आश्वासक कथाकार : किरण येले आणि बालाजी सुतार

आश्वासक कथाकार : किरण येले आणि बालाजी सुतार

–प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार

किरण येले यांच्या एका कथेतील पात्राच्या तोंडी असलेला हा संवाद वानगीदाखल देता येईल, ‘माणसाला जोवर पूर्णत्वाचा ध्यास आहे तोवर तो दु:खीकष्टी असला तरी आनंदी आहे. पूर्णत्वानंतर भली मोठी पोकळी वाट पाहत असते त्याची. काही उरत नाही पोरी पूर्णत्वानंतर. नीट बघ, जगातली प्रत्येक गोष्ट अपूर्ण असते. ज्या दिवशी तिला पूर्णत्व लाभतं त्या दिवशी ती संपते आणि नव्यानं जन्म घेते. स्त्रीपुरुष नातंही शरीरातल्या आणि मनातल्या अपूर्णत्वावरच टिकून आहे. म्हणूनच तर ध्यास लागतो पूर्णत्वाचा. आणि म्हणूनच पूर्णत्व लाभतं, तेही क्षणभरच. ते चिरकाल लाभलं तर सृष्टीच संपून जाईल!’. मानवी किंवा एकूणच जगाच्या अस्तित्वाविषयीचं हे आकलन निर्विवाद आहे. येले आणि सुतार यांच्या कथांमध्ये चिंतनाची ही डूब सातत्याने पहायला मिळते.

स्त्री-पुरुष संबंध आणि त्यावर असणारे सामाजिक दबाव, त्यांच्यातील अपरिहार्यता, असहायता, नाती निभावून नेतानाची तगमग, लादलेली नाती ओढून नेताना होणारी कासाविशी, त्यातून सुटण्यासाठी किंवा नाती टिकवून धरण्यासाठी शक्यतांच्या टोकावर पोहोचलेली मानसिक अवस्था या दोन्ही कथाकारांच्या कथांमध्ये प्रतिबिंबित झालेली दिसते. नैतिक आणि अनैतिकतेच्या व्याख्या नेमक्या कशा ठरवायच्या, कशाच्या आधारे ठरवायच्या ? व्यभिचार हा मानसिक असतो का शारीरिक? स्त्री-पुरुष नाती संबंधांत शारीर आणि मानसिक यांच्यात संतुलन किंवा तोल कसा सांभाळला जातो अशा अनेक प्रश्नांना थेट भिडण्याचा यशस्वी प्रयत्न या कथा करताना दिसतात. मानवी जगणं मानसिक आणि भौतिक अशा दोन समष्टीवर आधारलेलं असतं, जोवर तोल सांभाळलेला असतो तोवर सगळं सामान्य किमान दाखवण्यापुरता तरी टिकून असतं. समष्टीवरचा तोल गेला म्हणजे कोसळणं ठरलेलं असतं. हा तोल सांभाळताना कोसळणार्‍या सामान्य माणसांच्या व्यथा या कथांमध्ये दिसतात.

येले महानगरी सामान्य लोकांच्या जगण्याला केंद्रस्थानी ठेऊन कथा लिहितात. ‘कथेमध्ये शब्दातीत असे दुष्कर काही सांगण्यासाठी स्थितीस्थापकत्व साधणारी लवचिक आणि जमिनीखालील आगटी पेटवू शकणारे भुयार खोदण्याची क्षमता असणारी तीक्ष्ण लेखणी लेखकाजवळ असावी लागते. त्याच्या देहातील अतिसूक्ष्म रक्तवाहिन्या सर्वकाळ तप्त आणि वाहत्या असाव्या लागतात. विषयनिवडीपासून संपूर्ण बजावणीपर्यंत किरण येले यांचा जो कथाप्रवास चालतो, त्याला उत्तम सामाजिक ग्रहणशक्तीचे अधिष्ठान लाभलेले आहे. त्यांच्या कथेतील पात्रे सर्वसामान्य स्तरावरची आणि विशिष्ट परिस्थितीत कुचंबलेली, असहाय असली, तरी ती काठाला लागण्यासाठी सकारात्मकतेने धडपडताना दिसतात. एखाद्या पीतस्फटिकातून पिवळ्या रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात, तसा विविध स्तरांवरील माणसांच्या, स्त्री-पुरुषांच्या कथा सांगणारा ‘मोराची बायको’ हा कथासंग्रह एक अनोखा ‘टोपाझ’ आहे,’ असं येले यांच्या या कथासंग्रहाचं मर्मग्राही विश्लेषण ज्येष्ठ कथाकार आनंद अंतरकर यांनी केलं आहे.

बालाजी सुतार खेडे, निम्नशहरे, आधुनिकता आणि पारंपरिक मागासलेपण यांच्या अध्येमध्ये लोंबकळणार्‍या गावांमधील जगण्याचा वेध घेतात. गावातली काय किंवा शहरातली काय माणसं आपलं अपरिहार्य जगणं कुवतीनुसार पेलत राहतात. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक या सगळ्या घडामोडीतून होणार्‍या दृश्य-अदृश्य परिणामांना माणसं अटळपणे नियतीच्या भोगासारखे भोगत राहतात. ‘दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी’ हा कथासंग्रह आजच्या मराठी कथेला स्वत:चा नवा स्वर प्राप्त करून देणारा आहे. मौखिक परंपरेला जोडून घेऊन नव्या कथन शक्यता शोधत,अनोख्या कथाबंधाची घडण जाणीवपूर्वक करत सुतार यांची कथा वाचकासमोर येते. ती नव्या भाषेची, मूल्ययुक्त तपशिलाची जाणीवपूर्वक पेरणी जशी करते; तशीच ती आजच्या काळातले ‘सांगणे’ शोधून वाचकाला त्या सांगण्याच्या भोवर्‍यात अडकवून गरगरून टाकते’, अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक राजन गवस यांनी सुतार यांच्या कथेचा गौरव केला आहे.

आपल्या जगण्याच्या अवस्थेला व्यवस्था कारणीभूत आहे याचा लवलेशही सामान्य माणसांना नसतो अशा माणसांच्या कथा हे दोन्ही कथाकार लिहितात. माणसांच्या वर्तनाचे हे सगळे मनोव्यापार, त्यातील सूक्ष्म निरीक्षणं नोंदवित असताना ते रटाळ होणार नाहीत याची काळजी दोन्ही लेखक घेतात. म्हणजेच या दोन्ही लेखकांच्या कथा वाचनीय आहेत. कथा किंवा कादंबरी लिहिण्याबाबतचा जो सगळ्यात महत्त्वाचा गुण नि अट आहे. लेखन वाचनीय करता असताना शैली गरजेची असते आणि सुतार यांनी आपली स्वत:ची शैली विकसित केलीय. ती वाचकानुनयी वाटावी इतकी प्रभावी ठरते. येले यांची अशी स्वतंत्र शैली नसली तरी त्यांच्या कथा वाचनीय आहेतच. मराठी कथेला असलेली दीर्घ परंपरा आपल्या सक्षम खांद्यांवर तोलून नेण्याची ताकद या दोन्ही लेखकांमध्ये आहे , यात शंका नाही. किरण येले आणि बालाजी सुतार यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा!

First Published on: August 27, 2023 4:30 AM
Exit mobile version