‘पेढे खाऊ शंभर,पहिला माझा नंबर’

‘पेढे खाऊ शंभर,पहिला माझा नंबर’

–अर्चना दीक्षित

‘अरे गंधार बाळा, उद्यापासून ना मी तुला गणित, विज्ञान आणि कंप्युटरचा क्लास लावणार आहे. तुला पुढे इंजिनिअर व्हायचे आहे ना. मला माहीत आहे तू ह्या विषयांमध्ये ठीक आहेस, पण बाळा सध्या फॅशन आहे ना क्लास लावायची. तो गोरे वहिनींचा गौरव पाहिला ना. काही क्लास लावले नाही. मग बसलाय ९० टक्केच मिळवून. आणि मग कॉमर्स किंवा आर्ट्सला जाईल. हे पाहा तुला त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळाले पाहिजे बरं का. तुला किमान ९६/९७ टक्के आलेच पाहिजे हं. आपल्याकडे सगळ्यांनी सायन्स ग्रॅज्युएशन केलं आहे बरं का. ह्या इतर विषयांमध्ये भविष्य नाही रे काही. मला आता बाकी काही ऐकून घ्यायचं नाही.’

हे वातावरण घराघरात झालं आहे. आपल्या पाल्याला काय करायचे आहे, काय शिकायला आवडेल, त्याची क्षमता किती आहे, कोणत्या क्षेत्रात त्याला पुढील वाटचाल करायची आहे या सर्व गोष्टी विचारात न घेता आपले विचार, आपल्या इच्छा, आकांक्षा त्याच्यावर थोपवून कितीतरी पालक मोकळे होतात. विज्ञान हीच शाखा कशी योग्य आहे आणि इतर विषयांना कमी लेखून सतत घरात संवाद सुरू असतात.

किती वेळा पाल्य आपल्या पालकांना सांगण्याचा प्रयत्न करीत असतात, ‘आई अगं मला सायन्समध्ये ग्रॅज्युएशन नाही करायचं ग. मला कॉमर्स साईडला जाऊन सी. ए. व्हायचे आहे. काही दिवस एखाद्या फर्ममध्ये छान अनुभव घेऊन मग स्वतःची फर्म सुरू करायची इच्छा आहे. तू आणि बाबा नका ना माझ्या मागे लागू सारखं सायन्स कर, सायन्सच कर म्हणून. मला झेपणार पण नाही ते. उगाच सायन्स घेऊन त्यानुसार फॅशन आहे, असं नका ना मला समजावून सांगू. आणि असं काही नाही की इतर विषयांमध्ये तुम्ही काही पुढे करू शकत नाही. ते म्हात्रे काका बघ की त्यांची पण तर स्वत:ची फर्म आहे. कसलं मस्त सुरू आहे ना त्यांचं पण. मी किती वेळा त्यांना विचारत असतो या विषयावर. आई, बाबा आता जग बदलले आहे. आपण किती वेगवेगळ्या विषयांत ग्रॅज्युएशन करू शकतो. आणि शिवाय त्यात संधी पण उपलब्ध आहेत.’

त्यावर क्षणाचाही विलंब न करता पालक खड्या आवाजात ऐकवतात, ‘अरे, गप रे बाळा, तुला ह्या विषयांमध्ये काही समजत नाही. आम्ही जे सांगत आहोत ते ऐक. तू स्वत:ची अक्कल पाजळू नको उगाच.’
मग काय हे बाळ या फॅशनच्या आहारी पालकांना बळी पडतात. एखाद्या दडपणाखाली राहून कसंबसं शिक्षण पूर्ण करतात, पण काही जण हे दडपण झेलू शकत नाहीत. मग त्याचे दुष्परिणामदेखील होतात. पाल्य नको ती पावले उचलून आपल्या आयुष्याची पार वाट लावतात. आणि मग नंतर हेच पालक निराश, हताश होऊन जगतात.
म्हणून तर वाटते ना नको त्या फॅशनच्या फंदात पडून आपण आपले आणि आपल्या पाल्याचे भविष्य खराब करीत असतो. त्यापेक्षा वेळेवर त्यांची क्षमता, आवड, कल लक्षात घेऊन त्यानुसार त्या विषयावर योग्य माहिती गोळा करून आणि घरात व्यवस्थित चर्चा करून मगच तोडगा काढावा. आपले पाल्य चुकीचे आहे, त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचाच आहे, यापेक्षा त्यावर नीट विचार करून निर्णय घेतला पाहिजे. हा चुकीचा मार्ग निवडून पाल्य वागत असेल तर नक्कीच योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.
पाल्याला ज्या विषयांमध्ये प्राविण्य मिळवायचे त्या विषयाची योग्य माहिती गोळा करून त्यानुसार त्यांनी निवडलेल्या क्षेत्रातदेखील ते कसे पारंगत होऊ शकतात यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले तर त्या क्षेत्रात नक्कीच ते योग्य मार्गाने प्रगती करू शकतात.
आपण त्यांना पंख देऊन त्या पंखांना योग्य विचार, आचारांचा आहार देऊन मजबूत करायचे असते. दिशाभूल होण्यापेक्षा योग्य दिशा दाखवायला हवी, पण पंख आपल्या हातात अडकवून त्यांची उडण्याची क्षमता हिरावून घेऊ नये. आपल्या हाताच्या दबावामुळे पंख तिथेच फडफडवून त्यांची गगनभरारी थांबवणे कदापि योग्य नाही.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं…
आकाशी झेप घे रे पाखरा, आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा

First Published on: February 26, 2023 4:15 AM
Exit mobile version