सिंहमुद्रेचा वाद!

सिंहमुद्रेचा वाद!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नव्या संसद भवनावरील अशोक स्तंभाचे अनावरण नुकतेच केले, मात्र या अनावरणानंतर अशोक स्तंभावरील सिंहांच्या भावमुद्रेवरून वादाला तोंड फुटले आहे. अशोक स्तंभाच्या मूळ डिझाईनमध्ये बदल करून हा अशोक स्तंभ तयार करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मूर्तिकारांनी हे आरोप फेटाळले असले तरी विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला जात आहे. त्यातच राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपचा बहुमताच्या आकडेवारीवरून विजय सोपा आहे, मात्र राष्ट्रीय मुद्द्यावर विरोधक विरोधाला विरोध करण्यासाठी अशोक स्तंभावरून राजकारण करीत असल्याचे दिसून येत आहे, तर दुसर्‍या बाजूला विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची प्रतिमा हिंसक, अहंकारी दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून विरोधक सत्तेसाठी वाटेल ते करत असल्याचे दिसून येत आहे.

भारत देशाच्या नवीन संसद भवनासमोरील असलेल्या चार सिंहांच्या राष्ट्रचिन्हाचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आता या राष्ट्रचिन्हावरून वाद पेटला आहे. विरोधी पक्ष आणि काही नेत्यांकडून या प्रतिकृतीला विरोध केला जात आहे. या चिन्हाच्या स्वरूपात बदल झाल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. अनेक विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रीय चिन्ह असलेल्या चार सिंहांच्या रचनेत फेरफार करून संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

सम्राट अशोकाच्या काळात सारनाथ येथे उभारलेला स्तंभावरील सिंह शिल्प स्वतंत्र भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकारले आहे. मुळात हे शिल्प आणि त्याच्या खाली असलेले हत्ती, बैल, दौडणारा घोडा आणि सिंह यांची कोरीव शिल्प हे सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग अधोरेखीत करतात. मानवतावादी, संपूर्ण प्राणीमात्रांविषयी करुणा असलेला विचार हे चार सिंह आहेत. या सिंहांच्या डोळ्यांवर गंभीर भाव आणि दृढ निश्चय आहे. त्यांचा जबडा नैसर्गिकरित्या उघडला आहे. मानवतावादी, समतावादी विचार चारही दिशांना पसरावे म्हणून हे सिंह पाठीला पाठ लावून बसले आहेत आणि हेच मानवतावादी, सर्वांप्रति स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव विचार स्वतंत्र भारताला सर्व जगात घोषित करायचे होते, म्हणूनच भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळाने हे शिल्प भारताची राजमुद्रा म्हणून स्वीकार केले, मात्र अनावरण झालेल्या नवीन शिल्पात चारही सिंहांचे भाव हिंस्र दाखविले आहेत. त्यामुळे या शिल्पाचा आणि त्यातील बोधाचा अपमान झाल्याचे म्हटले जात आहे. या मूळ राष्ट्रीय चिन्हाचे विकृतीकरण केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींकडे याची तक्रार केली आहे.

नवीन अशोक स्तंभावरून विरोधकांकडून पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली जात असली तरी त्याचा फारसा फायदा विरोधकांना होणार नाही. कारण भाजपने महाराष्ट्रात सत्तांतर केल्यानंतर भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे विरोधकांकडून म्हटले जात होते. प्रत्यक्षात भाजपने प्रतिमा उंचावण्यासाठी मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिले. त्यानंतर विरोधकांना धक्काच बसला. त्यातून विरोधक अजूनही सावरलेले नाहीत. भाजपचे बळ दिवसेंदिवस वाढत असल्याने भाजपकडून लोकशाहीला अभिप्रेत राजकारण केले जात आहे. त्याउलट विरोधकांचे दिवसेंदिवस बळ कमी होत चालले आहे. परिणामी सत्तेवर असलेल्या भाजपची महागाई, बेरोजगारी, विकासाच्या मुद्द्यांवर कोंडी करण्याऐवजी विरोधक विरोधाला विरोध करण्यासाठी मिळेल तो मुद्दा लावून धरत आहेत. त्यातून विरोधकांचा स्वार्थी हेतू सर्वसामान्य नागरिकांनाही दिसून येत आहे.

त्याचा फायदा भाजपलाच होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार आपली प्रतिमा विश्वबंधुत्वाची, लोकशाही, सुसंस्कृत करत असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून देत आहे. त्याउलट अनेक वर्षे सत्तेत असलेले आणि आता विरोधात असलेले काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाकडून चर्चेत राहण्यासाठी भाजपवर टीका केली जात आहे. त्यातून स्वत:च्याच पक्षाची प्रतिमा ज्येष्ठ पदाधिकारी कमी करीत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय राष्ट्रीय चिन्ह तयार करताना किंवा त्यामध्ये बदल करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. २००५च्या कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय प्रतीकांच्या डिझाईनमध्ये बदल करू शकते, मात्र ही प्रतीके भारताच्या लोकशाहीचा प्रमुख भाग आहेत. त्यांची एक वेगळी ओळख आहे. अशा परिस्थितीत सरकार कधीही काही बदलण्याचा निर्णय घेणार असेल तर तो निर्णय पूर्ण काळजीपूर्वक घेतला गेला पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील संजय घोष यांनी माध्यमांना दिली आहे.

असा आहे भारतीय राष्ट्रीय चिन्ह अ‍ॅक्ट २००५
राष्ट्रीय चिन्ह अ‍ॅक्ट २००५मधला असून हा कायदा २००७मध्ये सुधारित करण्यात आला होता. या कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, भारताच्या अधिकृत राष्ट्रीय प्रतिकाला अधिकृत मोहोर म्हणून वापरण्यासाठी अनुसूचीमध्ये नोंद करण्यात आली आहे. भारताचे राष्ट्रीय प्रतीक हे सारनाथ येथील अशोकस्तंभावरुन प्रेरित आहे. या कायद्याच्या सेक्शन ६(२०)(एफ)मध्ये सरकार राष्ट्रीय प्रतिकांच्या डिझाइनमध्ये बदल करु शकते, असा उल्लेख आहे. या सेक्शनमध्ये सांगण्यात आले आहे की, गरज भासल्यास केंद्र सरकारजवळ आवश्यक वाटेल तो बदल करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. यामध्ये राष्ट्रीय प्रतीकांच्या डिझाइनमध्ये बदल करण्याच्या अधिकाराचाही समावेश आहे. मात्र, या कायद्यानुसार केवळ डिझाइनमध्येच बदल करता येतो. कधीही पूर्ण राष्ट्रीय प्रतीक बदलता येत नाही.

असा आहे अशोकस्तंभाचा इतिहास
प्राचीन भारतातील एक महत्वाचे आणि बलशाली साम्राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होते. मौर्य साम्राज्याचे तिसरे सम्राट अशोक महान व उदार शासक होते. शिल्पकलेची आवड असल्याने त्यांनी आपल्या साम्राज्यात स्थापत्यकलेचे अनेक उत्तम नमुने उभारले. त्यातील एक म्हणजे सम्राट अशोक यांच्या काळातील स्तंभ. बौद्ध धर्माच्या अखंडतेचे प्रतीक म्हणून हे स्तंभ उभारण्यात आलेले आहेत. या स्तंभांना अशोकस्तंभ म्हणून ओळखले जाते. हा उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे असून त्याचे वजन अंदाजे ५० टन आहे. तर उंची सरासरी १२ ते १५ मीटर आहे. या स्तंभावर चार सिंह आहेत. हे चारही सिंह चार दिशांना तोंड करून उभे आहेत. या सिंहांच्या खाली हत्ती, घोडा, सिंह आणि बैल प्राण्यांची चित्रे कोरली आहेत.

शिवाय, स्तंभावर २४ आरे असलेले चक्र आहे. या चक्राला अशोकचक्र संबोधतात. स्तंभावर कमळाचे फुलदेखील कोरलेले आहे. सिंह म्हणजे शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. हे सिंह गर्जना करत आहेत, असे दर्शविले गेलेले आहे. ही गर्जना बौद्ध धर्माचा प्रचार असा अर्थ मानला जातो. तसेच, बौद्ध धर्मात सिंहाला महत्वाचे मानले गेले आहे. घोडा म्हणजे गती आणि ऊर्जेचे प्रतिक आहे. बैल म्हणजे कठोर परिश्रम आणि स्थिरतेचे प्रतिक आहे. हत्ती म्हणजे अफाट सामर्थ्याचे प्रतिक आहे या प्राण्यांशिवाय स्तंभावर २४ आरे असलेले एक चक्र आहे. या चक्रातील २४ आरे मनुष्यातील २४ गुणांचे वर्णन करतात. काही इतिहासकारांच्या मते हे २४ आरे दिवसातील २४ तास दर्शवतात. त्यामुळे या चक्राला समय चक्र म्हणतात.

First Published on: July 17, 2022 4:20 AM
Exit mobile version