लेडी डेथ चारकोलचा झंझावात

लेडी डेथ चारकोलचा झंझावात

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला 40 दिवस उलटून गेले आहेत. यादरम्यान, लाखो युक्रेनी नागरिक देशोधडीला लागले तर हजारो सैनिक आणि सामान्य नागरिक या यु्द्धात मारले गेले आहेत. रशिया युक्रेनच्या वरचढ आहे. बलाढ्य सैन्यदल, फौजफाटा आणि अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे. पण तरीही युक्रेनियन सैनिक रशियाला पुरून उरतोय तो फक्त तोफगाळा, रॉकेट लाँचरच्या जोरावर नाही तर देशप्रेमाचं खूळ डोक्यात घेऊन पुरुष सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून युद्धभूमीत उतरलेल्या रशियाचा कर्दनकाळ ठरलेल्या रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादोमीर पुतीन आणि त्यांच्या थिंक टँकबरोबर रशियन सैनिकांची झोप उडवणारी युक्रेनियन स्नायपर ‘लेडी डेथ’ ‘चारकोल’च्या बहादुरीवर. आज जगभरात जेवढी पुतीन आणि झेलेन्स्की यांची चर्चा आहे त्याच्या कैकपटीने ज्यादा या लेडी स्नायपरचा उदोउदो होत आहे. कारण या लेडी डेथने आतापर्यंत या यु्द्धात 20 हून अधिक रशियन सैनिकांना यमसदनी पाठवले आहे.

यु्द्धनियमानुसार यु्द्धभूमीत स्नायपर किंवा सैनिक कर्त्यव्य बजावत असताना जगाला तिची ओळख होणे शक्य नव्हते. पण एका पत्रकाराने खांद्यावर 15 किलो रायफलचा बोजा घेऊन कामगिरीवर निघालेल्या चारकोलचा लपूनछपून तिच्या नकळत फोटो काढला अन् एका सेकंदात रशियन सैनिकांचा कर्दनकाळ असलेली चारकोल जगासमोर आली. वयाच्या पस्तीशीत असलेली, चेहरा मास्कने झाकलेल्या चारकोलची बॉडी लँग्वेज तिच्या त्या फोटोतून बरंच काही सांगून गेली आणि महिनाभरापासून आपल्या स्नायपर रायफलमधून कोसो अंतरावरून ऱशियन सैनिकांना अचूक निशाणा करत पहिल्याच शूटमध्ये त्याच्या डोक्याची शकले उडवणारी चारकोल जगासमोर आली आणि पुतीनच्याही नजरेस पडली. तेव्हापासून रशियन सैनिक तिच्या शोधात आहेत. तर ती उपद्रवी उंदरांना शोधून मारावं तसं रशियन सैनिकांना हूडकून त्यांचं काम तमाम करतेय. ती कधी कशी कुठे व कोणाला गाठेल याचा काही नेम नाही.

केव्हा या लेडी डेथची स्नायपर रायफल रशियन सैनिकाच्या मस्तकाचा वेध घेईल काहीच सांगता येत नाही. यामुळे रशियन सैनिक तिच्या नुसत्या नावानेच धास्तावले आहे. ती संथ गतीने वाहणार्‍या वार्‍यासारखी शांतपणे येते. पंधरा पंधरा तास एकाच पोझीशनमध्ये ती स्वत:ला सेट करते जेणेकरून शत्रूला तिची भनकही लागणार नाही आणि त्याच्या नकळत त्या सावजावर तुटून पडते. तिची प्रत्येक गोळी म्हणजे समोरच्याचा शेवटचा श्वास असंच युक्रेनमध्येच नाही तर रशियामध्येही बोललं जात आहे. एखाद्या ध्येयाने झपाटलेली व्यक्ती त्यातही स्त्री काय असते यांचं चारकोल हे जिवंत उदाहरण आहे. तिला काहीही करून रशियन सैनिकांना ठार करायचंय. कारण रशियन सैन्य युक्रेनमध्ये जो नरसंहार करत आहेत त्यानंतर त्यांना माणूस मानायला कोणीही तयार नाही.

यामुळे 2017 मध्ये युक्रेनच्या सैन्यात दाखल झालेली आणि नंतर बाहेर पडलेली चारकोल आज पुन्हा आपली स्नायपर रायफल घेऊन युद्धात उतरली आहे. तिच्या या बहादुरीला युक्रेनच नाही तर सगळ जग सलाम करतंय. आज चारकोल युक्रेनियन नागरिकांसाठी नॅशनल हिरो ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर युक्रेनियन सैन्याने नियम बाजूला सारत त्यांच्या सोशल मीडियावर चारकोलचे फोटो पोस्ट केलेत. सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी चारकोल हे त्यांच्याकडे जिवंत शस्त्र आहे. त्यानंतर चारकोलनेही सोशल मीडियावर रशियन सैनिक हे माणसं नाहीत, ते नाझींपेक्षाही क्रूर आहेत. त्यांना आमचा देश सोडून जावचं लागणार असे विधान करत 40 दिवसांपासून रशियाबरोबर लढणार्‍या सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे.

आज जगभरात या रणांगणेची तुलना दुसर्‍या महायुद्धात शत्रूंना सळो की पळो करून सोडणार्‍या, जिच्या नुसत्या नावानेच शत्रूंचे हातपाय लटपटायचे अशा ल्यूडमिला पावलिचेन्को या युक्रेनी स्नायपर महिला सैनिकाबरोबर केली जात आहे. ल्यूडमिला हिने दुसर्‍या महायुद्धात 1941 साली तब्बल 309 जर्मन सैनिकांना ठार केले होते. तिच्या या झंझावाताने हिटलरही हादरला होता. 26 वर्षीय या स्नायपरने रशियाच्या ओडेसा आणि सेवस्तोपलच्या संरक्षणातही भाग घेतला होता. यादरम्यान ती चारवेळा जखमी झाली होती. पण हिंमत न हारता तिने शत्रूला तोंड दिले होते. यामुळे तिला त्यावेळच्या सोव्हियत संघाच्या रेड आर्मीत सामील करण्यात आलं होतं. लेडी डेथ नावाने तिला ओळखलं जात होतं.

आज त्याचाच कित्ता चारकोल गिरवत आहे. तिच्याकडून युक्रेनियन जनतेलाच नाही तर राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीलाही आशा आहेत. युक्रेनच्या यु्द्धभूमीत आज पुरुष स्नायपर्सबरोबर बर्‍याच लेडी स्नायपर लढत आहेत. प्रत्येकीलाच चारकोलसारखं ध्येय जरी गाठता आलं नसलं तरी आज ही प्रत्येक लेडी स्नायपर लेडी डेथ होण्याचे स्वप्न उराशी बाळगून यु्द्धभूमीत उतरली आहे. त्या प्रत्येकीसाठी चारकोल आणि ल्युडमिला हे प्रेरणास्थान ठरलं आहे. जेव्हा जेव्हा पुरुष शस्त्र खाली टाकतो, त्यावेळी जर स्त्री त्याच्यामागे घट्ट पाय रोवून उभी राहिली तर काय होऊ शकतो हे चारकोलला बघून जगाला समजलं आहे. पण विशेष म्हणजे आज पुतीन काय किंवा झेलेन्स्की काय या दोघांनी हे यु्द्ध आता प्रतिष्ठेचे केले आहे. यामुळे चारकोलसारख्या महिला स्नायपरने जर यु्दधभूमी शेवटच्या श्वासापर्यंत गाजवली तर जग झेलेन्स्कीचा जयजयकार नक्कीच करेल पण रशियन सैन्याला मात्र युक्रेनची लेडी डेथ भारी पडली हे पुतीन यांना शेवटपर्यंत ऐकून घ्यावं लागेल. कारण दुसर्‍या महायु्द्धातल्या लेडी डेथ ल्यूडमिला पावलिचेन्कोप्रमाणे चारकोल लेडी डेथचही नाव जगाच्या इतिहासात नक्कीच कोरलं जाणार आहे.

First Published on: April 17, 2022 5:28 AM
Exit mobile version