लोगोचा मादक भावविभोरपणा माधुरी जोशीने अचूक उभा केल्याचे वाटले. कधी थोडे दडपण वाटते, पण फार्समधील प्रसंगभान योग्य. लाडीक बोलण्यातून अव्यक्त प्रेम व्यक्त करणारी नर्स सिंधू सुषमा भोसलेने बर्‍यापैकी उभी केली आहे. मैना चावरे साकारणारी सावित्री मेधातुल यांचा सहजाभिनय भावतो, तर प्रमोद कदम यांचा रॉनी लोगो कथासूत्रानुसार ठीक आहे. वेटरच्या भूमिकेत कृष्णा चतुर्भूज एकरूप झाला आहे. बर्‍याच प्रसंगात त्याचा प्रवेश भाषिक-आंगिक बोलीमुळे उठावदार झाला आहे. याशिवाय नामांतर कांबळे यांचा मॅनेजर बदलत्या प्रसंगानुरूप यथायोग्य वाटतो.

काही वर्षांच्या अंतरानेही गणेश पंडित यांनी अभिनयाची सहजता टिकवून ठेवलेली पाहायला मिळते.
मंत्री पोपटरावांचा पीए चिंतामणी धुरंधर सहज सुंदर व संयत अभिनयाने साकारण्यात यशस्वी ठरले आहेत. अनेक नाटक-सिनेमांत आपल्या अभिनयाचे गारूड प्रेक्षकांवर असणारे संजय नार्वेकर यांनी नाटकाची मुख्य व्यक्तिरेखेची धुरा मोठ्या ताकदीनं पेलली आहे. त्यांनी साकारलेला लफडेबाज मंत्री पोपटराव चावरे महाराष्ट्र दक्षिणी बोलीचा वापर करीत प्रेक्षकांत प्रचंड हशा निर्माण करतात. नाटकाच्या प्रत्येक प्रसंगात त्यांच्या भूमिकेला न्याय देतात व शब्दउपयोजनेप्रमाणे नुसत्या शरीर हावभावानेही टाळ्या घेतात. विजय केंकरे यांचं दिग्दर्शन अधिक गतिमान करणारं विशिष्ट हास्यविनोदी जागा पकडून ठेवणारं, नॉन्सेन्स कॉमेडीतही योग्य संदर्भ जोडणारं, नेपथ्यात उभे केलेलं सर्किट हाऊस व त्याच्या कपाट, तावदाने व खिडक्यांचा फोन संवादासाठी वापर स्तुत्य प्रयत्न वाटतो. ही व्यंगचित्रात्मक कॉमेडी शाब्दिक कसरती, धावाधाव, पळापळ एखाद्या एक्स्प्रेसप्रमाणे ती एकदा मिळाली की पुढील प्रवास सुखाचा होतो. अगदी तसेच या प्रहसनातून दिसून येते. ‘सर्किट हाऊस’ची माणसं कधी सर्किट वाटली तरी त्यातील मनोरंजनाने फास्ट-फार्सिकल ट्रॅक सुसाट प्रवासासाठी पकडलेला वाटतो.

First Published on: April 21, 2024 5:45 AM
Exit mobile version