परफॉर्मिंग प्ले….

परफॉर्मिंग प्ले….

एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळात गावकुसात राहणार्‍या माणसांचा बाहेरच्या जगाशी म्हणावा तितका संपर्कही नव्हता की त्याचे मार्गही त्यांना नीटसे परिचित नव्हते. नाटकाचा पडदा उचलला किंवा पाडला की ते त्याकडे एखादा चमत्कार पाहिल्यासारखं डोळे विस्फारून पाहत असत. त्याकाळी रंगमंचाच्या दोन्ही बाजूंना असणार्‍या विंगांच्या आधारे पडदा उभारता येईल, अशी सोय नव्हती. प्रोसेनियम आर्चच्या नेमकी वर एक सुतळ रंगमंचाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत बांधलेली असे आणि तिला पडदे लटकवलेले असत. अंकातल्या प्रवेश बदलाचे सूचन करण्याकरता म्हणून अनेक पडदे रंगविलेले असत-उदाहरणार्थ रस्त्यावर घडणारे दृश्य, स्त्रियांच्या अंत:पुरात घडणार्‍या घडामोडी, जंगलाच्या पार्श्वभूमीवर बोलणारी पात्रे दाखवणारे आणि आणखी अनेक असे बरेच पडदे असत.

अनेकदा ते पडदे मधून विभागलेलेही असत जेणेकरुन एका प्रवेशातून दुसर्‍या प्रवेशात झालेला प्रवास दाखवता येऊ शकेल. नेपथ्याबद्दल बोलायचं झालं तर राजाच्या दरबारातील सिंहासन दाखवायचं असेल तर एक चौकोनी मोडा, त्याच्या पाठीमागे लावलेली प्रभावळ आणि त्यावर ठेवलेल्या उश्या इतकंच सूचक नेपथ्य असे. त्या सिंहासनाखाली दोन पायर्‍या असत. सिंहासनावर बसायला जाताना त्या दोन पायर्‍या चढून जावं लागत असे. राजा आणि प्रजेतला फरक दाखविणारं हे छोटंसं पण सूचक नेपथ्य असे. कुठलाही प्रवेश असो, सबंध नाटकात हे राजाच्या दरबाराचे नेपथ्य कायम असे. बागेतील दृश्य दाखवायचे असेल तर, जंगलातील वेली आणि रंगवलेल्या ढगांच्या प्रतिकृती रंगमंचाच्या वरील अवकाशातून दोरीने खाली सोडलेले असत.

प्रकाशयोजनेसाठी रंगमंचाच्या समोर लाकडी खांबांना तीन दिवे बांधून ठेवलेले असत. फुटलाईट देण्यासाठी दोन बाय चार फुटांच्या आकाराचे खोके तयार केलेले असत. त्या खोक्यांमध्ये ज्योती तेवत राहतील अशी योजना केलेली असे. वार्‍याच्या झोताने विझून जाऊ नये म्हणून त्या ज्योतींभोवती काचेची चिमणी ठेवली जात असे. फुटलाईट्स म्हणून असे चार खोके ठेवलेले असत. खुर्चीवर बसलेले, चटईवर बसलेले आणि दोन आण्याचं तिकीट काढून आलेले अशी प्रेक्षकांची वर्गवारी आणि प्रेक्षागृहाची विभागणी असे. या प्रत्येक विभागाच्या शेजारी एक दिवा टांगलेला असे. बहुतेकदा ते दिवे वार्‍याच्या झोताने विझून जात असत. केरोसीनच्या दोन बाटल्या राहू शकतील असा एक खोका या दिव्यांच्या शेजारी बांबूच्या खांबाला बांधून ठेवलेला असे. साधारण 1911 च्या सुमारास गॅसलाईटचा वापर सुरू झाला. प्रकाशाचा परिणाम साधण्यासाठी गरजेनुसार त्याचा तीव्र किंवा मंद झोत सोडला जात असे.

त्यावेळी नाटक कंपन्यांमध्ये काम करणारी सगळी कलाकार मंडळी ही पुरूषच असत. स्त्री पात्र असेल तर लांबलचक केसांचा विग घालून ते या भूमिका पार पाडत. पदराखाली कपड्याचे बोळे ठेवत. रंगमंचावर नाचत असताना कधी कधी हे बोळे आपल्या जागेवरून हलत आणि रंगमंचावरच पडत. प्रेक्षक हे दृश्य पाहून लोटपोट व्हायचे. पाऊसपाण्याच्या दिवसांत शेकडोंनी कीटक पाखरं तेवणार्‍या ज्योतींकडे आकर्षित होत रंगमंचावर आणि प्रेक्षागृहातही अक्षरश: धुडगूस घालत. रंगमंचावर गाणारा नट ताना घेण्यासाठी त्याचं तोंडही उघडू शकत नसे. ती कीटक पाखरं नटांच्या अंगांना डसत. केसांच्या विगमध्ये शिरत. कधी कधी तर असंही होई की, विगखाली शिरलेल्या पाखरांनी घातलेला धुमाकूळ नटांना सहन होत नसे आणि त्याला कंटाळून ते भर रंगमंचावर आपला केसांचा विग उचकटून टाकत असत. या सगळ्यांचा परिणाम म्हणून प्रेक्षागृहात हास्याचे प्रचंड स्फोट होत असत.

काही ठिकाणी नाटकांऐवजी वाद्यवृंदाचे कार्यक्रम आयोजित केले जात असत. अशा वेळी नाटकात आपली सेवा देणार्‍या स्थानिक वादकांना तिथे निमंत्रित केलं जाई. नाटक असो वा वाद्यवृंद, दोन्हीकडे जवळ जवळ सारख्याच सुरावटीतील आणि गायनाच्या सारख्याच शैलीतील गाणी सादर केली जात असल्याने वादकांना इथून तिथे जुळवून घेण्यासाठी फारसे कष्ट पडत नसत.

त्या काळी नाटक पाहायला येणार्‍या प्रेक्षकवर्गात दागदागिन्यांनी नटून थटून आलेली एखादी बाई असली तर नटमंडळी तिच्याकडून ते दागिने प्रयोगापुरते उसणे मागून घेत. ती बाईसुद्धा प्रेक्षागृहातील आपल्या शेजार्‍यांना ही गोष्ट अभिमानाने सांगत असे. त्या जमान्यात वेशभूषेसाठी हवे असलेले कपडे आणि दागिने मुबलक प्रमाणात उपलब्ध नव्हतेच. वेळ आल्यास अशा तर्‍हेने उसनवारी करत ती मारून नेली जात असे.

राजाच्या वेषभूषेत जरतारी विणकाम केलेल्या कपड्यांचा उपयोग केला जात असे तर मंत्री आणि सैनिकांचे पोशाख मखमली कापड वापरून शिवले जात असत. फुटकळ भूमिका करणार्‍या नटांची वेशभूषाही फुटकळच असे. पण त्यातही एक गंमत होती. फुटकळ भूमिकेतला एखादा नट कंपनीच्या व्यवस्थापकाचा लाडका असेल तर त्याला मात्र पहिल्या दर्जाचे उत्तम कपडे वापरायला मिळत असत. काही नट असे असत जे त्यांच्या भूमिकेपेक्षा त्यांच्या शरीरयष्टीला शोभून दिसतील अशीच वेषभूषा करत. मुळातच नाटक कंपनीत नट म्हणून काम करणार्‍यांची संख्या अल्प असल्याने एकाच नटाला अनेक भूमिका कराव्या लागत.

एका प्रवेशात मंत्री किंवा सैनिक बनून उभा राहिलेला नट दुस-या प्रवेशात ब्राम्हणाच्या भूमिकेत असे. तर तिसर्‍या प्रवेशात तोच नट एखादा शिकारी किंवा मासेमारी करणारा कोळी बनून येत असे. या बदलणार्‍या भूमिका करताना त्या नटाची जी तारांबळ उडत असे ती प्रत्यक्ष रंगमंचावर दिसे. म्हणजे दुसर्‍या प्रवेशात ब्राम्हणाची भूमिका करत असतानाही पहिल्या प्रवेशातील मंत्र्याच्या गळ्यातील हार, सिल्कचा अंगरखा आणि मोजे काढायला तो विसरलेला असे. प्रत्येक कलाकाराला मोजे घालणं भागच असे. त्यातही तो स्त्री पात्र करत असेल तर ते महत्वाचंच ! मोजे घालण्याचं नेमकं कारण काय हे कुणाला ठाऊक नसलं तरी बहुदा आपल्या पायांचा मूळ रंग लपविण्याचा तो एक मार्ग होता.

एखाद्या नटाला गाणे गाता येत असो वा नसो, त्याला छंदोबद्ध स्वरुपाची गाणी मात्र गावी लागतच असत. जेव्हा हार्मोनियम या वाद्याचा वापर नुकताच जम धरू लागला होता, तेव्हा खरं तर त्याचा उपयोग संगीत देण्यासाठी केला जाऊ शकतो याबद्दल कुणाला काही माहीत नव्हते. केवळ एक सूर पक्का धरून ठेवण्यासाठी आणि त्याच्या आधारे आपल्या आवाजाची पट्टी निर्धारित करण्यापुरताच हार्मोनियम वापरण्यात येत असे. आपल्याला हवी ती पट्टी धरून ठेवण्यासाठी माचिसची एक काडी काळ्या पांढर्‍या कॉर्ड्समध्ये अडकवून ठेवली जात असे आणि किमान पाच ते सहा वर्षे ती तशीच ठेवली जात असे. भूमिका पुरूष पात्राची असो वा स्त्री पात्राची, गाणी मात्र त्याच एका ठरवलेल्या पट्टीत गायला हवीत असा दंडक असे.

त्याकाळी काव्य लिहिणारे अगदी भरघोस प्रमाणात लिहीत होते. त्यामुळे संवादात जराशी जरी उसंत मिळाली तरी काव्यांचे रूपांतर गाण्यात होत असे. उदाहरणार्थ, महाराज, एक ब्राम्हण तुमची भेट मागत आहे, हा निरोप घेऊन येणारा दूत तो निरोप गाणं गाऊन देत असे. त्यावर राजाचं प्रत्युत्तर सुद्धा गाणंच असे. रंगमंचावर प्रवेश करताना असायचं ते गाणं आणि एक्झिटही असायची गाण्यासोबतच ! यमक, ताल आणि अलंकारांनी युक्त गाणी हा नाटकाचा अविभाज्य भाग होता.

सांप्रतकाळी कोरोनाच्या दिवसांत नाटक सादर करायला लागणारा अवकाशच संकोच पावला असताना अगदी सुरूवातीच्या काळात तो कसा होता याची उजळणी करणं मनोरंजक वाटू लागलं होतं. तो आनंद आपल्याशी वाटून घ्यावासा वाटला. म्हणून हा लेखप्रपंच….

First Published on: May 22, 2021 8:35 PM
Exit mobile version