जे. कृष्णमूर्तींचं तत्त्वज्ञान जगणार्‍या शाळा

जे. कृष्णमूर्तींचं तत्त्वज्ञान जगणार्‍या शाळा
– सचिन जोशी 
जे. कृष्णमूर्ती आणि त्यांचं तत्त्वज्ञान हा व्यासंगाचा विषय आहे. समजायला काहीसं कठीण तत्त्वज्ञान पण समजून अमलात आणण्याचा प्रयत्न केला की जगणं अनेक अर्थांनी कळून येतं आणि एका विलक्षण आनंदाचे आपण धनी होतो. जे. कृष्णमूर्ती कधी चौकटबद्ध शाळेत रमलेच नाहीत. लहानपणाचा हा अनुभवच मोठं झाल्यावर शाळा आणि तुरुंग या दोन्ही ठिकाणी बळजबरीने टाकावं लागतं. स्वत: कोणी जात नाही, या शब्दांत व्यक्त झाला आहे. हे अगदीच खरं असलं तरी त्यांच्या सदर वाक्याने धक्काच बसतो. थोडा जास्त विचार केल्यावर प्रश्न पडतो आधी ‘तुरुंगा’ची निर्मिती झाली की ‘शाळे’ची? असा एक विचारप्रवाह आहे की आधी तुरुंगाची निर्मिती झाली. जेलच्या सिस्टीममधूनच आताच्या शाळांची रचना बनली असावी. याला अपवाद म्हणजे काही शतकांपूर्वीची ‘गुरुकुल पद्धत.’
तुरुंगामध्ये जेलर असतो, कैद्यांना युनिफॉर्म असतो. वागण्याचे कडक नियम असतात. शाळांमध्ये मुख्याध्यापक असतात. विद्यार्थ्यांना गणवेश असतो. विविध नियमांनी बांधलेलं अतिशय बंदिस्त वातावरण असतं. दोघांचा उद्देश व्यक्तिपरिवर्तन असला तरी मूलभूत फरक हा आहे की तुरुंगात व्यक्ती गैरमार्गावर गेल्याने येते तर शाळेत मुलांना ती गैरमार्गाने जाऊ नयेत म्हणून टाकण्यात येतं. तिथे त्यांच्या मनावर काम केलं जातं. मुलांच्यात जे उत्तम दडलेलं असतं ते सामर्थ्य बाहेर काढून उपयोगात आणायला शिकवलं जातं. म्हणूनच समाजात तुरुंगांची संख्या कमी व्हायला हवी असेल तर शाळांची संख्या वाढायला हवी. मात्र जे. कृष्णमूर्तींच्या मनात असणार्‍या शाळा या मोकळ्या शाळा असाव्यात. त्यांनी अशा सात निवासी शाळा निर्माण करून दाखवल्या आणि चालवल्या. त्यापैकी पाच भारतात आहेत. जिथे मुलं मोकळा श्वास घेत स्वयंशिस्तीने वाढतात.
द स्कूल – चेन्नई
ऋषी व्हॅली स्कूल – मदनपल्ली, चित्तूर
सह्याद्री हायस्कूल – महाराष्ट्र
राजघाट बेसंट स्कूल – वाराणसी
द व्हॅली स्कूल – बंगलोर
या शाळा अगदी आगळ्यावेगळ्या आहेत. इथे मुलांचा ‘मी’ लुप्त होतो आणि त्यांना ‘स्व’ सापडतो. त्यांचा खर्‍या अर्थाने आत्मविकास होतो. ती उत्तम माणूस म्हणून जगायला तयार होतात. शिक्षणाचा हाच तर उद्देश असतो. तिथे मेंदूचा एकांगी विकास होत नाही. कारण प्रचलित शिक्षण पद्धतीचं उपयोजन तिथे नाही. वयानुसार विचारांचं आकलन करण्याची मुभा तिथे विद्यार्थ्यांना दिली जाते.
कृष्णमूर्तींनी 75 वर्षांपूर्वी ज्या शाळा काढल्या त्यात आठवीपर्यंत परीक्षा नव्हती. शिक्षा करायला बंदी होती. कृष्णमूर्ती अत्यंत सखोल विचार करून या निष्कर्षापर्यंत आले होते की, ‘आजचं शिक्षण मुलांना फक्त काय विचार करा ते शिकवतं, पण कसा विचार करा याबद्दल काहीच सांगत नाही.’ मग त्यांच्या शाळांत नक्की काय केलं जातं? तिथे कृष्णमूर्तींचे विचार शिकवले जातात का? बिलकुल नाही. त्यांना जे मुलांनी करणं अपेक्षित आहे ते तिथे सहजपणे करून घेतलं जातं. कृष्णमूर्तींचं साहित्य मुलांनी वाचावं अशीही त्यांच्या वयाचा विचार करता काही अपेक्षा नसते. मुलांना पूर्ण स्वातंत्र्य असतं. इतकंच काय तर जे. कृष्णमूर्तींचे विचारसुद्धा विद्यार्थ्यांवर लादले जात नाहीत.
या सगळ्या शाळा निसर्गरम्य ठिकाणी आहेत. धरणाच्या ठिकाणी, उंच टेकडीवर, वाराणसीच्या शाळेत तर गंगानदी खिडकीतून दिसते. शाळांत रोज सूर्यास्त पाहण्याचा कार्यक्रम असतो. त्याला ‘अस्ताचल’ म्हणतात. मुलं मेडिटेशन करतात. रविवारी सकाळी पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडतात. आपल्याकडे असेंब्ली असते. त्याऐवजी तिथे मुलं गोलाकार बसून पेटी, तबल्यात रममाण होतात. भजनं म्हणतात. शिकवण्याची पद्धतही वेगळी असते. शिक्षकांबद्दल भीती हा प्रकार नसतो. मुलांच्या आणि शिक्षकांच्या राहायच्या खोल्याही एकाच ठिकाणी असतात. संध्याकाळी मुलं शिक्षकांबरोबर व्हॉलीबॉल खेळतात. मुलं सातत्याने प्रश्न विचारतात. शिक्षक त्यांना थांबवत नाहीत. शिक्षकांपेक्षा मुलं जास्त बोलतात. इथले शिक्षक बीएड्, डीएड्. पदव्या मिळवून आलेत असं नाही. विविध क्षेत्रातले ते तज्ज्ञ असतात.
कला, क्रीडा, नृत्य, मातीकाम यांना या शाळांच्या वेळापत्रकात मोठं स्थान आहे. एकेक थीम घेऊन मुलांकडून काम करून घेतलं जातं. उदाहरणार्थ एक वर्ष पूर्ण रवींद्रनाथ टागोरांवर काम. मातीकामावर शाळेत खूप भर असतो. अभिव्यक्ती सामर्थ्य कसं वाढेल हे पाहिलं जातं. मुलांच्या इंग्रजी कवितांची पुस्तकं काढली जातात.
राजगुरूनगर इथल्या सह्याद्री स्कूलला मी एकदा भेट दिली होती. त्यावेळी 10 दिवसांनंतर शाळेचं स्नेहसंमेलन होतं. अनेक शाळांमध्ये तो शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चाललेला इव्हेंट असतो, पण इथे प्रकार वेगळा होता. मूलच कार्यक्रमात संगीत देतात, स्वत: वाद्य वाजवतात. त्यांची वेशभूषा साधीसुधी असते, भपकेबाज नसते. साऊंड सिस्टीम, प्रकाशयोजना सगळ्या गोष्टी विद्यार्थीच हाताळत होते. रंगमंचावरील आणि पाठीमागील कलाकारांना सारखंच महत्त्व दिलं जात होतं. तिथे स्नेहसंमेलनाला दरवेळी एक विशिष्ट थीम असते. यावेळी ‘साहित्य’ थीम निवडलेली होती. जे. कृष्णमूर्ती आणि त्यांचे मित्र अच्युत पटवर्धन यांच्या अथक परिश्रम आणि अनेकांच्या सहकार्यामुळे 1995 साली ही शाळा निर्माण झाली. अर्थातच अनुभवाधारित शिक्षण इथे मिळतं. राजगुरूनगरच्या तिवई टेकडीवर वसलेली ही शाळा आयसीएससी बोर्डाशी संलग्न आहे. वेळापत्रकात न बसणार्‍या या शाळेत मोठ्या मुलांसाठी सहली, 10 दिवसांच्या शिबिरांचं आयोजन केलं जातं.
सह्याद्री शाळा आणि स्टडी सेंटर या दोघांसाठी लागणारं कॅम्पस तिथे आहे. स्टडी सेंटरमध्ये सशुल्क राहण्याची सोय आहे. या सह्याद्री स्कूलमध्ये जगाचा अभ्यास करताना मुलं स्वत:चं जग निर्माण करतात. सह्याद्री शाळेत शेतीविषयक बरंच काम चालतं. वैद्यकीय शिबिरं घेतली जातात. शाळेद्वारे जैवविविधता, अ‍ॅग्रोइकॉलॉजी या क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. सह्याद्री शाळा आर्थिकदृष्ठ्या स्वायत्त आहे.
जे. कृष्णमूर्तींच्या सर्व शाळांमध्ये निसर्ग शिक्षणावर भर असतो. आजचं बालमेंदू मानसशास्र हेच सांगतं की, मुलं जेवढी निसर्गाच्या संपर्कात राहतील तेवढा त्यांच्या मेंदूच्या पेशींचा विकास होतो, सिनॅप्सची निर्मिती होते. हा सगळा शोध या 20 वर्षांमधला आहे, पण जे. कृष्णमूर्तींनी 75 वर्षांपूर्वीच निसर्गाशी मैत्रीचं हे तत्त्वज्ञान विद्यार्थ्यांसाठी उपयोगात आणलं आहे. प्रत्येक शाळेजवळ शेती आहे. मुलं तिथे जाऊन काम करतात. संगणक ते शेती सर्वकाही तिथे आहे. पुढे नोकर्‍यांसाठी या मुलांची निवड अधिक प्रमाणात होते. का? तर त्यांची ‘स्व-आकलन क्षमता’ जास्त असते. सगळ्या कृतीमागे त्यांचा स्वत:चा स्पष्ट विचार असतो. ती कधी पोपटपंची करीत नाहीत. या शाळांमध्ये हाऊ टू थिंक शिकवलं जातं.
कृष्णमूर्ती म्हणत, ‘गुरू-शिष्य या रूढ परंपरेत अधिकाराचं अस्तित्व असतं. गुरू अधिक ज्ञानी, तो शिष्याला अधिकारवाणीने काही समजावून सांगतो आहे असं चित्र तिथे निर्माण होतं.’ ते या चित्राला शह देतात. त्यांच्या मते गुरू-शिष्य एकाच पातळीवर असतात. एकमेकांना प्रश्नामागून प्रतिप्रश्न विचारत मुळापर्यंत जातात. त्यातून उत्तराचा, बोधाचा उदय होतो. ते दोघंही त्या प्रकाशात एकदम उजळून निघतात. पारंपरिक गोष्टींना छेद देणारं समजायला काहीसं कठीण, मात्र अतिशय महत्त्वपूर्ण असं हे विधान आहे. त्यांचा धर्मशीलतेचा अर्थ धर्मनिरपेक्षतेला पुरून उरणारा आहे. त्यांची जीवनदृष्टी सर्व धार्मिक सांप्रदायांपेक्षा नवीन आहे. ‘सुबोध संवाद’ या पुस्तकात विद्यार्थी आणि शिक्षक यांना पडलेल्या प्रश्नांचा वेध घेत कृष्णमूर्ती बारीकसारीक विचारांनिशी त्यांचं तत्त्वज्ञान उलगडत जातात. ते लक्षात घेण्याच्या प्रयत्नात आपण आपोआप परिपक्वतेच्या दिशेने जाऊ लागतो. क्लिष्ट विषय उदाहरणांनिशी सोपा करीत सांगण्याची त्यांची धाटणी लक्षणीय आहे. सगळ्या तत्त्वज्ञानाचा पाया ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि, तोडूनि किंवा फोडूनि टाका’ आणि ‘नव्या मनूतील नव्या युगाचा शूर शिपाई होऊन नवं निर्माण करा,’ हे सांगणारा आहे.
डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी कृष्णमूर्ती आणि त्यांचा लहान भाऊ नित्यानंद यांचा लहानपणापासून सांभाळ केला. त्यांनी खासगीरित्या नामांकित शिक्षकांकरवी इंग्लंडमध्ये कृष्णमूर्तींचं शिक्षण पूर्ण करून घेतलं. माहिती म्हणजे शिक्षण नव्हे हे ते आवर्जून सांगतात. ‘पाहावं कसं’ हे स्पष्ट करून सांगताना त्यांनी जे विवेचन केलं आहे ते वैशिष्ठ्यपूर्ण आहे. निसर्ग कसा पाहायचा, पक्ष्यांचं बोलणं कसं ऐकायचं हे विद्यार्थ्यांना समजावताना निरीक्षण, लक्षपूर्वक ऐकणं यावर ते भर देतात. ते म्हणतात, तुम्ही जेव्हा लक्षपूर्वक पाहता तेव्हा वस्तू तुम्हाला अधिक स्पष्ट दिसतात. लक्षपूर्वक ऐकता तेव्हा पक्ष्यांचं गाणं तुम्हाला पुष्कळ स्पष्ट ऐकू येतं. सौंदर्याबरोबरच कुरूपपणा कसा आहे हेही पाहायला शिका, मोकळं व्हा, मोकळं जगा, मोकळं बोला. मोठं झाल्यावर तुम्ही समाज बदलायला हवा, तुम्ही आणि मी मिळूनच समाज बनतो. म्हणून तुम्ही स्वत:च बदलायला हवं. विशेषत्वाने स्वत:ची संवेदनशीलता जपायला हवी.
आज चर्चेत असलेला मुलांचा भावनिक बुद्ध्यांक याच सार्‍या बाबींकडे अंगुलीनिर्देश करतो. सर्वसामान्य न होता ‘विशेष व्यक्ती’ होण्यावर त्यांचा भर आहे. जेव्हा खरीखुरी विज्ञाननिष्ठा आणि धर्मशीलता यांचा संगम होतो तेव्हाच मनुष्य खर्‍या अर्थाने ‘मनुष्य’ बनतो. समाजाच्या जखडबंद पठडीत न सापडणारं नवं स्फोटक मन निर्माण करणं हाच शिक्षणाचा उद्देश आहे, असं ते म्हणतात.
संवेदनशीलता आणि संवेदनेतला फरक कृष्णमूर्ती समजावतात. विसंगती झटकून प्रथम मन स्वच्छ करायला हवं, असं ते म्हणतात. ‘जे आहे ते’ हा जीवनाचा अर्थ मग लक्षात येऊ लागतो. वरवर सोपं नि सोप्या शब्दांतलं असं ठरणारं हे तत्त्वज्ञान उमगायला कठीण आहे. वस्तुस्थितीचा स्वीकार फार पुढची गोष्ट! ‘शिकवणं ही सर्जनशील कृती आहे,’ हे आवर्जून शिक्षकांना सांगताना मुलांना पुस्तकं वाचून शिकायला आवडत नाही, तो रस निर्माण करणं हे तुमचं कौशल्य आहे, असं सांगून कृष्णमूर्ती म्हणतात, सगळंच बहरू द्या. फक्त सौंदर्य नव्हे तर अगदी मत्सरासारख्या भावनासुद्धा बहरू द्या.  कशालाही नकार नाही, काहीही दडपलं जात नाही, कशावरही नियंत्रण नाही. हेच फार मोठं शिक्षण आहे, नाही का?  अगदीच खरं आणि पटण्यासारखं आहे सगळं! फक्त निराळं आणि आपल्याला ते नीट समजून घेता आलं पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत नेता आलं पाहिजे, कठीण असलं तरी अशक्य काहीच नसतं.
पण हे सगळं साध्य करण्यासाठी मुळात शिक्षक-पालकांची मानसिकता बदलावी लागेल. नवे विचार आणि बदल हे सगळे प्रयोगशीलतेचे चोचले श्रीमंतांच्या मुलांसाठी अशी धारणा आहे. कारण आजकाल शाळांच्या लेखी मुलं म्हणजे कस्टमर आणि त्यांची फी लाखोंमध्ये आहे. सर्वांना हे कसं परवडणार? शाळाबाह्य मुलांना स्थिर करून त्यांच्यासाठी हे प्रयोग करता येतील का? येतील की! या प्रयोगांचं सार्वत्रिकीकरण व्हायला हवं. श्रीमंतांच्या असल्या तरी त्या प्रयोगशील शाळा आहेत. आपल्याला फक्त सेतू बांधणं जमायला हवं. सरकारी शाळांची कामं वेगळीच असतात आणि तिथली मंडळी त्यांच्या जागी काम करतात.
यात देवाणघेवाण झाली पाहिजे. सरकारी शाळा नियमांनुसार चालतात ठीक आहे, पण मुलांना रोज सूर्यास्त बघायला लावणं याला कागदावरचा नियम कशाला हवा? सूर्य आणि मुलं आपापल्या जागी सारखेच मोकळे आणि स्वतंत्र आहेत. असेंब्लीमध्ये वाद्यांचा वापर कोणत्याही शाळांतून होऊ शकतो. शिक्षक-विद्यार्थ्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध कुठेही प्रस्थापित होऊ शकतात. कला शिक्षणासाठी शाळांना एक वेगळी गुंतवणूक करावी लागेल. एकीकडे कला शिक्षक कमी करण्याची चर्चा चालू होती ती थांबवावी लागेल. सगळीकडे निसर्गरम्य शाळा काढणं शक्य नसलं तरी मुलांना निसर्गरम्य ठिकाणी आपण नेऊ शकतो. कृष्णमूर्ती शाळांमध्ये आठवीपर्यंत परीक्षा नाहीत तरी विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम असते. का? दर आठवड्याला तिथे विद्यार्थ्यांच्या आकलनाचा ऊहापोह होतो. शिक्षकांनाही वैचारिकदृष्ठ्या समृद्ध करण्यासाठी ज्येष्ठ शिक्षकांकडून प्रयत्न होतात.
एक कृष्णमूर्ती जर्नल असतं. शिक्षकांच्या नवीन उपक्रमांचा त्यात समावेश केला जातो. चेन्नईच्या द स्कूलमध्ये एक प्रयोग करण्यात आला. त्यासाठी खरंतर हिंमतच लागते. या प्रयोगाचं नाव आहे ‘मिक्स एज ग्रुप लर्निंग’ म्हणजे इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी एकाच वर्गात एकत्र शिकतील. तेसुद्धा समान संख्येने. म्हणजे वर्गात जर 20 विद्यार्थी असतील तर ते चौथीच्या पाच-पाच विद्यार्थ्यांचा समावेश असेल. यामागचा उद्देश असा आहे की मोठ्या विद्यार्थ्यांकडून लहान विद्यार्थी शिकत असतात. या शाळांमधली ग्रंथालयं समृद्ध आहेत. आपल्याकडे ही गुंतवणूक झाली पाहिजे. तिथे पक्षी निरीक्षण विषय आहे. पाठांचं नाट्यीकरण करायला विद्यार्थ्यांना वाव मिळतो. आपल्या निवासी आश्रमशाळा आणि कृष्णमूर्तींच्या निवासी शाळा यात साम्य असायला काय हरकत आहे? आश्रमशाळांवर आपण खर्च करतोच, मग त्या शाळा तशा का नाहीत? त्यांच्यासाठी कृष्णमूर्ती शाळा आदर्श ठरल्या पाहिजेत. आश्रमशाळांतल्या शिक्षकांना त्या दाखवल्या पाहिजेत. सेतू बांधणीचा हा प्रयोग झाला पाहिजे. सरकारने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या सर्व गोष्टींचा विचार केला आहे. भारतात जेवढ्या काही प्रयोगशील शाळा आहेत त्या शाळांच्या प्रयोगशीलतेचं सार्वत्रिकीकरण होणं ही काळाची गरज आहे. जे. कृष्णमूर्तींसारख्या विचारवंतांनी जो मूलभूत बदल सांगितला आहे तीच उद्दिष्टे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तुम्हाला सापडतात.
प्रश्न आहे त्यांच्या अंमलबजावणीचा! ती साधली तर भविष्य उज्ज्वल आहे.
सह्याद्री शाळेची वेबसाईट- https://www.sahyadrischool.org./

जे. कृष्णमूर्तींच्या शाळा आगळ्यावेगळ्या का?

  1. 1. त्यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित शाळा पण त्यांचे विचार लादत नाहीत.
  2. निसर्गाशी एकरूपता
  3. शिक्षकांशी मोकळा संवाद
  4. मुलांच्यात स्वत:चं जग निर्माण करण्याची क्षमता निर्माण होते.
  5. गुरू-शिष्य समान पातळीवर या आगळ्या तत्त्वज्ञानाची रुजवात
  6. सारेच बहरू द्या या वेगळ्याच आशयाची ओळख
  7. दर आठवड्याला विद्यार्थी सूर्यास्त पाहायला टेकडीवर जातात.
First Published on: April 21, 2024 5:15 AM
Exit mobile version