नो टेन्शन!

नो टेन्शन!

छोट्या मोठ्या कोणत्याही गोष्टीच आपल्याला टेन्शन येतं. विद्यार्थी असताना परीक्षेचे, अभ्यासाचे टेन्शन तर जीवनातील आर्थिक अडचणी, प्रकृती अस्वास्थ्य, जॉब इत्यादी अशा एक ना अनेक बाबींचे टेन्शन असतात, पण टेन्शन घेतल्याने या समस्या टळणार नसतात, परंतु तरीही टेन्शन घेतले जाते. मग त्यातून नैराश्य, चिडचिडेपणा वाढतो. त्यातच विद्यार्थ्यांच्या जीवनात परीक्षा हा एक अविभाज्य भाग आहे. परीक्षेत मिळणार्‍या मार्कांवरून त्या विद्यार्थ्यांच्या यशाचे मोजमाप केले जाते. त्यातूनच मग परीक्षेत लिहू शकू की नाही, प्रश्न कोणते असतील, मी जो अभ्यास केलाय ते येईल की नाही, चांगले मार्क्स मिळतील की नाही याचे टेन्शन विद्यार्थी घेतात. सहाजिकच मग या टेन्शनचा प्रभाव हा आपोआप मार्कांवर पडत असतो.

एका संशोधनानुसार मानवी मेंदूमध्ये एका मिनिटात तब्बल ६० हजार विचार येत असतात. म्हणजेच मेंदू हा एखाद्या अतिप्रगत मशीनपेक्षाही गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे आपल्या मनात एकाच वेळी अनेक विचार घोळत असल्यानेच टेन्शन येते. अर्थातच मग त्याचे दुष्परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिकतेवर होत असतात. वागण्यात, बोलण्यात, अभ्यासात त्याचे प्रतिबिंब उमटत असते. मग या टेन्शनला आपण टाळू शकतो का? होय नक्कीच हे शक्य आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टीचे टेन्शन आले असेल, तर तुम्ही त्याबाबत एखाद्या व्यक्तीसोबत बोला. मग ते मित्र, मैत्रीण, नातेवाईक, शिक्षक कोणीही असेल. बोलून एकदाच मोकळे व्हा, मात्र त्याच गोष्टीचे टेन्शन घेऊन बसू नका. असे केल्याने तुमच्या टेन्शनकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. टेन्शनमुळे एकटेपणा किंवा अपराधीपणाची भावना बळावते. त्यापेक्षा मित्रांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करा, बोलते व्हा. त्यामुळे तुमचे टेन्शन थोडे हलके होईल.

तुम्हाला टेन्शन कशामुळे आले आहे, त्याचा शोध घ्या. काही वेळा ठोस कारण नसतानाही टेन्शन येतं. एखाद्याचा स्वभाव आणि त्या परिस्थितीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन यावर ते खरंच टेन्शन घेण्यासारखे आहे का, हे अवलंबून असते. अगदी शुल्लक कारणं असतात, पण तरीही ठराविक वेळेत ठराविक गोष्टी पूर्ण केल्या, तर विद्यार्थीदशेत येणारे टेन्शन बर्‍याच प्रमाणात कमी होईल. एखादा विषय अवघड वाटत असेल तर चर्चा करून त्या समस्येचं उत्तर शोधा. ज्या गोष्टी चर्चेने सोडवणे शक्य आहे, त्या वेळीच सोडवा. उगीच त्या गोष्टीचा बाऊ करत बसू नका आणि त्याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका. स्वत:चा आत्मविश्वास कोसळू देऊ नका. संयमाने त्या टेन्शनला बिनधास्तपणे सामोरे जा. आजच्या स्पर्धात्मक युगात बर्‍याचदा अभ्यासाचे व मार्कांचे टेन्शनच अधिक असते, परंतु या टेन्शनवर वेळ नियोजन, अभ्यासाचे योग्य नियोजन आणि हार्डवर्कच्या माध्यमातून सहज मात करता येते. त्यामुळे टेन्शन घेऊन स्वत:चे नुकसान करून घ्यायचे नाही.

उद्या काय करायचे आहे याचे टाईमटेबल आजच बनविले तर उद्याचे काम सोपे होईल. उद्या सकाळपासून उठल्या उठल्या याच वेळापत्रकाप्रमाणे कामाला लागा. ते वेळापत्रक जवळ असल्यामुळे कोणतीही गोष्ट विसरली जाणार नाही. आपला बराच वेळ नाहक चुकीच्या गोष्टींमुळे (उदा. सोशल मीडिया) वाया जात असतो. त्यामुळे दररोज आपला वेळ कुठे कुठे वाया जातो याची एक यादी बनवा. या यादीतील कोणकोणत्या गोष्टींवरील वेळ कमी करता येईल याचा विचार करा. तसे केले तर आपले प्रत्येक काम दिलेल्या किंवा नियोजित वेळेत नक्कीच पूर्ण होईल. दिवसभरात केलेल्या कामाचा आढावा घ्या.

आपल्या वेळेचे नियोजन व्यवस्थित झाले की नाही हे एकदा तपासून घ्या. विनाकारण टेन्शन घेत बसण्यापेक्षा वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. त्यासाठी घड्याळ, कॅलेंडर, वेळापत्रक इत्यादींचा वापर करा. संधीचे दार अगदी प्रत्येकासाठी उघडे आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टींची वाट बघण्यात वेळ घालवू नका. असलेल्या संधीचा योग्य उपयोग करा. जेणेकरून वेळ निघून गेली याचे टेन्शन तुम्हाला येणार नाही. रिकाम्या वेळेचा सदुपयोग करा. नवनवीन कौशल्ये शिका. चांगल्या सवयी आत्मसात करा, परंतु ते करत असताना एका वेळेस एकच काम व मनापासून करा. आता मला सांगा एवढे उपाय आपल्यासमोर असताना टेन्शन घेण्यासारखं खरंच काही आहे का?

एक मुलगा परीक्षेत पाच वेळा नापास झाला. त्याउलट त्याचे मित्र पास झालेत. ते पाहून तो प्रचंड निराशेच्या गर्तेत गेला होता. अपयश आल्याचा मनस्ताप त्याला होत होता. स्वत:ला दोष देत कुढत होता. अपयशाचे टेन्शन त्याला मनातल्या मनात खात होते. तो रानात नदीकिनारी एकटक शून्यात नजर लावून बसलेला असताना तिकडून एक साधू जात असतात. त्याला असा खिन्न व उदास पाहून प्रश्न करतात, बेटा, काय झालंय? असा उदास का आहेस? त्यावर आपल्या अपयशाची कहाणी तो साधूला सांगतो. त्यावर ते साधू स्मित हास्य करत आपल्याजवळ असलेल्या दोन बिया त्याला देऊन त्यांची लागवड व देखभाल करायला सांगतात. मी काही वर्षांनी पुन्हा इकडे येईन तेव्हा तुझ्या या प्रश्नाचे निराकरण मी करेन, पण तोवर तू या बियांची पेरणी करून दोघांची समान जोपासना कर, असे सांगून साधू निघून गेले. त्या मुलाने त्या दोन बिया रुजत घातल्या. दररोज त्यांना पाणी देऊन त्यांची देखभाल तो करत होता. मग एके दिवशी एक बीज अंकुरले.

त्याला कोंब फुटला. त्याला आनंद झाला, पण दुसरं बीज मात्र अंकुरलंच नाही. तरीही त्याचं दोन्ही बियांचं संगोपन करणं चालूच होतं. इकडे मात्र अंकुरलेलं बीज आता वेगाने रोपातून झाडाकडे आकार घ्यायला लागलं. पानं, फांद्या या रूपात वाढू लागलं, मात्र एकीकडचं बीज अजूनही अंकुरलं नव्हतं. त्या मुलाला वाटलं बहुतेक हे बीज नासकं असावं, परंतु तरीही साधूने सांगितल्याप्रमाणे दोन्ही बिजांची समान देखभाल तो करत होता. काही वर्षांनी अंकुरलेल्या बिजाचा वृक्ष झाला. इतके दिवस ज्याला पाहून हे नासकं बीज वाटत होतं त्याला आज कोंब फुटला आणि अवघ्या काहीच महिन्यांत या बिजाची वाढ एवढी चमत्कारिकरित्या झाली की ज्या बिजाचा वृक्ष झाला त्याहीपेक्षा वर जाऊन आता हे आकाशाची तुलना करू लागले. ते बीज होतं बांबूच्या झाडाचं. मग एके दिवशी वादळ आलं. ते वादळ इतके भीषण होते की पहिला पटकन अंकूरलेला तो वृक्ष व त्यासारखी अनेक छोटी मोठी झाडे कोलमडून गेली, मात्र अवघे काही महिन्यांत जमिनीवर उगवलेलं ते बांबूचं झाड मात्र अगदी मान उंचावून जसेच्या तसे आपली मूळ कणखर करून उभे होते.

त्या दिवशी साधू पुन्हा त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या मुलाला त्या झाडाकडे कुतूहलाने पाहताना सांगितले, तुला आश्चर्य वाटत असेल की हे झाड कमी दिवसांत उगवूनसुद्धा एवढे प्रचंड उंच झाले व या भीषण वादळाचा सामनादेखील त्याने केला. हे कसे शक्य झाले? उत्तर अगदी सोप्पं आहे. जेव्हा आधीचं झाड जमिनीच्या वर वाढत होतं तेव्हा हे बांबूचं झाड जमिनीच्या खाली वाढत होतं व आपली मुळं मजबूत करत होतं. त्यामुळे एवढ्या भीषण वादळाचा सामना ते करू शकलं. तुझ्या अपयशाने तू टेन्शन घेतलं व निराश होऊन बसलास. त्यापेक्षा आता तुझं तू ठरवं की आता तुला कोलमडलेलं झाड बनायचं आहे की आकाशाला गवसणी घालणारं बाबूंचं झाड? त्या मुलाला अर्थबोध झाला. टेन्शन न घेता पुन्हा तयारीला लागला. अचूक नियोजन व तत्त्वांची मुळं मजबूत करून त्याने यश संपादन केलं.

म्हणूनच म्हणते, टेन्शनला करा बाय बाय आणि स्वतःच्या ध्येयपूर्तीकडे वाटचाल चालू ठेवा. इतरत्र मन भरकटू देऊ नका. स्वत:ला सिद्ध करण्यासारख्या गोष्टी या जगात खूप आहेत. तुम्ही त्यावर लक्ष द्या. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पहिल्या दिवसापासून एक गोष्ट नेहमी कानावर पडत असते ती म्हणजे पाया मजबूत असेल तर कोणतीही इमारत सहज बांधली जाऊ शकते, मग ती बुर्ज खलिफा का असेना. अगदी खरंय, जर तुमचं व्यक्तिमत्त्व परिपक्व आहे आणि कोणतेही वादळ सहन करू शकते, तर मग यशाचा बुर्ज खलिफा बांधणं अगदी सहज शक्य आहे. मग टेन्शन सोडा आणि लगेच कामाला लागा.

–निकिता गांगुर्डे 

First Published on: November 20, 2022 6:00 AM
Exit mobile version