मार्ग दावूनी गेले आधी..

मार्ग दावूनी गेले आधी..

कार्ल मार्क्स

जगभरातील क्रांतिकारी विचारवंतात ठळक नाव येतं ते कार्ल मार्क्सचे. मानवी इतिहासात नुसतं अर्थशास्त्रच नव्हे तर आयुष्याच्या विविध पैलूंना एकत्र बांधणारी सुसूत्र विचारप्रणाली निर्माण करण्याचं काम मार्क्सच्या सिध्दांताने केले आहे. मार्क्सनं आतापर्यंतच्या इतिहासाचे प्रिमिटिव्ह कम्युनिझम, गुलामगिरी, सरंजामशाही आणि भांडवलशाही हे टप्पे मानले. प्रिमिटिव्ह कम्युनिझम या पहिल्या टप्प्यात माणूस टोळ्या टोळ्यांनीच हजारो वर्षे एकत्र राहत होता. त्यावेळी लोकशाही, कुटुंबव्यवस्था, वारसाहक्क, धर्म आणि नीतिमत्ता यांच्याविषयीच्या फारशा कल्पनाच नव्हत्या. यानंतर जेव्हा सर्वांना पुरुन उरेल. असं वरकड उत्पन्न व्हायला लागलं. तेव्हा त्यावर कब्जा मिळवण्यासाठी एका गटानं दुसर्‍यावर वर्चस्व गाजवायला सुरवात केली. त्यातूनच वर्गव्यवस्था निर्माण झाली.

यालाच जोडून मग गुलामगिरी, सरंजामशाही आणि भांडवलशाही हे इतिहासातले टप्पे तयार झाले. वरकड उत्पन्नाच्या लुटीवर पर्यायाने वर्गव्यवस्थेवर आधारलेली उत्पादन व्यवस्था किंवा अर्थव्यवस्था या समाजाचा भौतिक पाया बनल्या. याच पायाप्रमाणे मग नंतर दर टप्प्यात सर्व राज्यव्यवस्था, धर्म, कुटुंब व्यवस्था, नीतिमत्ता, कला, संस्कृती यांचा डोलारा बदलत गेला. 1851 ते 1865 या काळात प्रदीर्घकाळ लिहिल्या गेलेल्या मार्क्सच्या ‘दास कॅपिटल’ या ग्रंथाच्या ‘थिअरीज ऑफ सरप्लस व्हॅल्यू’ या चौथ्या खंडात हे मानवी इतिहासाचा वेध घेणारं विस्तृत विवेचन येतं. ‘पूर्वीपासून भांडवल जमा झालंय तेच मुळी रक्तात चिंब थिजून!’ अशी थेट मांडणीही मार्क्सने केली आहे. मार्क्सची हीच मांडणी त्याच्याही शतकभर अगोदर बेंजामिन फ्रँकलिन यांनी केली आहे. दोन वस्तूंची जेव्हा देवाण घेवाण होते. तेव्हा त्या दोन वस्तूंच्या एक्स्चेंज व्हॅल्यूज या त्यात दडलेल्या श्रमांच्या प्रमाणात असतात. स्मिथ, डेव्हिड रिकोर्डो यासह जगभरातील सगळ्याच सामाजिक राजकीय आर्थिक मंडळींचं यावर एकमत झालं.

युरोपात श्रममूल्यांना केंद्रस्थानी ठेवून कामगारांची चळवळ फोफावत असताना त्याच शतकात भारतात जोतीराव फुले हा महात्मा व्यवस्थेविरोधात आसूड उगारुन शेतकर्‍यांच्या दैन्यावस्थेची कारणे मांडीत होता. हा नुसताच ऐतिहासिक योगायोग नाही. तर एका दाण्याचे हजार दाणे देणार्‍या शेतीची लूट करणार्‍यांविरोधातला तो विद्रोह होता.

महात्मा फुले
म. जोतीराव फुले यांनी 1883 मध्ये आपला ‘शेतकर्‍याचा आसूड’ हा ग्रंथ लिहिला आणि शेतकर्‍यांच्या शोषणाला वाचा फोडली. शेतकर्‍यांचे आयुष्य दीनवाणे करण्यामागे त्यांचे धार्मिक, सांस्कृतिक, सावकारशाही, नोकरशाही आणि साम्राज्यशाही शोषण जबाबदार असल्याचे त्यात त्यांनी म्हटले आहे. त्या सोबतच वाढती लोकसंख्या, तिचा शेतीवर पडणारा बोजा, या स्थितीत घटत जाणारी जमीनधारणा, वाढती बेरोजगारी, नापिकी, रोगकिडी, रानडुकरे यांच्यासह विविध प्रकारच्या मध्यस्थांपासून होणारे शोषण यामुळे शेतकरी दु:स्थितीत सापडला आहे. हीही कारणे सांगितली आहेत. या सगळ्या अरिष्टामागे ज्ञानाचा अभाव हेच प्रमुख कारण असल्याचे जोतीराव सांगतात. शेतकरी अज्ञानी व अक्षरशून्य असल्यामुळे आपल्या पिळवणुकीचे कारण तो जाणू शकत नाही. त्याला आत्मस्थितीचे ज्ञान आधुनिक विद्या संपादन केल्याशिवाय होणार नाही.

विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली
नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ
एका अविद्येने केले

जोतीरावांनी श्रम करणारा शेतकरी हा आपल्या विचारांचा केंद्रबिंदू ठरवला होता. या शेतकर्‍यांनी शेती कशी विकसित करावी याबाबत उपाययोजना पुस्तकातून सुचविली. बाजारातील विषम व्यापारशर्तीमुळे शेतकरी लुटला जात होता. स्वातंत्र्योत्तर काळातही भारतीय शेतकर्‍यांची बाजारात लूट होतच राहिली. ‘शेतमालाचे भाव बांधून द्या‘ ही मागणी करीत भारतातील वेगवेगळ्या प्रांतात शेतकर्‍यांच्या चळवळी उभ्या राहिल्या. 1983 साली महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचे नेते शरद जोशी यांनी फुल्यांना मानाचा शतकाचा मुजरा केला.

महात्मा गांधी
भारतीय जनमानसाची नस ज्यांनी ओळखली होती असे स्वातंत्र्य चळवळीतील जगन्मान्य नेतृत्व म्हणजे महात्मा मोहनदास करमचंद गांधी. गांधीजींना भारतीय समाज जीवन सर्व बाजूंनी माहीत होते. त्यांच्या कितीतरी लेखांमधून, भाषणातून त्यांनी शेतीच्या समस्येवर प्रकाश टाकला आहे. त्यांचे पुढील मुद्दे जर विचारात घेतले तर आपल्या लक्षात येईल की गांधीजींचे शेती आणि शेतकर्‍यांविषयीचे चिंतन किती सखोल होते.

-हिंदुस्थानातील शेकडा 80 पेक्षा अधिक लोकसंख्या शेतकर्‍यांची आहे. (1940 ची स्थिती) आपल्या जमिनीचा कस कसा वाढवावा आणि त्यातून अधिक उत्पादन कसे घ्यावे हे फक्त शेतकर्‍यालाच कळते. आपण कोठून, कसा फायदा मिळवू शकू आणि आपल्यावरील संकटावर मात कशी करावी, हे फक्त त्यालाच माहीत असते. लोकशाहीत शेतकरी हा राज्यकर्ता असावा.

-डोईजड खंड, बेकायदा वसुली, कधीच पुरे फिटले जाणार नाही असे कर्ज, निरक्षरता, भ्रामक समजुती आणि दारिद्य्रातून निर्माण होणारे रोग या सर्वांच्या भाराखाली तो चेंगरला गेला आहे. संख्येच्या दृष्टीने व आर्थिक दैन्याच्या दृष्टीने त्याचा पहिला क्रमांक येतो.

-मी स्वत: एक शेतकरी आहे. असा माझा दावा आहे. गिर्‍हाईकाने दिलेल्या किमतीचा फक्त एक हिस्सा धान्य पिकवणार्‍याच्या पदरात प्रत्यक्ष पडतो. जमीन कसणार्‍या शेतकर्‍याला आपल्या उत्पन्नाचे पुरेपूर मोल मिळते ना आणि गिर्‍हाईकाने दिलेली पै न पै शेतकर्‍याच्या खिशात जाते ना, हे पाहणे सरकारचे कर्तव्य आहे. ते पार पाडता येत नसेल तर सरकारने निघून जावे.

-खेड्यातील प्रत्येक उत्पादक आपल्या वस्तूंचे उत्पादन अलगपणे करीत असला तरी विक्रीसाठी त्या एकत्र करुन नफ्याचे वाटप करता येईल. खेड्यातील लोक तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली योजनापूर्वक काम करतील. कच्च्या मालाचा साठा एके ठिकाणी करुन तेथून सर्वांना माल पुरविला जाईल. लोकांमध्ये सहकाराची वृत्ती निर्माण झाल्यास श्रमविभागाला भरपूर वाव मिळेल आणि वेळाची बचत होऊन उत्पादनक्षमता वाढेल.

नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की कार्ल मार्क्स असो की महात्मा फुले वा महात्मा गांधी या माणसांनी उत्पादक घटकांचं शोषण कसं थांबेल आणि त्याच्यासहीत समष्टीचा सर्वांगीण विकास कसा होईल याचाच ध्यास घेतला. त्यांनी मार्ग दाखवून दिला. आपण आजतरी त्या मार्गावरुन चालत आहोत का, हा खरा प्रश्न आहे.

First Published on: April 18, 2021 5:00 AM
Exit mobile version