समुद्रातील वादळी थरार ‘गडद अंधार’

समुद्रातील वादळी थरार ‘गडद अंधार’

पाणी आणि मानवी जीवन यांचं नातं अतूट आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अवतार : द वे ऑफ वॅाटर’ या हॅालिवूड चित्रपटात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याखालचं विश्व दाखवण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत मराठी चित्रपटही कुठेच मागे नसल्याचं दर्शवणारा सुपर नॅचरल थ्रीलर ‘गडद अंधार’ हा चित्रपट नुकताच आपल्या भेटीला आला आहे.
पहिल्यांदाच मराठीत असा आगळावेगळा प्रयोग पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या थरारक टीझर आणि ट्रेलरने सर्वांनाच धडकी भरवली होती. त्यानंतर आता या चित्रपटाच्या माध्यमातून आणखी एक नवा प्रयोग केला जात आहे आणि तो प्रयोग म्हणजे पहिल्यांदाच मराठीत ‘हॉरर अंगाई’देखील सादर करण्यात आली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून पाण्याखालचं जग उलगडून दाखवलं गेलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच प्रचंड चर्चेत आला होता. या सिनेमातील श्वास रोखणारी दृश्ये आणि मनाला भिडणारे डायलॉग्स प्रेक्षकांनां भुरळ पाडतात. या चित्रपटामध्ये विविध रहस्ये उलगडलेली पाहायला मिळतात. त्याचा अनुभव घ्यायलाच हवा.

इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी ‘गडद अंधार’ या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटामध्ये अभिषेक खणकरनं लिहिलेलं आणि गायक-संगीतकार रोहित श्याम राऊतनं स्वत:च्या आवाजात संगीतबद्ध केलेलं ‘दरिया, दरिया’ या गाण्यासोबतच एक अंगाई गीत आणि एक थीम साँगही आहे. झी म्युझिक मराठीवर रिलीज होणारी ही गाणी दिव्या कुमारसह जुईली जोगळेकर राऊतनं गायली आहेत. प्रत्येक गाण्याचं पटकथेत आपलं एक महत्त्व असून ही गाणी पटकथा गतिमान करण्याचं काम करणारी आहेत. या चित्रपटाचं बरंचस चित्रीकरण पाण्याखाली करण्यात आलं आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी असलेलं विश्वही यात पाहायला मिळणार आहे. गाण्यांच्या जोडीला यातील अर्थपूर्ण संवाद मनाला भिडतात. पाण्याखालच्या गडद अंधारात कोणतं रहस्य दडलं आहे याची झलक दिसते. या खोल समुद्रात किती आणि कोणत्या प्रकारची रहस्यं दडलीत हे सांगणं तेवढंच कठीण आहे. हे चित्रपटातील रहस्य आणखी गडद करणारे आहे.

मराठी चित्रपट वेगळे प्रयोग करत नाही असे बरेचदा प्रेक्षक म्हणतात. त्या प्रेक्षकांसाठी एक आगळावेगळा आणि अनेक नवीन प्रयोग अप्रतिमरीत्या केलेला चित्रपट म्हणजे गडद अंधार. शीर्षकापासून उत्कंठा वाढविणारा हा चित्रपट सुरुवात, मध्यंतर ते समाप्तीपर्यंत आपल्या मनाला, डोळ्यांना आणि बुद्धीला खिळवून ठेवतो. पाण्याखालचं विश्व दाखवणं हे कथानकाची गरज असल्यानं अंडरवॅाटर शूट करण्यात आलं आहे. जगापेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या हेतूने नव्हे तर मराठी रसिकांसमोर खर्‍या अर्थानं अनोखं असं कथानक सादर करण्याच्या उद्देशाने ‘गडद अंधार’ची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाची स्टारकास्ट खूप लोकप्रिय असून त्यांचा सिनेमातील प्रेझेंन्स रसिकांना आकर्षित करणारा आहे. अतिशय वेगळं कथानक आणि त्याची पटकथेत सुंदर अशी मांडणी आणि रहस्य, भय, कुतूहल या तीन वेगळ्या प्रकाराचा वापर करीत केलेली चित्रपटाची बांधणी अतिशय उत्तम अशी जुळून आली आहे. चित्रपटाची काही वैशिष्ठ्ये अशी आहेत की पाण्याखाली जाऊन समुद्राच्या तळाशी चित्रीकरण केलेला हा मराठीतील पहिला चित्रपट.

बरेच असे भव्य चित्रपट करताना मराठी चित्रपट कुठेतरी कमी पडतो, पण या चित्रपटाच्या बाबतीत तसं घडत नाही. आपल्या डोळ्यांना विश्वास बसत नाही की आपण मराठी चित्रपट पाहतोय इतका तांत्रिकदृष्ठ्या सरस चित्रपट आहे. संवाद अतिशय समर्पक आहेत. जिथे कॅमेरा बोलायचा थांबतो, तिथे संवाद सुरू होतात आणि इतर वेळ आपली नजर जराही इकडे तिकडे होणार नाही अशा प्रकारचे स्टोरीटेलिंग ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरले आहेत. प्रज्ञेश कदम यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे असे अजिबात वाटत नाही. पुढे जाऊन हा दिग्दर्शक मराठी चित्रपटाची व्याप्ती आणखी वाढवू शकतो इतकी प्रतिभा प्रज्ञेशकडे नक्कीच आहे. इतर तांत्रिक बाजूसुद्धा सरस आहेत आणि मुख्य म्हणजे विषयाला अनुरूप अशी वेशभूषा किरण कदम यांनी डिझाईन केली आहे. सिंक साऊंडचे बादशाह राशी बुट्टे यांच्या साऊंडची कमाल ऐकायची असेल तर चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहावा. पाण्याखाली केलेले चित्रीकरण अप्रतिम आहे. नेहा महाजन या गुणी अभिनेत्रीच्या अभिनयाच्या जोरावर हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर जातो. जय दुधाने, शुभांगी तांबळे, आकाश कुंभार, आरती शिंदे हे कलाकारसुद्धा आपल्या भूमिकेला न्याय देतात. चित्रपटाचे संगीत रोहित राऊतचे आहे. त्याने तीन गाणी वेगळ्या प्रकारची आणि अप्रतिम संगीतबद्ध केली आहेत.

एक भीती वाटेल अशी अंगाई यात आहे. हा एक वेगळा नवीन प्रकारसुद्धा छान जमलाय. सर्वात जमेची बाजू म्हणजे या चित्रपटाचे पार्श्वसंगीत. आदिनाथ पाटकर यांनी अतिशय वेगळ्या धाटणीचे पार्श्वसंगीत दिलं आहे, ज्याने भीतिदायक प्रसंग अजून परिणामकारक वाटतात. एकंदरीत उत्तम असा चित्रपट मराठीत यावा यासाठी चित्रपटाचे निर्माते कॅप्टन अवधेश सिंग चौहान आणि वर्षा सिंग चौहान यांनी चांगली निर्मितीमूल्य असलेला चित्रपट निर्माण करून मराठीत निर्माते म्हणून पदार्पण करीत आहेत. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना प्रेक्षकांनी साथ देऊन हा चित्रपट लोकप्रिय करायला काहीच हरकत नाही. कारण हाच गडद अंधार मराठी चित्रपटसृष्टीत एका नवा उजेड घेऊन येईल यात काही शंकाच नाही.

‘गडद अंधार’चं लेखन प्रज्ञेश कदम, लौकिक आणि चेतन मुळे यांनी केलं आहे. ‘बिग बॅास’ आणि ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स ३’ या रिऍलिटी शोजच्या माध्यमातून घरोघरी पोहचलेला जय दुधाणे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्री नेहा महाजन त्याच्या साथीला आहे. याशिवाय शुभांगी तांबळे, आकाश कुंभार, चेतन मुळे, आरती शिंदे, श्री, बालकलाकार अस्था आदी कलाकारांनीही विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. प्रवीण वानखेडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून गाण्याचे संयोजन आदिनाथ पातकर यांनी केले आहे. पाण्याखाली जाऊन समुद्राच्या तळाशी चित्रीकरण केलेला हा पहिला मराठी सिनेमा आहे. असे भव्य चित्रपट करताना आपण मराठीत बजेटच्या मानाने कमी पडतो, पण या चित्रपटाच्या बाबतीत तसे घडत नाही. आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही इतका हा सिनेमा भव्य व उच्च दर्जाचा बनला आहे आणि तांत्रिकदृष्ठ्यादेखील सरस ठरला आहे. समुद्रातील हा वादळी थरार एकदा तरी अनुभवायला हवा.

लेखक- आशिष निनगुरकर

First Published on: February 5, 2023 5:04 AM
Exit mobile version