ऐका पुढल्या हाका !

ऐका पुढल्या हाका !

तौक्ते चक्रीवादळाने नुकतीच कोकणासहित भारताच्या पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा दिला, लक्षद्वीप बेटांच्या जवळ उगम झालेले हे वादळ केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला झोडपत अवघ्या पाच दिवसांत गुजरातमध्ये धडकले. 19 मेपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मिळून अठ्ठावन्नजण मृत्युमुखी पडले तर शंभरजण बेपत्ता होते. किनार्‍यावरील शेकडो मच्छीमारी बोटी वादळात उध्वस्त झाल्या. सुमारे आठ हजार घरांचे नुकसान झाले. हजारो झाडे पडली, शेकडो विजेचे खांब कोसळले. आंबा बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. अतितीव्र चक्रीवादळाच्या इशार्‍यामुळे गुजरातमध्ये सुमारे दोन लाख लोकांचे वादळापुर्वी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागले. यासारखीच भयानक परिस्थिती मागील वर्षी, 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात निर्माण झाली होती. अरबी समुद्रात केरळच्या पश्चिमेला निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील दिवेआगार जवळ धडकले.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पन्नास हजार एकरांतील शेती आणि बागायतींचे नुकसान झाले. साडेतीन हजार घरांचे पूर्ण नुकसान झाले तर अडीच लाख घरांची काही प्रमाणात पडझड झाली. वीज वितरण व्यवस्थेचे सुमारे दीडशे कोटींचे नुकसान झाले. महाराष्ट्रातील एकूण नुकसानीचा आकडा सहा हजार कोटींच्या घरात पोहोचला. सुदैवाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली नाही. निसर्ग चक्रीवादळापूर्वी एक वर्ष आधी म्हणजे 2019 मध्ये क्यार नावाचे चक्रीवादळ कर्नाटकच्या पश्चिमेस अरबी समुद्रात उगम पावून भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने मार्गक्रमण करीत होते, परंतु ऐनवेळी मार्ग बदलून ते आखाती देशांच्या दिशेने गेले. यामुळे सुदैवाने त्यावर्षी मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी टळली तरी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने गुजरातमध्ये लाखो शेतकर्‍यांच्या भुईमूग आणि कपाशीच्या पिकांची हानी झाली तर कर्नाटकात पाच जणांचा मृत्त्यू झाला.

अजूनपर्यंत भारताची पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टीपेक्षा चक्रीवादळांपासून सुरक्षित मानली जायची, परंतु मागील काही वर्षांपासून या परिस्थितीत बदल होत असल्याचे अनुभवास येत आहे. 2019 ते 2021 या तीन वर्षांत पश्चिम किनारपट्टीवर परिणाम करणारी क्यार, निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळे ही या बदलत्या परिस्थितीची निदर्शक आहेत. उत्तर हिंदी महासागरात निर्माण होणार्‍या पाच वादळांपैकी चार बंगालच्या उपसागरात होत तर एक अरबी समुद्रात होई, परंतु मागील काही वर्षांत अरबी समुद्रात निर्माण होणार्‍या चक्रीवादळाच्या संख्येत वाढ झाली आहे. अरबी समुद्रात 2018, 2019 आणि 2020 साली अनुक्रमे तीन, पाच आणि दोन चक्रीवादळांचा उगम झाला तर त्याच वर्षी बंगालच्या उपासागरात निर्माण होणार्‍या चक्रीवादळांची संख्या अनुक्रमे चार, तीन, तीन अशी होती.

या बदलांमागील मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्राच्या पृष्ठीय तापमानात झालेली वाढ. बंगालच्या उपसागराचे पृष्ठीय तापमान पूर्वी अरबी समुद्राच्या पृष्ठीय तापमानापेक्षा 1 ते 2 अंशांनी अधिक असायचे, परंतु मागील काही दशकांत जागतिक तापमानवाढ आणि वातावरणीय बदलांमुळे अरबी समुद्राच्या पृष्ठीय तापमानात 1.2 ते 1.4 अंशांनी वाढ झाली आहे. ही वाढ अशीच सुरू राहिली तर अरबी समुद्रात उगम पावून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकणार्‍या चक्रीवादळांच्या संख्येत मोठी वाढ होईल. प्रचंड वेगाने वाहणारे वारे, अतिवृष्टी, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, किनार्‍यावर होणारा लाटांचा मारा या सर्व कारणांमुळे घरे, झाडे, फळबागा यांची पडझड, बोटींचे नुकसान, किनार्‍या लगत जमिनीची धूप, समुद्राचे पाणी घुसल्याने क्षारमय होणार्‍या शेतजमिनी अशा सर्व गोष्टी घडतील. साहजीकच या चक्रीवादळांमुळे कोकणासहित पश्चिम किनारपट्टीवर राहणार्‍या कोट्यवधी लोकांच्या जीवित आणि वित्तीय सुरक्षेस गंभीर धोका पोहोचेल आणि हे घडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच असेल कारण जागतिक तापमानवाढ आणि वातावरणीय बदल यांना माणसाकडून होणारे कार्बन उत्सर्जनच कारणीभूत आहे.

माणसाकडून होणार्‍या या कार्बन उत्सर्जनामुळे जगभरातील चक्रीवादळांप्रमाणे अवर्षण, आकस्मिक पूर, अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, वणवे आणि हिमवादळे यांसारख्या टोकाच्या वातावरणीय घटनांमध्ये देखील वाढ होईल. ज्यांच्यामुळे माणसांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर, अन्नधान्याचा तुटवडा, उपासमार, रोगराई यांसारखे दुष्परिणाम दिसून येतील. कार्बन उत्सर्जनाचे दीर्घकालीन दुष्परिणामदेखील होत आहेत जसे वाढणार्‍या तापमानामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ, अंटार्क्टिका, ग्रीनलंडमधील वितळणारे बर्फाचे थर, समुद्राच्या पाण्याच्या आम्लतेत होणारी वाढ, पर्माफ्रॉस्टमधील बर्फाचे वितळणे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणार्‍या वाढीमुळे मालदिवसारख्या बेटांचे अस्तित्व धोक्यात आलंय.

अंटार्क्टिका, ग्रीनलँडमधील वितळणार्‍या बर्फाच्या थरांमुळे समुद्राच्या पाण्याची पातळी तर वाढतेच आहे, पण सूर्याची उष्णता परावर्तित करणारे बर्फ वितळून त्याखालील जमीन उघडी पडल्यामुळे पृथ्वीवर शोषल्या जाणार्‍या उष्णतेत भर पडत आहे. समुद्राच्या पाण्याचे वाढते तापमान आणि आम्लता यामुळे प्रवाळांची बेट मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. या प्रवाळांच्या बेटांवर मोठ्या प्रमाणात समुद्री जीवसृष्टी अवलंबून असते. ऑस्ट्रेलियाचे ग्रेट बॅरीअर रीफ हे याचे ठळक उदाहरण आहे. पर्माफ्रॉस्ट वितळल्याने कार्बनडायऑक्साईड आणि मिथेन हे वायू मुक्त झाल्याने जागतिक तापमानवाढीत आणखी भर पडत आहे. आर्क्टिक प्रदेशातील बर्फ वितळल्याने ध्रुवीय अस्वलांचा निवास नष्ट होत आहे.

थोडक्यात अरबी समुद्रातील वाढणारी चक्रीवादळे ही जागतिक तापमानवाढ आणि वातावरणीय बदल यांच्यामुळे मानवावर आणि सजीव सृष्टीवर ओढवणार्‍या संकटांचाच एक भाग आहेत. या संकटांपासून वाचण्याचा उपाय केवळ माणसाच्या हाती आहे. त्याकरिता वैयक्तिक, सामुदायिक, संस्थात्मक आणि सरकारी पातळीवर कार्बन उत्सर्जनात घट करण्याच्या उपाययोजना प्रामाणिकपणे आखण्याची आणि त्यांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. सध्या प्रत्येक व्यक्तीच्या दैनंदिन वापरातील बहुतेक वस्तू या कुठल्या न कुठल्या यंत्रावर बनतात. ही यंत्र वीजेवर चालतात. वीजनिर्मितीकरिता ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू यांसारख्या अश्मिभूत इंधनांना जाळून मिळवली जाते. या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते. तसेच या वस्तू आणि त्या बनविण्याकरिता लागणारा कच्चा माल यांच्या साठवणूक, वाहतूक यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते.

याचा अर्थ असा होतो की आपण जितक्या अधिक वस्तूंचा आपल्या जीवनात वापर करणार तितका कार्बन उत्सर्जनास आपण अधिक हातभार लावणार आणि त्या अनुषंगाने जागतिक तापमानवाढीस कारणीभूत होणार. यामुळे वापरा आणि फेका, शॉप टील ड्रॉप या संकल्पनांचा लवकरात लवकर सर्वांनी त्याग करण्याची गरज आहे, कमीत कमी वस्तूंची खरेदी आणि वापर करण्याची आवश्यकता आहे. तसेच अनावश्यक विजेचा, उपकरणांचा वापर टाळला पाहिजे. प्रवासाकरिता सार्वजनिक वाहतूक साधनांचा उपयोग केला पाहिजे. या बरोबर मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, जंगलतोड थांबवली पाहिजे. मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली पाहिजे, जंगलाचं, पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. शाळेत जाणार्‍या मुलांच्या मनावर पर्यावरण रक्षणाचं महत्त्व बिंबवलं पाहिजे.

माणूस हा त्याच्या पर्यावरणाचा एक भाग आहे. माणसाचं अस्तित्व हे त्याच्या पर्यावरणाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. मानवी संस्कृतीचा विकास मागील दहा हजार वर्षांत झाला. कारण पर्यावरणीय परिस्थिती त्यास अनुकूल होती. पृथ्वीचा जन्म सुमारे साडेचारशे कोटी वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर शंभर कोटी वर्षांनी अनुकूल परिस्थितीत पृथ्वीवर पहिला जीव जन्मास आला. त्या एका जीवापासून साडेतीनशे कोटी वर्षे उत्क्रांत होत होत आजच्या घडीला या पृथ्वीवर सुमारे सत्त्याऐंशी लक्ष सजीवांच्या प्रजाती अस्तित्वात आल्या आहेत. माणूस हा त्या सत्त्याऐंशी लक्ष प्रजातींपैकी केवळ एक प्रजाती आहे, इतकी जैवविविधता असलेला पृथ्वी हा अवघ्या विश्वातील एकमेव ग्रह आहे. या जीवसृष्टीचं वैविध्य टिकविण्यास आपण सारे हातभार लावूया कारण त्यावरच आपलं, माणसाचंही अस्तित्व अवलंबून आहे.

–डॉ. मंगेश सावंत 

First Published on: May 22, 2021 8:26 PM
Exit mobile version