अवयवदानाचा प्रचार आणि प्रसार : स्टार

अवयवदानाचा प्रचार आणि प्रसार : स्टार

एका नाट्यकलाकृतीतून समाजजागृती करण्याचा हा प्रयत्न लक्षवेधी ठरत आहे. एकांकिका, दीर्घांक आणि दोन अंकी नाटक अशा तिन्ही स्वरूपात या नाट्यकलाकृतीचे प्रयोग विविध स्पर्धांमधून होत होते. प्रेक्षकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादाने आता या कलाकृतीचे व्यावसायिक प्रयोग देखील सादर होऊ लागले आहेत. जयंत करंडक, इस्लामपूर, बाबाज करंडक आणि कै. अनंत कुबल स्पर्धा, नाशिक, महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि गडकरी करांडक, पुणे, बोलीभाषा स्पर्धा, बाबासाहेब आंबेडकर करंडक, महाड, राज्य नाट्य स्पर्धा, कल्याण अशा विविध स्पर्धांमध्ये गाजलेली, वाजलेली आणि नावाजली गेलेली ही कलाकृती. काय वेगळेपण आहे या कलाकृतीचं?

मनोरंजन आणि प्रबोधन ही नाटक या कलाप्रकारची ठळक उद्दिष्टे. ‘स्टार’ या दोन्हींचा उत्तम असा समतोल आहे. सहज सुंदर सादरीकरण आणि तितकाच आशयघन आणि समाजोपयोगी दिला जाणारा संदेश ही याची वैशिष्ठ्ये. अवयवदानाविषयी समजात जागृती व्हावी असा प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून केला गेला आहे.

पडदा उघडतो तेव्हा रंगमंचावर पाऊस सुरू असतो. एक तरुणी आपल्या घरात नृत्याचा सराव करत आहे. तिचा मोबाईल खणाणतो म्हणून ती तो उचलते. पण कुणाचा आवाज येण्याआधीच तो कट होतो. कुणीतरी आपल्याकडे पाहतंय याची तिला जाणीव होते. आणि म्हणूनच ती इमारतीतून उतरून खाली रस्त्यावर येते. सतत आपल्या मागावर असलेल्या तरुणाला अखेर जाब विचारतेच. पोलिसांच्या तावडीत देण्याची धमकीही देते. तो मात्र इशारा करूनच आपल्याला बोलता येत नसल्याचे सांगतो. ती विश्वास ठेवते, पण त्याच्या मुखातून एक शब्द बाहेर पडतो आणि तो मुका नाही हे तिच्या लक्षात येतं.

दुसर्‍या दिवशी मग तीच त्याचा शोध घेत सेंट लुईस या वसाहतीत येऊन पोहचते. इथे तिला बिंगो हा बास्केटबॉल खेळणारा लहान मुलगा भेटतो. रॉड्रिक्सची पण भेट होते. आणि उलगडत जाते एकेक गोष्ट. तो तरुण खरंच मुका असतो का ? आणि तिचा पाठलाग करण्यामागचं खरं कारण काय असतं? हे खरंतर रंगमंचावर पाहणंच अधिक रंजकदार आहे. एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी या ‘स्टार’ची ही कथा. ती रंगमंचावरही तितक्याच सुरेखरितीने मांडण्यात आली आहे.

राकेश जाधव यांचं हळुवार आणि तितकंच संवेदनशील असं लेखन आणि प्रेक्षकांना त्यात गुंतवून ठेवणारं दिग्दर्शन. कुठेही लांबलचक, क्लिष्ट असे संवाद नाही. जे आहे ते अगदी सोप्या शब्दात मांडलेलं आणि त्यामुळेच कदाचित जास्त भावणारं, भिडणारं. कलाकारांच्या अभिनयाबाबतही तसंच. यातील कलाकार हे आधी पडद्यामागे रंगमंच व्यवस्था सांभाळणारे. त्यांना रंगमंचावरून अभिनय करण्याच्या मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं केलंय. एकूण पाच पात्रे रंगमंचावर दिसतात. त्यातही डॅनियल फक्त काही सेकंदच दिसतो. त्याला ना संवाद किंवा अन्य काही हावभाव वा हालचाली. परंतु तो आला की टाळ्या हमखास पडतात. इथॉनची भूमिका तशी अवघड होती. या व्यक्तीरेखेला एकतर काही बोलायचंच नव्हतं आणि जे बोलायचं होतं ते असाधारण असं. यासाठी अनिल आव्हाड या कलाकारास विशेष परिश्रम घ्यावे लागलेले असणार. आणि त्याने ते घेतल्याचेही दिसून येतं. तर अक्षता टाळे ही अभिनेत्री सौंदर्य स्पर्धांमधून फेस ऑफ इंडिया, मिस इंटरनॅशनल ठरलेली.

तिचा रंगमंचावरील वावर सहज, सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण असा आहे. तिने साकारलेली नभा नुसतीच छान दिसते असं नाही तर तिने अभिनय पण समरसून केला आहे. तिलाच अधिकवेळ दिसायचं आणि बोलायचं होतं आणि त्यात ती कुठेही कमी पडलेली नाही. तिचा पदन्यास पण लक्ष वेधणारा. बिंगोच्या भूमिकेत रोहित वायकरनेही आपली चुणुक दाखवलीय तर तुषार ढेपे याने रॉड्रिक्स, वेटर, डॉक्टर, दुचाकीस्वार अशा पाच विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. इथे हे आवर्जून नमुद करावंसं वाटतं की एखादी भूमिका साकारताना त्या पात्राची भाषा, वेशभूषा, केशरचना याचाही विचार, खरंतर अभ्यास केलेला दिसून येतो. हे सगळे मराठी कलाकार. पण रंगमंचावर ते रॉड्रिक्स, बिंगो, स्टार या व्यक्तीरेखांना सजीव करून जातात. या पात्रांच्या तोंडी वसईतील कुपारी ही भाषा अगदी चपखलपणे वापरली गेली आहे. या कलाकृतीची तांत्रिक बाजू देखील उत्तम आहे. समीर तोंडवळकर यांचे नेपथ्य कलाकृतीची गरज पूर्ण करते. पुढे इथॉनचं घर आणि मागे नभाचं घर अशी रचना. त्याच्या भावाच्या पश्चात ती सदैव त्याच्या पाठीशी आहे हेच यातून प्रतिकात्मकरित्या दाखवण्याचा उद्देश.

ख्रिश्चन कुटुंबाचे घर, डॅनियलची कबर इत्यादी छान उभे केलेय. रोहन पटेल यांचं संगीत आणि श्याम चव्हाण यांची प्रकाश योजना पूरक आणि साजेशी अशीच. नाटकाच्या मुडला अनुसरून राकेश जाधव यांनी गीत लेखन केलेलं आहे. निहार शेंबेकरने गायलेलं ‘पुन्हा ये..’ हे गीत अधिकच श्रवणीय आणि अर्थपूर्ण झालंय. कब्रस्तानातील झाड हवेने हलणं, त्याची पानं गळणं.. अशा बारीक बारीक गोष्टींवर काम केलं गेलंय हे विशेष. या ‘स्टार’चं असं सगळंच ऑल इज वेल असंच आहे.

या नाटकाच्या तिकिटाचं डिझाईन ठरवून कल्पकतेने वेगळं असं करण्यात आलंय. प्रयोग झाल्यानंतरही प्रेक्षक हे तिकीट सांभाळून ठेवतील. एखादी कलाकृती पहिल्यानंतर प्रेक्षक भारावून जातात. स्वत:हुन देहदानाचा फॉर्म भरण्याचा आणि त्यासाठी कार्य करण्याचा संकल्प करतात. पण पुढे मात्र याचा हळूहळू विसर पडू शकतो. पण घरात टेबलावर स्टँडी म्हणून ठेवलेलं हेच तिकीट त्यांना पुन्हा या कलाकृतीची आणि या संकल्पाची आठवण करून देत राहील हा या मागचा हेतू.

या नाटकाची टीम अन्य सामाजिक संस्थांच्या बरोबरीने अवयवदानाबाबत समजात जागृती व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. अवयवदानाचा असा प्रचार आणि प्रसार एका नाट्यकलाकृतीतून केला जातोय हे विशेष. मोहन फाऊंडेशन या संस्थेसोबत अधिकाधिक अवयव दानाचे फॉर्म भरले जावे यासाठी ही टीम कार्यरत आहे. हा फॉर्म आता ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. तरूणाईला आवडेल असा विषय आणि त्याच पध्दतीचे सादरीकरण. अवयवदान, न्युनगंडावर मात यासारखे मोलाचे संदेश यामुळे ही कलाकृती प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते हे मात्र निश्चित!

— श्रीराम वाघमारे

First Published on: July 10, 2022 6:00 AM
Exit mobile version