..तर विजय निसर्गाचाच..

..तर विजय निसर्गाचाच..

विचार करण्याची अफाट क्षमता, संवादाची देणगी आणि शारीरिक रचना या बळावर मानवाकडून विकासाच्या नावाने अचाट प्रयोग सुरू आहेत. त्यामुळेच सजीवसृष्टीचा एक भाग असूनही माणूस त्यापासून दुरावत चाललाय. एकीकडे शत्रू राष्ट्रांना नेस्तनाबूत करण्यासाठी बलाढ्य देशांकडून शस्त्रास्त्र सज्जता केली जातेय, तर दुसरीकडे निसर्गावर चढाई करत विकास सुरू आहे. अर्थात हे दोन्हीही मार्ग विनाशाकडे घेऊन जाणारी आहेत.

धार्मिक अधिष्ठान, जैवविविधतेची मुबलक देण, बोलीभाषा, पर्यावरण या सर्वांचा विचार करता भारत सर्व जगात श्रीमंत ठरावा. सर्वाधिक जैवविविधता आढळणार्‍या देशांमध्ये भारताचा 8 वा क्रमांक लागतो. भारताचा 23 टक्के भूभाग हा जंगलांनी व्यापला गेलेला आहे. अशी ही समृद्धता जपण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. मात्र, दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. सर्वात प्रगत जीव म्हणून मानवानं इतर सजीवसृष्टीला जपण्याचा विचार केला पाहिजे. प्रत्यक्षात मात्र त्याउलट घडतंय.

उद्योग, तंत्रज्ञान, वाहतूक व्यवस्था या सर्वातून थेट पर्यावरणाला संकटात टाकलं जात असताना, कृषी क्षेत्रातील किटनाशकांचा बेसुमार वापर बघता मानव स्वतःलाच संपवायला निघाला की काय, अशी परिस्थिती आहे. संकरित वाणांमुळे प्रजोत्पादन क्षमता कमी होत चाललीय, रसायनांच्या भरमसाठ वापरामुळे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचं प्रमाण वाढलंय. हे संकट एवढ्यावरच थांबलेलं नाही, तर जे अन्न पोटात जातंय त्यामुळे मानवाच्या जनुकीय (डीएनए) संरचनेतच बदल सुरू झालेत. अधिकाधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी स्वतःच्या विनाशाकडे नेणारा मार्ग मानवाने तयार केलाय.

पोट भरण्यासाठी रोजच चाललेला संघर्ष, नवनवी आव्हानं यापुढे ही संकटं महत्त्वाची वाटत नसली तरीही पुढच्या पिढीसाठी तरी निसर्ग जपावा लागेल, हे प्रत्येकाला समजून घ्यावं लागेल. जंगलं आपल्याकडे नाही तर आपण जंगलांकडे जात आहोत. त्यांना नष्ट करत आहोत. म्हणूनच अलिकडे बिबट्या आणि मानव यांच्यातला संघर्ष वाढताना दिसतोय. त्यांचं हक्काचं आपण हिरावून घेत असताना, त्यांनी पोट भरण्यासाठी मानवी वसाहतींकडे येणं हे अजिबातच निसर्गाच्या विरोधात नाही. पाळीव प्राणी आपण बंदीस्त केलेत. जंगलांची कत्तल आपण चालवलीय. मग, जंगली श्वापदांनी राहायचं कुठे आणि खायचं काय? मानवाने आपल्या हक्काचं तर घ्यायचं शिवाय त्यांच्याही वाट्यावर हक्क दाखवायचा? हे असंच सुरू राहिलं तर मात्र भविष्यात मानव विरुद्ध इतर सर्व जंगली प्राणी असा संघर्ष अटळ आहे. दुर्दैवं एवढंच की, संरक्षित अभयारण्यासारखं गोंडस नाव देऊन त्या सर्व प्राण्यांना बंदीस्त करायलाही मानव मागेपुढे पाहणार नाही. कारण, अनेक राज्यांनी भेकर, रानडुक्कर, माकड यांना उपद्रवी ठरवून त्यांना मारून टाकण्याला अधिकृत मान्यताही दिली आहे. केरळमधील गाभण हत्तीण आणि पुण्यात चुकून आलेला रानगव्याचं उदाहरण पाहता मानव कोणत्या थराला जाऊ शकतो, हे सर्वांनी अनुभवलंय. त्यामुळे बंदीस्त प्राण्यांना बंदीस्त करुन उर्वरित सर्व जंगल संपत्तीवर मानवाने दावा ठोकला तर विशेष वाटायला नको.

वृक्षारोपणाच्या मोहीमा राबवून सरकारकडून वनक्षेत्र वाढल्याचे पोकळ दावे केले जात असले तरीही वास्तव मात्र खूप वेगळं आहे. 1990 सालापासून मानवाने 80 दशलक्ष हेक्टर वनक्षेत्र नष्ट केलंय. गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची बैठक झाली होती. त्यात वनक्षेत्र नष्ट होईल अशा 16 प्रकल्पांना मान्यता दिली गेली. गोव्यातील मोलेम अभयारण्यातून जाणारा हायवे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग यांचा समावेश आहे. यात तब्बल 32 हजार वृक्षांची कत्तल होणार आहे. या प्रकल्पांमुळे आसाम राज्यातल्या सालेकी हत्ती प्रकल्पात असलेल्या कोळसा खाण प्रकल्प, मध्ये प्रदेशातल्या कान्हा आणि तेलंगणातल्या कवळ व्याघ्र प्रकल्प बाधित होणार आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं तर आरे कॉलनीतल्या वृक्ष कत्तलीचाही विषय ताजा आहे.

निसर्ग वाचवण्यासाठी एका हाताने 5 टक्के प्रयत्न करायचे आणि दुसर्‍या हाताने 90 टक्के निसर्ग ओरबाडून घ्यायचा अशी स्थिती आहे. प्रदूषण आणि प्लास्टिक हे दोन्हीही राक्षस मानवनिर्मितच आहेत. त्यामुळे थेट पर्यावरण आणि जैवविविधतेवर मोठा परिणाम होतोय. ठाण्याच्या खाडीत कधीकाळी 70 प्रकारच्या मासे आणि खेकड्यांचं अस्तित्व होतं. आता त्यातील 95 टक्के प्रजाती नष्ट झाल्या आहेत. यालाही मानवनिर्मित प्रदूषणच कारणीभूत आहे. कारण, आजही कारखान्यांमधून निघणारं रासायनिक घटक असलेलं पाणी थेट नद्या, नाल्यांमध्ये मिसळतंय. यातून पाण्यातील सजीवसृष्टी संकटात सापडलीय. जलशुद्धीकरणात महत्त्वाचा भाग असलेले सूक्ष्मजीव नष्ट होत आहेत.

निसर्गाला संकटात टाकणारी मानवाची प्रगती पाहिली की, निसर्गात सर्वांना पोसण्याची क्षमता आहे, परंतु माणसाच्या लालसेपुढे तो हतबल आहे, या गांधीजींच्या एका वाक्याची आठवण येते. एकिकडे बेसुमार लोकसंख्येचा प्रश्न, दुसरीकडे त्यांच्या गरजा भागवण्यासाठी निसर्गावर होणारं आक्रमण. अशा स्थितीत सर्वच देशांनी सारासार विचार करून सर्वांना बंधनकारक असं धोरण ठरवण्याची गरज आहे.

कोरोनासारख्या विषाणुंचं संकट, टोळधाड, चक्रीवादळ हे सर्व मानवासाठी संकेत आहेत. त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. साडेचारशे कोटी वर्षाची पृथ्वी आजवर पाच वेळा विनाशाला सामोरं गेलीय. आता ती सहाव्या विनाशाकडे वाटचाल करतेय, ते केवळ मानवामुळे. पूर्वीच्या विनाशांमध्ये डायनोसॉरसारखे महाकाय प्राणी संपले आणि आता पुढच्या विनाशात मानव संपेल. म्हणून स्वतःच्या अस्तित्त्वासाठी तरी मानवाला निसर्गाने दिलेल्या संकेतांचा गांभिर्याने विचार करावा लागेल. अन्यथा, विजय निसर्गाचाच होईल, एवढं मात्र नक्की!

First Published on: January 3, 2021 4:10 AM
Exit mobile version