सेंद्रिय शेती काळाची गरज

सेंद्रिय शेती काळाची गरज

भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान म्हणून ओळखली जाते. लोकसंख्या वाढल्यामुळे लोकांच्या गरजा वाढल्या आहेत. सेंद्रिय शेतीत नैसर्गिक साधनाचा वापर करून औषध, खते तयार करून व पारंपारिक बियाणाचा वापर केला जातो. रसायनांपासून मुक्त असल्यामुळे सेंद्रिय शेतमालाला मागणी वाढू लागली आहे. मात्र दुसरीकडे पिकांचे उत्पादन घेताना जमिनीकडे दुर्लक्ष होत आहे. जमिनीचे आरोग्य खालावत चालले असून जमीन नापिक होत आहे. मनुष्याला जसे रोग, ऊन, वारा, पाऊस ह्यापासून संरक्षणाची गरज असते तशीच मातीलादेखील असते. कीटकनाशके व खतांच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेती खर्चात वाढ होत आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीकडे वळून प्रदुषणमुक्त व रसायनमुक्त शेती करण्याची वेळ आली आहे. कमी उत्पादन खर्चामध्ये सेंद्रिय शेती करुन शेतकर्‍यांमध्ये त्याचे महत्व वाढवणे गरजेचे झाले आहे.

देशामध्ये कीटकनाशके तसेच खतांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. तसेच कीटकनाशकांच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे नागरिकांच्या आरोग्यांच्या समस्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, ही काळाची गरज आहे. नागरिकांनीदेखील सेंद्रिय भाजीपाला, फळे सेवन करुन त्याबाबत आग्रही असावे. शेतकर्‍यांकडे सेंद्रिय शेती उत्पादनांची मागणी वाढल्यास तेदेखील सेंद्रिय शेतीकडे वळतील आणि त्यांना प्रोत्साहन मिळेल.

शेतकर्‍यांचा प्रती एकरी उत्पादन खर्च कमी व्हावा, शेतकरी स्वत: बियाणे, खते यांची निर्मिती करु शकेल. यासाठी सेंद्रिय शेती परिषदेच्या माध्यमातून असे तंत्रज्ञान शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. सतत कीटक नाशकांची फवारणी तसेच शेतीला पुरविले जाणारे पाणी व मृदा परीक्षण न झाल्यामुळे शेतीचे उत्पन्न कमी होऊन उत्पादन खर्च जास्त होतो. त्यासाठी मृदा व पाण्याचे परीक्षण शेतकर्‍यांनी करावे. तसेच कमी खर्चामध्ये प्रदुषणमुक्त व रसायनमुक्त शेती करण्यासाठी या परिषदेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना प्रोत्साहित करायला हवे.

रासायनिक औषधामुळे जमीन मृत होत चालली आहे. रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. शेती टिकविण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक खतांवर व औषधांवर होणारा खर्च वाचू शकतो. कारण सेंद्रिय शेतीमध्ये खते व औषध नैसर्गिक साधनांचा वापर करून तयार करतात. त्यामुळे त्यावर खर्च अल्पशा प्रमाणात होतो. सेंद्रीय शेती पद्धतीनुसार पारंपरिक बी-बियाणे वापरणे, जमिनीची धूप थांबविणे त्यासाठी योग्य ठिकाणी बांध घालणे, मशागत करणे शेण-गोमुत्राचा जास्त वापर करणे यामुळे पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होते.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. आजही ग्रामीण लोक शेतीवरच अवलंबून आहेत. मात्र आजही शेतात नवीन प्रयोग होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. आपल्या देशात 70 पेक्षा अधिक अशी कीटकनाशकं आहेत, जी इतर अनेक देशांमध्ये खूप आधीपासून प्रतिबंधित आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेती करण्याकडे वळणे गरजेचे आहे

पूर्वी लोकसंख्या कमी होती. विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती झालेली नव्हती. उपलब्ध नैसर्गिक संसाधनं भरपूर होती. उपयोग मर्यादित होता. शेतीही नैसर्गिक पद्धतीनेच केली जायची. सेंद्रिय खते वापरात होती. रासायनिक खतांचा वापर नव्हताच मुळी. पण, काळ पुढे सरकत होता, लोकसंख्याही वाढली. त्यामुळे गरजाही वाढल्या. वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर वाढू लागला. आता तर अशी परिस्थिती आहे की, नैसर्गिक संसाधनं कधी संपतील याची शाश्वती राहिलेली नाही. अमर्याद वापर झाल्यानं पृथ्वीवरील संकटं दिवसेंदिवस वाढत आहेत. पूर्वी शेतीसाठी शेणखताचा वापर केला जायचा. आता शेणच उपलब्ध होत नसल्यानं रासायनिक खतांचा मारा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. रसायनांचा अतिरेकी वापर होत असल्याने जमिनीचा कस तर कमी होत आहेच, मानवाच्या आरोग्यावरही त्याचे गंभीर परिणाम होत आहेत.

कीटकांपासून पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी रासायनिक औषधांची फवारणी करीत असतात. अनेकदा फवारणीचा अतिरेक होतो. त्याचे दुष्परिणाम आज संपूर्ण जग भोगत आहे. कीटकनाशकांमध्ये जे विष असते, त्या विषामुळे अनेक लोक दरवर्षी प्रभावित होत आहेत. फवारणी करताना श्वासावाटे शरीरात गेलेल्या विषामुळे अनेक शेतकरी मृत्युमुखी पडत आहेत, त्यामुळे घातक रसायने असलेली कीटकनाशके वापरण्याऐवजी सेंद्रिय खतांचा आणि गोमूत्र, लिंबोळी, कडूलिंबाची पानं यापासून तयार केलेल्या मिश्रणाचा वापर करून कीटकांचा नाश करता आला तर अधिक उत्तम ठरेल. याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा.

आज भारतावर प्रदूषणाचे मोेठे संकट घोंघावते आहे. प्रदूषणामुळे होणारे नुकसान प्रचंड असते. पिकांवरही प्रदूषणाचा विपरीत परिणाम होतो. नुकताच अवकाळी पाऊस झाला अन् पिकांचे प्रचंड नुकसान झाले. प्रचंड प्रदूषणामुळे जागतिक तापमानात जे बदल झाले आहेत, त्याच्याच परिणामी अवकाळी पाऊस अन् अतिबर्फवृष्टी होत आहे. प्रदूषणापासून पिकांवर दुष्परिणाम होत आहेत. याकरीता गाई-म्हशींचं जे शेण आहे, त्यापासून जर सेंद्रिय खत बनविले तर शेतीसाठी ते अधिक फायदेशीर ठरू शकते. आपण पिकांना जी खतं देतो, तीसुद्धा रासायनिक असल्याने आणि मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने जे नुकसान होते, ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे.

ही बाब लक्षात घेता सेंद्रिय खते वापरण्याकडे आपला कल असला पाहिजे. जनावरांना आपण जो चारा खाऊ घालतो, त्यापैकी त्यांनी न खाल्लेला जो भाग असतो तो, जनावरांचे मलमूत्र एकत्र करून त्यापासून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत तयार केले जाऊ शकते. आपल्याकडे गाई-म्हशींची संख्या भरपूर आहे. शेतातही मोठ्या प्रमाणात पालापाचोळा गोळा होतो. त्यामुळे सेंद्रिय खत तयार करण्यासाठी लागणार्‍या साहित्याची कधीच कमी पडणार नाही. शेणाचा वापर हा फक्त आणि फक्त खत तयार करण्यासाठीच करायचा, असा निर्धार सगळ्यांनी केला आणि ग्रामीण भारतात गोवर्‍यांना पर्याय ठरू शकेल, असा इंधनाचा स्रोत उपलब्ध करून दिला तर शेणाचा वापर पूर्णपणे खतासाठीच केला जाऊ शकेल, यात शंका नाही.

–राकेश बोरा 

First Published on: January 16, 2022 5:00 AM
Exit mobile version