राखो ‘बाजी’ की लाज!

राखो ‘बाजी’ की लाज!

-रणजितसिंह राजपूत

मराठेशाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारा पहिलाच सेनापती थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी असलेलं रावेरखेडी एक अत्यंत दुर्गम खेडं. महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर खरगोन जिल्ह्यात असलेल्या या ठिकाणी बैलगाडीही जाणार नाही अशा कठीण रस्त्यावरून जावं लागतं. अशा दुर्गम ठिकाणी पोहचल्यावर बाजीरावांच्या घोडेस्वारीच्या अफाट कौशल्याची जाणीव होते.

पराक्रमाच्या बाबतीत तोडीस तोड असूनही मराठ्यांच्या इतिहासात थोरले बाजीराव पेशवे हा तसा ‘अनसन्ग हीरो’च म्हणावा लागेल. मनोरंजनाच्या क्षेत्रात बाजीराव-मस्तानी ही हिंदू-मुस्लीम पार्श्वभूमीवर लव्ह स्टोरी म्हणून सादर केली जाते. त्यामुळे थोरल्या बाजीरावांच्या ऐतिहासिक पराक्रमी प्रतिमेचं प्रचंड नुकसान झालं. बाजीरावातला योद्धा झाकोळला गेला आणि एक प्रेमज्वरग्रस्त पेशवा तेवढाच सामोरा आला. मस्तानी हे बाजीरावांच्या आयुष्यातलं रोमॅण्टिक पर्व जरूर असलं तरी त्यावरून बाजीरावाला छंदीफंदी चौकटीत बसवणं अन्यायकारक होईल.

नर्मदेच्या पलीकडे मराठी घोडदळ नेणारा थोरला बाजीराव हा पहिलाच धुरंधर. ४०० वर्षांच्या यवनी अंमलानंतर दक्षिणेत जाऊन दिल्ली काबीज करणारा बाजीराव हा पहिलाच रणसेनानी. बाजीराव हा जगाच्या इतिहासातला एकमेव अजेय योद्धा मानला जातो. अ मॅन हू नेव्हर लॉस्ट अ बॅटल, असं त्याचं वर्णन केलं जातं. आपल्या अवघ्या २० वर्षांच्या कारकिर्दीत बाजीरावाने ३५ महत्त्वाच्या लढाया केल्या आणि सर्व लढायांमध्ये तो जिंकला. त्याला हरवणं त्याच्या काळातल्या मातब्बर शत्रूंनाही जमलं नाही. पराक्रमासाठी आणि विजयासाठी ‘बाजी’ हा शब्दप्रयोग तेव्हापासून रूढ झाला.

बाजीराव हा आजच्या पिढीला अधिक भावणारा ऐतिहासिक हीरो आहे. तो पराक्रमी, रगेल, रंगेल होताच; पण जे काम त्याने हाती घेतलं ते अत्यंत निष्ठेनं तडीस नेलं. तो संवेदनशील होता, पण भावनेत अडकून पडणारा नव्हता. बुद्धीने नियोजन करून, स्वत:चं कमीत कमी नुकसान करीत त्याने आपल्या लढाया जिंकल्या. तो लढाई जिंकण्यासाठीच लढत असे.

बाजीराव जर उत्तरेत घुसला नसता आणि त्याने खान्देश, गुजरात, माळवा, बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंध्य पर्वत यातील सर्व मार्ग आपल्या कब्जात घेतले नसते तर पुन्हा एकदा अल्लाउद्दीन खिलजी, अकबर किंवा औरंगजेबासारखा उत्तरेतला शासक प्रचंड सेना घेऊन दक्षिणेत उतरला असता आणि संभाजी महाराजांच्या हत्येची किंवा राजाराम महाराजांच्या पळापळीची दुसरी आवृत्ती निघाली असती.

बाजीरावांनी आपल्या पराक्रमाने ही आपत्ती कायमची दूर केली. बाजीरावांनी भीमथडीची तट्टे नर्मदापार नेल्यापासून उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणेत यायचे कायमचे बंद झाले. बाजीरावांनी उत्तरेत शिंदे, होळकर, बांडे, पवार, खेर हे मराठा सरदार वसवले आणि त्यामुळे ग्वाल्हेर, इंदौर, देवास आदी संस्थानं उदयास आली.

बाजीरावांच्या राज्यविस्ताराच्या मोहिमेचा पुढच्या इतिहासावर असा सुयोग्य परिणाम झाला याचं आकलन आज आपल्याला होऊ शकतं, पण सर्वसामान्य लोकांपर्यंत ते कधी पोहचलंच नाही. मराठ्यांच्या इतिहासातला हा रांगडा पंडितप्रधान उपेक्षित राहिला. वयाच्या विसाव्या वर्षीच पेशवेपदाची वस्त्रं ल्यायलेल्या बाजीरावाला आयुष्य मिळालं केवळ ४० वर्षांचं. अवघ्या २० वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत तो मुलूखगिरीसाठी अधिक काळ बाहेर राहिला. त्याचा अंतही पूर्वाश्रमीच्या खान्देश-माळव्यातल्या नर्मदा तटावरच्या रावेरखेडीला झाला. त्यामुळे मराठी मनाने या योद्ध्याचं अपेक्षित ऋण मान्य करताना बराचसा कद्रुपणा दाखवला. बाजीरावांचा संदर्भ आता अचानक येण्याचं कारणही ही उपेक्षाच.

२८ एप्रिल १७४० रोजी (वैशाख शुद्ध त्रयोदशी १६६२) रावेरखेडीजवळ उष्माघाताने बाजीरावांचं निधन झालं. जिथे बाजीरावांना अखेरचा निरोप दिला गेला तिथे नर्मदा तटावर नानासाहेबांनी ग्वाल्हेर संस्थानच्या देखरेखीखाली बाजीरावांची वृंदावन स्वरूपातील एक समाधी बांधली. बाजीरावांच्या अस्थी या समाधीस्थळी असल्याचं बोललं जातं, मात्र ही समाधी दर पावसाळ्यात पाण्याखाली जात आहे. जवळच असलेल्या महेश्वर धरण प्रकल्पामुळे (इंदिरा गांधी सागर परियोजना) रावेरखेडी हे बुडीत क्षेत्रात येते. त्यामुळे समाधीसह इतर अनेक भाग पावसाळ्यात पाण्याखाली जातो. ही समाधी वाचवली जावी म्हणून इंदौरवासी अनेक लोक सातत्याने प्रयत्न करताहेत.

इथल्या पुरातत्त्व विभागाने मात्र समाधी पाण्याखाली जाणार नाही, असं पत्राद्वारे नमूद केलं आहे. मोहम्मद के. के., एन. के. भारद्वाज या आर्कियॉलॉजिकल सर्व्हेच्या पर्यवेक्षकांनी इंदिरा गांधी सागर परियोजनेच्या अधिकार्‍यांसह या ठिकाणी निरीक्षण करून असा निष्कर्ष काढला आहे की या स्मारकाच्या आसपास साधारण एक ते दोन मीटर एवढंच पाणी राहील. वास्तू पूर्णत: पाण्याखाली बुडत नसल्यामुळे तिला कुठलीही हानी पोहचणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. एक रिटेनिंग वॉल बनवून या वास्तूचं संरक्षण करता येईल, असंही त्यांनी सुचवलं आहे. वीट आणि मसालेदार प्लास्टरने या स्मारकाचं काम केलेलं असल्यामुळे स्मारकाचं स्थानांतरण योग्य होणार नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे.

अर्थात नर्मदेच्या पुराने समाधीस्थळाच्या उंचीवर येऊन भिंतीला धडका मारणं हे काही नवीन नाही. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भूकंपाच्या धक्क्याने स्मारकाच्या वास्तूस चिरा पडल्या होत्या. तेव्हाच्या ब्रिटिशकालीन पुराणवस्तू संशोधन खात्याचे डिरेक्टर जनरल रा. ब. दीक्षित यांनी त्या तातडीने नीट करून घेतल्या होत्या. स्मारकाच्या पायथ्याशी नदीच्या बाजूने एक संरक्षक भिंत तेव्हाच बांधली गेली होती. नर्मदेच्या पुरात ती वाहून जाण्याचा धोका वारंवार उद्भवला होता. गेल्या शतकापासून नर्मदा या स्मारकाला धडका मारतेय. आता तर इथले चिरे जुने झालेत. हे स्मारक हलवून अधिक उंचावर घेऊन जावं असा इथे येणार्‍या अनेक लोकांचा आग्रह आहे.

बाजीरावांची समाधी जरी नर्मदा तटावर असली तरी इथे या टेकडीवर जिथे छावणी होती तिथेच बाजीरावांचं वास्तव्य असायचं. त्यामुळे जर समाधीस्थळ पाण्याखाली गेलं तर बाजीरावांचं स्मारक करायचं झाल्यास या छावणीस्थळीच ते व्हायला हवं. इथे काही जोती आता दिसतात. त्याचं संवर्धन केलं तर इथे बाजीरावांचं सुंदर स्मारक उभं राहू शकेल. श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा पुतळा तसेच त्यांच्या सामरिक युद्धनीतीविषयी प्रदर्शनीय दालन उभारावे, बाजीराव पेशवे यांच्या नावाने एक सैनिकी शाळाही इथे उभारावी, असा काही लोकांचा आग्रह आहे.

आज जिथे धड रस्ताही नाही तिथे बाजीराव या रावेरखेडीसारख्या दुर्गमस्थळी का आले असा प्रश्न आपल्याला पडतो. पूर्वी हा भाग मराठ्यांचा चुंगी नाका होता. तेव्हा प्रवास सहजसाध्य नसायचा. एकटा-दुकटा यात्रेकरू तर प्रवासही करू धजायचा नाही. सैन्यासोबत किंवा एकत्रित येऊन यात्रेकरू प्रवास करायचे. त्यावेळी नर्मदा नदी पार करणं सोपं नव्हतं. ही बारमाही वाहणारी नदी आहे. फक्त उन्हाळ्यातले चार महिने ती सैन्याला काही ठिकाणाहून ओलांडता यायची.

आज जे पात्र दिसतंय ते थोडं वेगळं होतं. नर्मदा रावेरखेडीजवळ थोडी उथळ होती. त्यामुळे नावा उपड्या बांधून ठेवून सैन्य किंवा इतर लवाजमा इथून नर्मदा ओलांडत असे. मराठे इथे चुंगी म्हणजे टोल वसूल करत असत. म्हणून ही छावणी इथे होती. इथल्या कचेरीत मनसबदार, सुभेदार बसत. हा इलाखा तेव्हा खूप महत्त्वाचा असणार. कारण उत्तरेत जायचा हाच एक महत्त्वाचा मार्ग तेव्हा होता.

इतिहासाचे गाढे अभ्यासक निनाद बेडेकर हे बाजीरावांचं उमदेपण सांगताना तसंच बाजीरावांच्या युद्धकौशल्याचे दाखले देताना म्हणतात, ‘बाजीरावांच्या युद्धकौशल्याची अमेरिकन लष्कर आजही जाणीव ठेवून आहे. लष्करी डावपेच आणि रणनीतीच्या अभ्यासक्रमात आजही बाजीरावांनी निजामाविरुद्ध १७२८ मध्ये पालखेड इथे केलेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते. त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावांनी निजामाला कसं घुमवलं आणि त्याचा पूर्ण पराभव करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कसं पकडलं हे स्ट्रॅटेजिक वॉरफेअरच्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलं जातं.

बाजीराव खूप मोठे युद्धनीतीज्ज्ञ होते. म्हणूनच ते अजेय राहिले. त्यांच्या कारकीर्दीतली एकही लढाई ते हरले नाही. म्हणून त्यांची तुलना नेपोलियनसारख्या युद्धनिपुण सेनापतीशी केली जाते. फील्डमार्शल मॉण्टगोमेरी यांचं युद्धशास्त्रावर आधारित ‘अ कन्साइज हिस्ट्री ऑफ वॉरफेअर’ नावाचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यात त्यांनी बाजीरावांच्या पालखेडच्या लढाईबाबत म्हटलंय की १७२७-२८ची बाजीरावांची निजाम-उल-मुल्क याच्याविरुद्धची चढाई हा ‘मास्टरपीस ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी’ होता.

बाजीराव आपल्या शत्रूला इप्सित स्थळी आणून मात देत असत. मैदानात अनुकूल परिस्थिती नसेल तर बाजीराव वाट पाहायचे. एखाद्या कसलेल्या शिकार्‍याप्रमाणे ते संयम ठेवायचे. घोडदळ हे बाजीरावांचं सर्वात मोठं बलस्थान होतं. दिवसाला ४० मैलांचा टप्पा त्याचं सैन्य गाठायचं. तो त्याच्या काळातला अत्युत्तम वेग होता. त्यामुळे शत्रूला सुगावा लागायच्या आतच बाजीरावांचा हल्ला झालेला असायचा.

बाजीरावांची गुप्तचर व्यवस्था ही त्यांची दुसरी मोठी शक्ती होती. अक्षरश: क्षणा-क्षणांची माहिती त्यांना मिळायची. मार्गात येणार्‍या नद्या, उतार-चढाव, पर्वत, घाट या सगळ्यांची अचूक माहिती बाजीरावांकडे असायची. बाजीराव प्रचंड महत्त्वाकांक्षी होते. त्याकाळात व्यापक पातळीवर दृष्टिकोन ठेवण्याची त्यांची पात्रता होती. म्हणूनच छत्रसालाच्या मदतीला ते धावून गेले. त्यांनी २५ हजारांची फौज घेऊन मुहम्मद खान बंगश याला जैतपूरच्या लढाईत मात दिली. ते मुत्सद्दी होते.

बाजीरावांचा देशभर मोठा दबदबा होता. १७३९ मध्ये इराणचा बादशाह नादिरशाह याने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा बाजीराव दिल्लीकडे निघाले. बाजीराव निघाले आहेत, या एवढ्या बातमीनेच नादिरशाह याने दिल्ली सोडली आणि तो परत निघाला. डेनिस किंकेड या लेखकाने आपल्या ‘हिस्ट्री ऑफ मराठा पीपल’ या पुस्तकात म्हटलंय – ‘ब्रेव्हेस्ट ऑफ द ब्रेव्ह, फेअरेस्ट ऑफ फेअर, बाजीराव डाइड लाइक द मोस्ट फॅसिनेटिंग फिगर इन अ रोमान्स ऑफ लव्ह’ ग्रॅण्ट डफने ‘हिस्ट्री ऑफ मराठाज’मध्ये म्हटलंय ‘ही हॅड बोथ द हेड टू प्लॅन अ‍ॅण्ड द हॅण्ड टू एक्झिक्यूट’. मिर्झा मोहम्मद नावाच्या एका इतिहासकाराने आपल्या ‘तारीखे मुहम्मदी’ या ग्रंथात बाजीरावांच्या निधनाबद्दल म्हटलंय- साहिबी फुतुहाते उज्जाम. अर्थात प्रचंड विजय मिळवणारा बाजीराव मृत्यूला बिलगला.’

जगभरातल्या इतक्या इतिहासकारांनी आणि बखरकारांनी ज्याला नावाजलं त्या पंडित प्रधान श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशवे यांची महती त्यांनी वर्णन केली आहे. खरं तर मराठ्यांच्या इतिहासात आपल्या उंबर्‍याबाहेर जाऊन मुलुखगिरी करण्याचं स्वप्नं सर्वप्रथम बाजीरावांनीच दाखवलं. बाजीरावांनी मराठी साम्राज्यवादाचं स्वप्न तीनशे वर्षांपूर्वी जोपासलं होतं. त्यासाठी त्याने क्षत्रियत्व स्वीकारलं आणि ते ग्रेसफुली पेललं. घोडदळ हा त्याकाळातल्या लढाईचा आत्मा. मंगोलियन योद्धे घोड्यावर मोठे होतात असं म्हटलं जायचं. तसेच बाजीराव घोड्यावर मोठे झाले.

ते त्यांच्या काळातले सर्वोत्तम घोडेस्वार होता. त्याच्या शिपायांसोबत तो घोड्यावर सर्वात पुढे असायचे. घोड्यावरच पिशवीत भाजलेले चणे घेऊन ते खातखात दौड करीत फाके मारत सैनिकांसह प्रवास करीत. त्यांच्यासोबतच राहत. सर रिचर्ड टेंपल यांनी वर्णन केल्याप्रमाणे बाजीरावांकडे कुशल संघटनकौशल्य होते. तो सुंदर भाषण करायचा. समरागंणावरील विजयानंतर तो आपल्या सैनिकांना उद्देशून असे काही भाषण करी की आणखी विजय मिळवण्यास त्यांचा हुरूप वाढत असे.

खरं तर आजच्या तरुण पिढीला बाजीरावांच्या तोडीचं एखादं नेतृत्त्व हवं आहे, मात्र बाजीरावांची उपेक्षा होताना दिसत आहे. उत्तर पेशवाईतल्या रंगढंगामुळे बाजीरावांबद्दल बहुजनांना ममत्व नाही. मांस भक्षण करणारा, मद्य प्राशन करणारा आणि मस्तानीसारख्या यवन स्त्रीवर प्रेम करून तिला शनिवारवाड्यात आणणारा म्हणून तत्कालीन ब्राम्हणांनी त्यांची अवहेलना केली.

तसाही पुतळे बांधून वारसा जपला जातोच असं नाही. जातीच्या नाही तर प्रांताच्या संकुचित कुंपणात इतिहासातले सुपरहीरो अडकवले जातात. पण रावेरखेडीस चिरविश्रांती घेणारे राऊ या सगळ्या पलिकडचे होते. ते रणबाँकुरा होते, मुत्सद्दी होते, तडफदार होते, काळजाने हळवे होते. म्हणून पाबळला मस्तानीस कैदेत ठेवल्याच्या बातमीने ते धास्तावले.

बाजी रावेरखेडीस दहा दिवस मुक्कामास होते. इतके दिवस रावबाजी एकाच ठिकाणी कधीच स्थिर नव्हते. इराणचा बादशहा नादिरशहास धाक घालणारा राऊ घरच्या भेदामुळे खचले. त्यातच त्यांना वैशाखातला उष्मा भोवला. त्यांनी नर्मदातीरावर वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी देह ठेवला. राऊ अधिक जगते तर आज इतिहास वेगळा असता.

पण या झाल्या जर तरच्या गोष्टी. आजही बाजीरावांची समाधी मराठी मनांना आणि मनगटांना स्फूर्ती देते. मराठ्यांच्या इतिहासाच्या खुणा तशाही लोप पावत चालल्यात. त्यात आता बाजीरावांची समाधीही जलसमाधी घेते आहे. ज्या छत्रसालाने शिवाजी महाराजांच्या वचनाचा हवाला देत ‘जो गति ग्राह गजेंद्र की, सो गति भई है आज, बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज’ अशी हाक दिली होती आणि बाजीने त्या बुंदेलाची लाज राखली होती.

चैत्रातल्या रखरखत्या वातावरणात भोवरीमुळे आकाशात उडालेला धुरळा माझ्या मनातही उठला. नाही चिरा, नाही पणती या अवस्थेत आणखी एक पराक्रमाचा वारसा अंधाराचा आसरा घेईल, आणि प्राणांची बाजी लावणार्‍या एका कणखर देशाचं इमान नर्मदेच्या प्रवाहात वाहून जाईल, जलमय होईल?

-(लेखक महाराष्ट्र शासनात जिल्हा माहिती अधिकारी आहेत)

First Published on: April 28, 2024 5:00 AM
Exit mobile version