उन्हाची चिंता नको, चिंतन हवे

उन्हाची चिंता नको, चिंतन हवे

-अमोल पाटील

निसर्गाचा एक नियम आहे, ‘जे आपण पेरतो तेच उगवतं.’ या नियमानुसारच प्रत्येक जण आपापल्या कर्मकर्तव्यान्वये फळ प्राप्त करून घेतो. सुख, आनंद, समाधान आणि दुःख, आजार, वेदना ही सर्व देणगीही याच कर्मकर्तव्याची असे म्हणायला हरकत नाही. हे सर्व इथं मांडायचा मूळ मुद्दा हा की अलीकडे गरमीने हैराण झालेली माणसं या उष्णतावाढीमुळे त्रासून गेलेली दिसतात.

‘यंदा जरा जास्तच उकाडा जाणवत आहे,’ ‘दरवर्षीपेक्षा यंदा जरा जास्तच ऊन जाणवत आहे,’ अशी काही वाक्ये नेहमी उन्हाळा आला की जागोजागी ऐकायला मिळतात. आपल्याकडे समस्यांचे चर्वण खूपच चवीने केले जाते आणि त्या समस्यांची कारणमीमांसा व त्यावरील उपाययोजना यावर मात्र तुलनेने अल्प प्रमाणात बोलले जाते. या सवयीमुळे आपल्या अवतीभवती सर्वत्र केवळ समस्यांचेच डोंगर उभे आहेत की काय असं एखाद्या नवख्या किंवा उगवत्या मनाला वाटले तर त्यात नवल वाटण्याचे कारण नाही.

जेव्हा चिंतनाची जागा चिंता घेते तेव्हा समस्येचे फावते व आपला र्‍हास सुरू होतो. चिंतन आपल्याला जटिल समस्येतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी मदत करते, तर चिंता आपल्याला त्या समस्येत नकळत अधिकाधिक खोलवर गुंतवत नेते आणि मग त्यातून बाहेर पडणे आपल्याला अवघड होऊन बसते. हे जसे इतर अनेक समस्यांच्या बाबतीत लागू आहे तसेच या भरमसाठ उष्णतावाढीलाही लागू आहे हे लक्षात ठेवावे.

उन्हाळा आला की कट्ट्याकट्ट्यावर उष्णतावाढीची चिंता बहरतेय, मात्र त्याची कारणमीमांसा व उपाययोजनांवर अगदीच अल्प प्रमाणात कुणी बोलताना व कृती करताना दिसते. मग ज्या गोष्टी आपण पेरणारच नाही आणि त्या उगवून येण्याची वाट मात्र पाहायची हे भाबडेपणाचेच लक्षण नव्हे काय? आणखी एक मुद्दा इथे महत्त्वाचा तो म्हणजे संयम.

आज पेरलं आणि उद्या उगवलं असं होत नाही. जसं अनुकूलता वाईट कृत्यामुळे कलाकलाने बिघडत जाऊन प्रतिकूलतेत रूपांतरीत होते तसेच सातत्याने केलेल्या चांगल्या कृत्यामुळे प्रतिकूलतेचे अनुकूलतेत रूपांतर होतानाही वेळ लागतो. हे ध्यानात घेतलं की मग पूर्वीच्या पिढ्यांनी लावलेल्या झाडांच्या सावलीत आपण बसतो तर येणार्‍या पिढ्यांना सावली मिळण्यासाठी आपणही झाडे लावली पाहिजेत याचे मर्म कळते.

उन्हाळा सुरू झाला की सुरू होणारी उष्णतावाढीची जोमदार चिंता जून महिना उगवला आणि थोडेसे गार वारे वाहू लागले की थंड पडत जाते. पुन्हा उन्हाळा सुरू होईपर्यंत ही चिंता आपले तोंड वर काढत नाही. तेव्हा या चिंतेची जागा ओल्या आणि कोरड्या दुष्काळाच्या चिंतेने घेतलेली असते.

एकंदरीत ही चिंता काही माणसांची पाठ सोडत नाही असेच चित्र साधारणपणे पाहायला मिळते. सुज्ञ याला खतपाणी घालत नाहीत. ते चिंतनावर विश्वास ठेवणारे आणि त्यातून मार्ग काढणारे असतात. अलीकडे किंवा गेल्या अनेक वर्षांपासून झालेली तापमानवाढ याला कारणीभूत आहे. माणसांकडून हव्यासापोटी निसर्ग प्रक्रियेत केला गेलेला हस्तक्षेप हे एक प्रमुख कारण आहे.

कडक उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी एखाद्या गर्द सावलीच्या झाडाच्या कुशीत लगबगीनं जाणारा माणूस व स्वत: उन्हाचे चटके सोसत आपल्या कुशीत आलेल्यांना मायेची सावली देणारे ते झाड असे हे भावनिक नाते. तरीदेखील माणूस त्याच झाडावर कुर्‍हाड चालवताना मात्र क्षणभरही त्याच्या परोपकाराची जाणीव ठेवताना दिसत नाही. भरमसाठ प्रमाणात होत चाललेली वृक्षतोड आणि यातून झाडांचे होत चाललेले कमी कमी प्रमाण हे वास्तव आहे. हिरव्यागार झाडांची कत्तल करून तिथंच सिमेंटची जंगले उभे करणारे आपण या उष्णतावाढीवर किती एक अधिकारवाणीने बोलू शकतो हा मूळ विषय आहे.

ओसाड खेडी आणि बकाल शहरे ही आजची या चुकीच्या वागण्यामुळे समोर उभी राहिलेली भीषण परिस्थिती आहे. अशी निर्माण झालेली परिस्थिती चिंतेने सुधारणार नाही तर कारणमीमांसा आणि त्यावरील चिंतनाने व त्या दिशेने आवश्यक उपाययोजनात्मक कृती कार्यक्रमाने सुधारेल हे खरे आहे. कुठल्याही समस्येवर उपाय करण्याची तत्परता अंगी असणे आवश्यक असते. वेळकाढूपणा अथवा आळसामुळे समस्यावृद्धीला खतपाणी मिळते हे साधे गणित नीट समजून घेण्याची गरज आहे.

खरं म्हणजे झाडांनी आपल्याला शिकवावं व आपण त्यांच्याकडून मनसोक्त शिकावं. कितीतरी गोष्टी झाडांकडे पाहून आपण सहज शिकत असतो. सतत आणि सतत आपण त्यांच्याकडून काही ना काही घेत घेत आपलं जीवन जगत आलो आहोत. फळं, फुलं, सावली देणारी ही झाडे कायम आनंद देण्याचं अमोघ कार्य करत आले आहेत. हिरव्यागार समृद्धीने नटलेली ही झाडे पाहता त्यांचे सौंदर्य अनुभवता आपण आपले दुःख वेदना क्षणभर का होईना विसरतोच. निसर्गाचा सहवास हवाहवासा वाटतो तो यामुळेच.

झाडांची पूजा करण्याची आपली संस्कृती. त्यांच्या अंगी असलेल्या महान दातृत्वभावामुळे ते सतत कृतज्ञतेला पात्र ठरतात. या सार्‍या बाबी नीट समजून घेतल्या तर त्यांच्याकडे पाहून आपले हातच जोडले जातील असा हा परोपकारी घटक आहे. एखादी बाब जेव्हा आपल्याला जगवते, आपलं जीवन सर्वांगाने फुलवते, जगण्याचा आधार असते आणि त्या बाबीलाच आपण विसरतो, दुर्लक्ष करतो किंवा नष्ट करू पाहतो तेव्हा आपलं जगणं, फुलणं कष्टप्रद होणारच हे सांगायला आणखी कुणी कशाला पाहिजे. आपल्याला सहाय्यभूत ठरलेल्या बाबींच्या कार्याची जाण सतत ठेवून त्यांच्याप्रति सदैव कृतज्ञ राहणे, त्यांना यथाशक्ती बळ देणे हे खरे शहाणपण आहे.

झाडे राखण्यात, झाडे वाढवण्यात आपले आणि येणार्‍या पिढ्यांचे भले आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे. आपल्याच चुकीच्या वागण्यामुळे, निसर्ग प्रक्रियेतील हस्तक्षेपामुळे झालेली तापमानवाढ नीट समजून घेतल्यावर झाडांची कत्तल लवकरच थांबेल. नैसर्गिक प्रक्रियेत अगोदर ढवळाढवळ करायची आणि मग नैसर्गिक संकटे आली की त्यावर तात्पुरता कृत्रिम उपाय शोधत फिरायचं हे म्हणजे ज्वलंत समस्येवर तकलादू उपाय करण्यासारखे आहे.

ग्रामीण भागात आजही ‘जिथं हरवलंय तिथंच शोधावं म्हणजे सापडेल’ अशी मोठी शिकवण असलेले वाक्य दैनंदिन व्यवहारात वावरताना सहज बोलले जाते. जिथं हरवलंय तिथंच शोधलं म्हणजे वेळ, पैसा व श्रमाचा अपव्यय टळतो ही शिकवण त्यातून मिळते, अन्यथा आजार एक आणि औषध दुसरेच असे घडले की समस्या कमी होण्याऐवजी वाढते. ज्या गोष्टीमुळे हे तापमानवाढीचे संकट आज मानव समूहासमोर उभे ठाकले आहे अगोदर त्या गोष्टी थांबवणे आणि आतापर्यंत त्या गोष्टींमुळे झालेले नुकसान भरून काढणे महत्त्वाचे आहे.

या ठिकाणी वृक्षतोड थांबवणे आणि वृक्ष लागवड वाढवणे हा प्राथमिक व महत्त्वपूर्ण उपाय आहे हे लक्षात घेतले पाहिजे. वातानुकूलित घरे, गाड्या आणि कार्यालये करून आपण काही काळ या उकाड्यापासून नक्कीच वाचू शकतो, पण वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासारखे कायमस्वरूपी उपायच अखिल मानव समूहाला व येणार्‍या पिढ्यांना या संकटापासून वाचवतील हे सुज्ञांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.

आपली गाडी सावलीत राहण्यासाठी लांब लांब कुठे झाड आहे का याचा शोध घेत फिरणारे, कडक उन्हाच्या चटक्यांपासून वाचण्यासाठी एखाद्या झाडाच्या सावलीचा आसरा घेणारे, आपल्याला जिवंत राहण्यासाठी लागणारे प्राणवायू घेणारे, फळाफुलांचा पुरेपूर आस्वाद घेणारे आपण या झाडांना काय देऊ शकतो हा विचार करून पावलं टाकली की येणार्‍या काळात उष्णतेच्या लाटा निश्चितच कमी होत जातील हे खरे आहे.

उष्णतेच्या लाटा रोखण्या
चिंता नव्हे चिंतन कामाचे
झाडांच्या थांबवुनी कत्तली
ध्येय असावे वृक्ष संगोपनाचे

First Published on: April 28, 2024 3:00 AM
Exit mobile version