हे खरंच भयंकर आहे!

हे खरंच भयंकर आहे!

देशाची एकूणच परिस्थिती खरंच भयंकर आहे. आम्ही कुठं जात आहोत ? आमचा समाज कुठं जात आहे ?

परवा एका एमपीएससी पास झालेल्या विद्यार्थ्यांनं आत्महत्या केली. तशा आधीही काही आत्महत्या झालेल्या आहेत. पण ही आत्महत्या जास्त आश्चर्यकारक आणि वेदनादायी आहे. माझ्यासाठी धक्कादायक आहे !

आत्महत्या कुणाचीही असो, कारण कोणतंही असो, ती गोष्ट दुखःद असतेच. पण ही आत्महत्या जास्त गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे.

हा विद्यार्थी एमपीएससी पास झाला. मेहनतीनं पास झाला. गरीब घरातून पुढं आला. वडील गरीब. लहान बहीण लग्नाची. त्यात ह्याच्या शिक्षणामुळे वडिलांच्या डोक्यावर कर्ज देखील होतं. पास झाल्यावर तो वडिलांना म्हणाला देखील, ’की पुढील वर्षापासून मी तुम्हाला कर्ज फेडायला मदत करीन.’ बहिणीला सांगितलं, की ’तुझं लग्न आपण धडाक्यात करू’. दोन वर्ष वाट पाहिली. नोकरीचा कॉल आला नाही. कर्जही वाढत गेलं असेल, बहिणीची स्वप्नही कोमेजू लागली असेल. आणि निराश होऊन त्यानं आत्महत्या केली. हे भयंकर आहे ! त्या कुटुंबावर काय बितली असेल ?

पण माझ्या दृष्टीनं आणखी एक वेगळा पैलू आहे. तो जास्त गंभीर आहे ! भयावह आहे ! विशेष म्हणजे हा मुलगा इंजिनिअर होता. इंजिनियरिंगची परीक्षा पास झाला होता. ही परीक्षा देखील त्याला हिम्मत देवू शकली नाही. त्याला जगण्याचं बळ देवू शकली नाही. त्याला समर्थ बनवू शकली नाही. आधीच इंजिनिअर असलेला मुलगा आत्महत्या करतो, हे माझ्यासाठी जास्त चिंताजनक आहे !

कर्ज किती असेल ? शिक्षणामुळे किती वाढलं असेल ? परिस्थिती गरिबीची होती, पण बहिणीचं लग्न धडाक्यातच केलं पाहिजे, हा विचार त्याच्या डोक्यात कुठून घुसला असेल ? लग्न धडाक्यात करणं म्हणजे नेमकं काय ? त्याचे सामाजिक फायदे खरंच आहेत का ? त्यासाठी कर्जबाजारी होणं गरजेचं आहे का ? लग्न साध्या पद्धतीनं करायला हवं, त्यावर खर्च करू नये, अशी शिकवण त्याला कोणत्याही पुस्तकातून, नातेवाईकांकडून, समाजाकडून किंवा मित्रांच्या गप्पातून मिळाली नसेल का ? मित्रांच्या घोळक्यात कोणती चर्चा केली जात असेल..? कुठल्याही महापुरुषांचे विचार त्यानं वाचले नसतील का ? मोठा अधिकारी होऊन नंतर समाजाला कोणत्या दिशेनं न्यायला हवं, असं काही त्याला कुणी सांगितलं नसेल का ? अशा उच्च दर्जाच्या समजल्या जाणार्‍या परीक्षेच्या अभ्यासक्रमात अशा संकटातून समाजाला कसं पुढं न्यायचं, काय दिशा द्यायची, याचा काहीच समावेश नसतो का ? किंवा असे अधिकारी होणारे लोक केवळ समाजावर उपकार करण्याच्या किंवा भ्रष्टाचार करण्याच्या हेतूनेच तयार होतात का ?

कर्ज असेल, अडचण असेल, लॉक डाऊन मुळे आणखीच तणाव वाढला असेल, मान्य आहे. पण तो इंजिनिअर होताच ना ? काहीच करत नव्हता का ? किंवा कुणीतरी नोकरी दिल्याशिवाय त्याच्या डिग्रीचा त्याला काहीच फायदा नव्हता का ? इंजिनियरिंग ही काही एकदमच चिल्लर डिग्री आहे का ? आणि त्याचा तो गरीब बिचारा बाप, तो नक्कीच इंजिनिअर नसावा. पण तरी तो जर संसाराचा गाडा ओढत आला असेल, कर्जबाजारी झाला असेल, तरीही याला शिकण्यासाठी मदत केलीच ना ? कदाचित जास्त शिकलाही नसेल, किंवा अर्धशिक्षित असेल.. माहीत नाही. पण याच्या एव्हढा तर शिकला नक्कीच नसेल ना ? पण तरीही त्यानं आत्महत्या केली नाही ! तो संघर्ष करत राहिला ! मुलाला, मुलीला वाढवत राहिला. शिकण्यासाठी मदत करत राहिला ! त्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार का आला नसेल ? त्याच्या छातीत अशी हिम्मत कुठून गोळा झाली असेल ? जीवनाशी दोन हात करण्याची प्रेरणा त्याला कुठून मिळाली असेल ? की तो अगदीच अडाणी होता असं आपण मानायचं ? त्याला मान, प्रतिष्ठा याची जाणीव नव्हती असं समजायचं ? त्याच्या डोळ्यात कुठलीच स्वप्नं नसतील असं समजायचं ? आणि नसतील तर अशा वाळवंटामध्ये देखील तो एवढ्या जिद्दीनं कसा जगत असावा ? कुणी जगवलं असावं त्याला ? कुणी हिम्मत दिली असेल ? त्यानं मुलीच्या लग्नाचा विचार केला नसेल का ?

म्हणजे ह्या प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या परीक्षा केवळ सापळे आहेत का ? लुटीची साधनं आहेत का ?

अशा प्रोबेशनरी अधिकार्‍यांच्या समोर, भाषणं करण्याचा बरेचदा योग आला. परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांच्या समोर देखील भाषणं केली. कविता ऐकवल्या. त्यांना हसवलं. विचार करायला लावेल, अशाही कविता ऐकवल्या. त्यांची भरभरून दाद अन् टाळ्यांचा प्रचंड कडकडाट देखील अनुभवला. त्यातले जे अधिकारी होते, त्यातील किती लोक समाजाच्या हिताचे काम करत असतील ? आणि जे तयारी करत होते, त्यातले किती निराश झाले असतील. अपयशामुळे खचून गेले असतील ?

एक नदी आटली म्हणून
थांबत नाही भरती
सागर कधी जगत नसतो
अनुदानावरती !

ह्या ओळी ऐकून टाळ्या वाजवल्या नाही किंवा दाद दिली नाही, असं बहुधा क्वचितच झालं आहे.

समुद्राचं सारंच वेगळं
वेगळं आणि खास
पाऊस असो, पाऊस नसो
लाटा चोवीस तास !

यावर नुसता कडकडाट व्हायचा ! प्रत्येकाला आपण सागर आहोत, असं वाटत असेल का ? की त्यांचही पुढं हळू हळू डबक्यात रूपांतर होत असेल ! ह्याच ओळी मग त्यांना बकवास वाटत असतील ? कदाचित मलाही त्यातल्या काहींनी शिव्या घातल्या असतील ?

आमचं शिक्षण जसं कुचकामी आहे, तसंच आमचे राजकीय पुढारी निर्लज्ज आहेत. मूळ प्रश्नाकडे गांभीर्यानं न पाहता, केवळ एकदुसर्‍यावर चिखलफेक करण्याचा असुरी आनंद घेणारे त्यांचे टिव्ही वरील बदमाश चेहरे पाहिले, की पायातला जोडा काढून हाणावा, असा संताप येतो. ज्या बायकांचे नवरे भ्रष्टाचाराच्या केसेस मध्ये अडकले आहेत, अशा बायकाही बेशरम होऊन वाटेल तशी अक्कल पाजळतात. नीतिमत्ता सांगतात ! पत्रकार देखील त्यांना उलट प्रश्न विचारत नाहीत. तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही का भरती केली नाही ? असा साधा प्रश्न विचारणारा एखादाही पत्रकार दिसत नाही. असं का व्हावं ? तिच्या नवर्‍याच्या भ्रष्टाचाराबद्दल विचारण्याची कुणाचीही हिम्मत का होऊ नये ?

परिस्थिती खरंच भयंकर आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा तर आता कुणी हिशेबही करत नाही. पण असे अधिकारी होऊ घातलेले लोकच जर आत्महत्या करायला लागलेत, तर शेतकर्‍याला वाचणार तरी कोण ? काही मोजके अपवाद वगळले, तर दलाली आणि भ्रष्टाचार याशिवाय राजकीय नेत्यांना दुसरं काहीही सुचत नाही. अब्जावधी रुपयांची पॅकेजेस कुठं जिरून जातात ?

हे अधिकारी म्हणजे नदीचं पाणी शेतापर्यंत पोचवणारे जीवनदायी कालवे आहेत की पाणी आतल्या आत गडप करण्याच्या व्यवस्थेत सामील असलेले शोषखड्डे आहेत ? वाहणारे कालवे तर सहसा नजरेस पडतच नाहीत ! आणि त्यातही काही कालवे तर वाहण्याआधीच आत्महत्या करायला लागले आहेत !

हे भयंकर आहे ! महाभयंकर आहे ! आमच्या शेतांचं कसं व्हायचं ? या अशा कालव्यांचं काय करायचं ? आम्ही त्यांची चिंता करावी, की आमच्या शेताची काळजी घ्यावी ?

खरंच भयंकर आहे !

First Published on: July 11, 2021 3:15 AM
Exit mobile version