…आणि गंगेत वाहणार्‍या प्रेतांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला!

…आणि गंगेत वाहणार्‍या प्रेतांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला!

उत्तर प्रदेशमधील कोरोनाची दुसरी लाट अभूतपूर्व पद्धतीने नियंत्रणात आणल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचे जाहीर कौतुक केले आहे. केंद्रात सत्ता भाजपची असून उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा सरकार भाजपचे आहे. यामुळे तुझ्या गळा, माझ्या गळा करत दोघांनी एकमेकांच्या गळ्यात मोत्याच्या माळा गुंफल्या… म्हणून कोणाला तसे काही वाईट वाटायचे कारण नाही. मुख्य म्हणजे पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशची निवडणूक असल्यामुळे भाजपला सत्ता राखायची असल्याने योगी यांना नाराज करून चालणार नाही, म्हणूनही कदचित मोदींच्या मनात नसताना त्यांनी योगींच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. या थापेचा आवाज इतका गुंजला की, गंगेत वाहणार्‍या प्रेतांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. मुख्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुटकेचा निश्वास टाकला… सर्व भारतीयांचा डीएनए एकसारखा असून हिंदू-मुस्लीम असा काही भेदभाव नसतो, असे सांगत उत्तर प्रदेशची निवडणूक तोंडावर आल्यात, अशी हाळी देणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशभर मुस्लीम वस्त्यांमध्ये संघ शाखा सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे.

भाजप आणि संघाकडून असे काही अचानक जाहीर कौतुक आणि घोषणा केल्या जात नसतात. त्यामागे निश्चित कारणे असतात. संघाला 2024 मध्ये पुन्हा एकदा या देशावर भाजपची बहुमताने सत्ता आणायची आहे. दिल्लीत सत्तेकडे जाणारा मार्ग हा आधी उत्तर प्रदेशवरून निघतो. लोकसभेच्या तब्बल 80 जागा या एकट्या उत्तर प्रदेशमध्ये असून मध्य प्रदेश, राजस्थान, हरयाणा, बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या हिंदी प्रदेशावर आपली पकड ढिली होऊ न देता भाजपच्या मातृसंसंस्थेला संघाला पुन्हा एकदा कमळ फुलवायचे आहे. दिल्ली, पंजाब हाती नसताना, दक्षिणेकडील राज्यांमध्ये जनाधार नसताना आणि मुख्य म्हणजे पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात सत्तेचे स्वप्न उध्वस्त होत असताना आता अचानक योगींचा जयजयकार सुरू झालाय… नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मनात नसतानादेखील तो करावा लागतोय. कारण संघ दक्ष आहे आणि 2024 चे कमळ लक्ष्य आहे!

काही महिन्यांपूर्वी योगी यांना मोदी-शहा हे हिंग लावूनसुद्धा विचारात नव्हते. उत्तर प्रदेशसाठी नव्या चेहर्‍याच्या शोधात पक्षश्रेष्ठी होते. पण, स्वतः मोदींची प्रत्यक्षाहून उत्कट केलेली प्रतिमा धूसर होऊ लागल्याने 2024 मध्ये काय होणार? अशी चिंता असल्याने पुढचा विचार करणार्‍या संघाने मोदींना थांबवत योगींना आता हात घालू नका… पश्चिम बंगाल हातून गेले असून उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा हातून जाऊन देऊ नका, असा संदेश दिल्याने योगींवर स्तुतिसुमने उधळली गेली आहेत. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत उत्तर प्रदेशची परिस्थिती काय होती याची माहिती, फोटो, व्हिडीओ सुन्न करणारे होते. ती नुसती लाट नव्हती तर मृत्यूचे तांडव होते. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाची परिस्थिती चांगली हाताळली असं म्हटलं जात असेल तर गारुड करून भारूड दाखवल्याचा प्रकार झाला. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा इशारा देऊनही त्याकडे दुर्लक्ष करत कुंभमेळा भरवला जात असेल आणि त्यात मुख्यमंत्री योगी स्वतः गंगेत डुबकी मारत असतील तर जनता घरात थोडी बसणार आहे. हे चित्र एकाबाजूला दिसत असताना दुसरीकडे मोदी-शहा यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता.

शेवटी व्हायचे तेच झाले. उत्तर प्रदेशमध्ये हाहा:कार उडाला. दुसर्‍या लाटेत उत्तर प्रदेशातील कोरोना बळींची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली की, मृतदेह जाळायला स्मशानभूमीसुद्धा कमी पडू लागल्या. त्यामुळे नागरिकांनी गंगेच्या काठावरच मृतदेह दफन केले. सरकारने मनाई केल्यानंतरही लोकांनी गंगेच्या काठावर मृतदेह पुरले. जिकडे पाहावे तिकडे मृतदेहच मृतदेह दिसले. त्यांची मोजदाद करणंही शक्य राहिलं नव्हतं. शेवटी पुरायला जागा नसल्याने लोकांनी मृतदेह गंगेत सोडून दिले. गंगेच्या पाण्यावर तरंगणारे मृतदेह योगी यांच्या कारभाराचा पंचनामा करत होते. त्याचवेळी हे वास्तव मोदी-शहा यांना टाळ्या-थाळ्या वाजवून आणि दिवे चालू-बंद करून कोरोना आपण गंगेवरून वाहत असल्याचे दाखवत होता. या प्रकरणी देशभरात नाचक्की झाल्याने उत्तर प्रदेश सरकारने गंगा नदीकाठी मृतदेहांचे दफन करण्यास मनाई केली होती. मृतदेह दफन केल्यास किंवा नदीत सोडल्यास कारवाईचा इशारा देतानाच या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंगही करण्यात आली होती. मात्र सरकारचे सर्व प्रयत्न फोल ठरले. घाटावर सर्वत्र प्रेतच प्रेत दिसून येत होती.

पोलीसही शेवटी हतबल झाले आणि मूकदर्शक होऊन त्यांनी मृतदेह दफन करणार्‍यांना मनाई केली नाही. घाटावर मृतदेहांशेजारी लावलेले झेंडे, अर्थीचं सामान आणि वाहत आलेले मृतदेह यामुळे आधीच मैली झालेली गंगेचे स्मशान झाले. एका एका दिवसाला 70 मृतदेह वाहून येताना दिसले. कधी कधी हा आकडा शंभरच्यावरही गेला. गोरखपूरचे जिल्हाधिकारी के. विजयेन्द्र पाण्डियन यांनी सांगितलेला अनुभव ऐकून भल्या भल्यांची झोप उडाली. ‘रुग्णालये भरून गेली आहेत. एकवेळ तर अशीही आली की, एका बेडसाठी 100 रुग्ण वेटिंगवर होते. हे शंभर लोक बेड मिळावा म्हणून त्या रुग्णाच्या मृत्यूची वाट पाहत होते. फारच भयावह चित्रं होतं. आयुष्यात असा प्रसंग पुन्हा पाहायला मिळू नये’.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत या देशात सर्वात जास्त फटका बसला असेल तो उत्तर प्रदेशला. सुरुवातीला गंगेच्या पाण्यावरून वाहणारी प्रेते, घाटावर जळणारी प्रेते, घाटावर दफन केलेली प्रेते हे हळूहळू कमी झाले की याचा गवगवा कुठे होता कामा नये, याची घेतलेली दक्षता असो, पण नंतर अचानक उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची लाट शांत झाल्याचे चित्र दाखवण्यात आले. आता तर म्हणे देशात इतर कुठल्याही राज्याने केली नसेल अशी महान कामगिरी करत उत्तर प्रदेशने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपवले आहे, अशी फुले मोदी योगी यांच्यावर उधळत असतील तर दोन एक महिन्यांत मोठा चमत्कार झाला असे म्हणावे लागेल. आजही उत्तर प्रदेश आणि बिहार ही दोन्ही राज्ये बिमारू आहेत. मोठ्या जाहिराती करून उत्तर प्रदेश विकासाच्या वाटेवरून जात असल्याचे दाखवले जात असले तरी हा हे खरे वास्तव नाही.

अजूनही लोकांच्या हाताला काम नाही. शेती दोन वेळचे पोट भरत असली तरी एका घरातील खाणारी पाच दहा तोंडे कायम जगवत ठेवणारी नसल्याने कालच्या प्रमाणे आजसुद्धा उत्तर प्रदेशमधून जगण्यासाठी लोंढे शहरांकडे धावत आहेत. वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या प्राथमिक सुविधांपासून हे सर्वात मोठे राज्य दूर आहे. मरता येत नाही म्हणून रोज मरत मरत जगायचे…हेच या लोकांच्या नशिबी आहे. हाताला कामी देणारे उद्योग व्यवसाय तर खूप लांब राहिले. जातीपातीच्या मातीतून बाहेर काढता पडता येत नसताना, अंधश्रद्धेचे जाळे घट्ट असताना आणि गावकुसात शिक्षणाची पहाट नसताना आरोग्यासाठी प्राधान्य तर खूप शेवटचे टोक होते. कोरोनाच्या लाटेने त्याची पार लक्तरे काढल्यावर उत्तर प्रदेशचे भयाण वास्तव योगींना शाबासकी देऊन ते झाकता येणार नाही.

सर्व भारतीयांचा डीएनए एकच असून मुस्लीम वस्त्यांमध्ये संघ शाखा उघडल्या जातील… असे सरसंघचालक मोहन भागवत भले सांगत असतील आणि लगेच पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री योगी यांना भले भले शाबासकी देत असतील तरी खरा चेहरा वेगळा दाखवत आहे. आपल्या तो बाब्या… आणि दुसर्‍याचे ते कार्टे! म्हणणे खूप सोपे असून आता मोदी आणि शहा यांनी पुढील वर्षी उत्तर प्रदेशसह होणार्‍या पाच राज्यांच्या निवडणुकांचा जरूर विचार करावा. मात्र तो करताना येऊ घातलेल्या कोरोनाच्या तिसर्‍या लाटेवर अधिक लक्ष द्यायला हवे. गेल्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा कहर अजून शांत होण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यातच महागाईने कहर केला असून लोकांचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव शंभरी पार करून जात असताना, जीवनावश्यक वस्तू हाताबाहेर गेल्या असताना, हाताला काम नसताना, बेरोजगारी वाढत असताना मोदी आणि संघाने आता 2024 च्या लोकसभेची चिंता करू नये… आता लोकांच्या रोजच्या जगण्याचा, भाजी भाकरीचा प्रश्न सोडवावा…!

First Published on: July 18, 2021 5:15 AM
Exit mobile version