स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा इव्हेंट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा इव्हेंट

यावर्षी आपण मोठ्या उत्साहात 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. राजपथावर विविध देखव्यांसह आणि राष्ट्रपतींना दिलेल्या मानवंदनेसह वायुदल, हवाईदल आणि नौदल यांची परेडदेखील आपण पाहिली. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आली की देशातील प्रत्येक जण देशभक्त होऊन जातो. इतर दिवशीदेखील आम्ही देशभक्त असतो, पण या दिवशीचा उत्साह जरा जास्तच… या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला एक वेगळे वलय आहे. ते म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. देशभरातील शासकीय-निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, शाळा, महाविद्यालये या सर्वच स्तरातून स्वातंत्र्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन होताना दिसत आहे.

हा उत्साह पाहिल्यानंतर देशातील तरुणांचे स्वातंत्र्या प्रतीचे विचारदेखील जाणून घेतले जात आहेत. एरवी परीक्षेपुरता भारतीय स्वातंत्र्याचा लढा वाचणारे लोक आज त्याबद्दल विशेष अंगाने चर्चा करत आहेत. (!) निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून स्वातंत्र्याची वाटचाल कशी होती हे समजून घेतले जात आहे. महापुरुषांच्या विचारांचा वारसा, तत्कालीन परिस्थिती व आजची परिस्थिती यावर विशेष चर्चासत्रांचे आयोजनदेखील होत आहे. स्वतः पंतप्रधानांनी विशेष दखल घेऊन या सर्व गोष्टींना एका अर्थाने वेगळे वलय प्राप्त करुन दिले. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष हे इव्हेंट स्वरूपात पहायला मिळत आहे.

मुळात भारतीय माणूस हा उत्सवप्रिय आहे हे नाकारून चालत नाही. उत्सवांच्यामुळे वेगळी संस्कृती त्याद्वारे आपल्याला पाहायला मिळते. अलीकडच्या काळात कोणताही सण, उत्सव म्हटले की त्याला इव्हेंटचे स्वरूप देण्यात येत आहे. अर्थात अलीकडचा हा ट्रेंड आहे असे म्हणायला हरकत नाही. पण प्रश्न असा आहे की तो उत्सव पार पडल्यानंतर त्यातून साध्य काय झाले..? किंवा त्यातून आपण काय शिकलो.? हातातल्या सोशल मीडियाने रोजच्या रोज आम्हाला इव्हेंटवादी आणि स्टेटसवादी बनवलेलं आहे. मग यामध्ये सण उत्सव यापासून एखाद्याचा वाढदिवस असेल, महापुरुषांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, एखादा जागतिक दिवस असेल, कुणी यश संपादन केलेले असेल या सगळ्या गोष्टींना कधी नव्हे ते आम्ही एवढ्या लोकप्रियतेपर्यंत नेऊन पोहोचवत आहोत. (अर्थात असे आपल्याला वाटते.) त्याबद्दल माहिती असो अथवा नसो व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इंस्टाग्राम व इतर सोशल मीडियाद्वारे आम्ही आमच्या स्टेटसला फोटो, व्हिडिओ त्याबद्दलची वाक्य ठेवून मोकळे होतो. एवढेच नाही तर मित्राने स्टेटस स्टोरी का ठेवली नाही, याची विचारणादेखील करतो. एकूणच इतर लोक हे करतात म्हणून मीसुद्धा केलं पाहिजे, माझेसुद्धा फॉलोअर्स वाढले पाहिजे, आणि मला त्याच्याबद्दल अधिक जाण आहे यासाठी गुगल, विकिपीडियाचा वापर करून माहिती जमा करून स्टेटसला ठेवली जाते. असे स्टेटसधारी लोक आमच्याकडे कमी नाहीत.

आता या सगळ्या गोष्टींचा परिपाक आहे तरी काय.? याची उत्तरे तूर्तास देणे तरी अवघड आहे… पण एक गोष्ट निश्चितपणे सांगता येईल ती म्हणजे वर उल्लेख केला त्या सगळ्या गोष्टींकडे आम्ही एक ट्रेंड म्हणूनच पाहत आहोत. हा ट्रेंड आम्ही वेगवेगळ्या आयडिया वापरून एवढ्या उंचीवर नेऊन ठेवतो की, सोशल मीडिया वापरणारे सगळेच त्याच्या पाठीमागे धाव घेतात. याचे जिवंत उदाहरण म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त युवक आणि युवतींनी मोठ्या प्रमाणावर तिरंगा ध्वज आपल्या दुचाकीवर लावला. इथपर्यंत आम्ही थांबलो नाही. तर शहरात काम नसताना काही लोकांनी तो उंच बांधलेला ध्वज दाखवण्यासाठी चक्कर मारली. रिल्स तयार करून, फोटो काढून स्टेटस ठेवले. पण हा सगळा देखावा फक्त एका दिवसापुरता होता हे दिसून येते. त्यानंतर मात्र तो ध्वज 15 ऑगस्ट रोजी आमच्या दृष्टीस पडतो. ए

का दिवसाचा दिखावू इव्हेंटवादी देशभक्त असणे हे आभासी जगामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचे आहे. इथे आणखी एक गोष्ट मुद्दाम सांगावी वाटते. ती म्हणजे स्वातंत्र्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी प्राणांची आहुती दिली. ब्रिटिशांच्या राजवटीतून आपण मुक्त झालो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरदेखील आपल्याला अनेक गोष्टी करायच्या होत्या ज्या राष्ट्राच्या उभारणीसाठी महत्वाच्या होत्या. त्यानंतर संविधान सभेची निर्मिती होऊन भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाल्यानंतर खर्‍या अर्थाने एका राष्ट्राचा नवा जन्म झाला. म्हणून आम्ही अभिमानाने सांगतो की, आम्ही भारताचे लोक एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य स्थापन करणारे लोक आहोत. तेवढ्याच दिमाखात राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाऊन कर्तव्य बजावत असतो. हे प्रामाणिकपणे करणारे लोक जरी आमच्याकडे असले तरी दिखाऊ देशभक्ती धारण करणारे लोक आमच्याकडे कमी नाहीत. म्हणून या अनुषंगाने कवी रामप्रसाद वाव्हळ यांच्या कवितेच्या ओळी फार समर्पक वाटतात.

कोण म्हणतो अभिमानाने फडफडतोय तिरंगा
जखमा जखमा झाल्या की तडफडतोय तिरंगा…

आपली देशभक्ती ही दिखाऊ नसावी. देशाप्रती आपण जबाबदार नागरिक म्हणून समोर येणे ही काळाची गरज आहे. प्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ एम. एल. पुल्लर असे म्हणतात की, जबाबदारी ही माणसाच्या हृदयामध्ये असते जेव्हा ती दम तोडते तेव्हा तिला ना न्यायव्यवस्था, ना शासन, ना संविधान वाचवू शकत… पण ही जबाबदारी जर हृदयामध्ये तग धरून असेल तर तिला कुणाचीच गरज पडत नाही वाचवण्यासाठी…. आज प्रत्येक गोष्टींची जबाबदारी आम्हाला स्वीकारावी लागणार आहे, उचलावी लागणार आहे. आजही सर्वसामान्य लोकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. सरकारला याची जाणीव करून देण्याची हीच खरी वेळ आहे. निवडणुका आल्या की कळवळा दाखवणारे पक्ष, निवडणुका झाल्यानंतर आपल्या दृष्टीस पडत नाहीत. निवडून आल्यानंतर त्यांचा जाहीरनामा त्यांनासुद्धा माहिती नसतो. हीदेखील शोकांतिका आहे.

या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी आजच्या युवकांनी समोर आले तर नवी क्रांतीची पहाट आपल्याला पाहता येईल. युवक म्हणून आपले कर्तव्य पार पाडत असताना, माझी देशाप्रती काय जबाबदारी आहे, ती ओळखता आली पाहिजे. आपल्या हातातील सोशल मीडिया हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे. याचा सकारात्मक दृष्टिकोनातून वापर केला तर बदल घडायला वेळ लागणार नाही. वेगवेगळ्या समस्या जाणून घेऊन त्यादृष्टीने पावले उचलणारे काही युवक आहेत. मला वाटतं मनोरंजनाचा भाग काही काळापुरता बाजूला ठेवून सामाजिक जाणीव जागृतीचा नवीन ट्रेंड जर युवकांनी सोशल मीडियावर लोकप्रिय केला तर येणारा काळ नव्या युगाचा असेल, यात तिळमात्र शंका नाही. नाहीतरी रौप्य महोत्सव,सुवर्ण महोत्सव आपण साजरे करतच असतो. त्यानंतर सर्व विसरून नव्या ट्रेंडच्या शोधातही असतो.

First Published on: January 30, 2022 6:00 AM
Exit mobile version