श्रीकेदारनाथ

श्रीकेदारनाथ

–स्मिता धामणे

सकाळी ७ वाजताच अगदी घाईत तयार होऊन आम्ही मुक्कामास असलेल्या ‘अमिषा’ लॉज येथून १४ कि. मी. वर असलेल्या ‘सोनप्रयाग’ येथे जाण्यासाठी निघालो. दीड तासाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आमची गाडी आली. तर.. ट्रॅफिक जाम.. थोडे पुढे गेल्यावर कोणीतरी आत्मविश्वासाने सांगत होते अगदी थोडे अंतर आहे.. गाडीत बसून राहण्यापेक्षा आपण पायी लवकर पोहोचू. पडत्या फळाची आज्ञा मानून आम्ही सर्व उतरलो.. तर.. अजून पाच.. सहा किलोमीटर अंतर बाकी होते. पुन्हा हात देऊन टॅक्सी करून गेलो. त्यानेही अतिगर्दीमुळे बरेच मागे सोडून दिले. शेवटी चालतच आम्ही ‘सोनप्रयाग’ येथे पोहोचलो. सोनप्रयाग हे अतिशय पवित्र ठिकाण रुद्रप्रयाग आणि गौरीकुंडच्या मध्ये १८२९ मीटर उंचीवर मंदाकिनी आणि वासुकी या पवित्र नद्यांच्या संगमस्थळी वसलेले आहे.

त्रियुगी नारायण मंदिर अतिशय प्रेक्षणीय आहे. ब्रह्मा-विष्णूच्या उपस्थितीत याठिकाणी शिवपार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता. तेथे चेकइन करून टॅक्सीसाठीच्या रांगेत उभे राहिलो. सुरुवातीला अतिशय शिस्तबद्धता जाणवली. पुढे गेल्यावर जें दृश्य बघितले ते अनपेक्षित असेच होते. एखादी टॅक्सी आली म्हणजे तिच्यामागे ४० ते ५० लोक धावत जात. अगदी ढकलाढकली करून तीत बसत. १५..२० गाड्या सोडल्यानंतर आम्हीही तशाच पद्धतीने एक गाडी मिळवली. त्यानेही गौरीकुंडाच्या बरेच मागे सोडले. ज्यांचे हेलिकॉप्टर बुकिंग झाले होते आणि काहीजण त्यासाठी प्रयत्न करणार होते. त्या सर्वांना ह्या दिव्यातून जावे लागले नाही. ‘फाटा ’येथून हेलिकॉप्टर उपलब्ध असतात.

पायी चालत आम्ही गौरीकुंड येथे पोहोचलो. गौरीकुंड हे अतिशय लहान गाव.. केदारनाथ साठीचा बेस कॅम्प आहे. शिवाला प्रसन्न करण्यासाठी येथेच माता गौरीने कठोर अशी साधना केली होती. इथे पार्वतीचे मंदिर आहे. गोमुखातून अविरत गरम पाणी वहात असते.. तेच गौरीकुंड. ह्या गौरीमातेला अन.. केदारेश्वरास मनःपूर्वक वंदन करून आम्हास चालण्याची शक्ती दे.. विनासंकट तुझे दर्शन होऊ दे.. म्हणून प्रार्थना केली.. अन.. चढाईला सुरुवात केली. आमच्या सोबत असलेल्या सर्व जणांनी घोडे, पिठ्ठू, डोलीचा मार्ग निवडला. परक्या ठिकाणी सुरक्षितता म्हणून आम्हालाही घोडा करावासा वाटत होता. परंतु अंतर्मन तयार होत नव्हते.. इतक्या आरामात केदारनाथ भगवानांचे दर्शन घ्यायला. आम्ही पाच जणांनी पायी सुरुवात केली. बराच वेळ एकमेकांसाठी थांबत सोबत चढाई करत होतो. परंतु सर्वांचा वेग.. दम लागल्यानंतर विश्रांती.. खाणे.. पिणे ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन आपल्या हिशोबाने चालत राहू आणि तंबूजवळच भेटूयात असे ठरवले.

सगळीकडे स्वच्छतेची कामे सुरू होती. यात्रेकरू खूप असल्याने त्यांचाही नाईलाज होत होता. भरपूर शौचालये, जागोजागी पिण्याच्या पाण्याची सोय, भरपूर हॉटेल्स, घोडे.. खच्चरसाठीसुद्धा गरम पाण्याची खास सोय होती. पायी चालणार्‍यांना घोडा करण्यासाठी सतावत होते. सगळीकडे घोडे.. खच्चरवाल्यांचेच राज्य होते. जणू पायी चालणार्‍यांना कोठेच जागा नव्हती. खूप जोरात.. पळवतच घोडे आणत होते. बरेच जण पडत होते. काही भरपूर वजनाची माणसं पडलीत म्हणजे भरपूर लागून जात होते. काही तरुण, धडधाकट लोक की जें स्वतःच्या पायांनी चालू शकतात.. ते घोडे, डोलीत स्वार झालेले. काही सत्तरी किंवा त्यापुढील वयस्कर लोकांना श्रद्धा आणि भक्तीपोटी पायी चालायचे होते.

गढवाली बंधुभगिनींच्या काटकपणाला मानाचा मुजरा करावासा वाटत होता. आपल्यापेक्षा वजनाने जास्त भाविकांना पाठीवर उचलून सुरक्षितपणे ने आण करत होते. निसर्गाच्या विरोधात न जाता तो सांगेल त्या पद्धतीने स्वतःच्या जीवनशैलीत बदल करण्याचे त्यांचे कसब अतिशय स्पृहणीय होते. काही तरुणाई फक्त रिल्स आणि फोटोसेशन साठीच आले असल्याचे निदर्शनास येत होते.

प्रत्यक्ष शिवाचा, देवदेवतांचा वास असलेली, साधू संतांची तपोभूमी.. असल्याची ग्वाही येथील पवित्र भूमी आणि सर्व वातावरण देत होती. परमेश्वराची साथ-वास-आणि आशीर्वाद असल्यानेच सर्व प्रकारच्या संकटांवर मात करूनही ही भूमी.. सुजलाम-सुफलाम-सस्य श्यामलाम आहे. गौरीकुंडाच्या बाजूलाच पवित्र अलकनंदेची सहाय्यक नदी मंदाकिनी हिचे विशाल पात्र आपले लक्ष वेधून घेते. गर्जना करत येत असलेली मंदाकिनी.. केदारनाथ शिखराजवळील ‘चारावाडी’ हिंमनगातून उगम पावते. इतर नद्यांच्या तुलनेत हळू वाहणारी म्हणून ‘मंदाकिनी’ नामाभीधान तिला प्राप्त झाले आहे.

भगवद्गीतेत ‘मोक्षदायीनी’ म्हणून उल्लेख आहे. स्त्रियांमध्ये जन्मत:च असणारी.. सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची वृत्ती हिच्यातही दिसून आली. मधुगंगा.. सोनगंगा हिची सहाय्यक नदी. तर सोनप्रयाग येथे वासुकी गंगा नदीसोबत आणि रुद्रप्रयाग येथे अलकनंदेसोबत मिळते. भागीरथी सोबत मिळून गंगेची निर्मिती करते. ८१ किलोमीटरचा प्रवास करत असताना कितीतरी भुरूपे निर्माण करते. सर्व सजीवांचे भरण.. पोषणाचे कार्य अविरत न थकता करते. तिच्या काठावरील कित्येक लोकांना रोजगार मिळून ते आनंदी जीवन जगत आहेत. परिसराच्या सौंदर्यात तिनेच बहार आणली आहे. एक शल्य मनास बोचत होते की.. दुकानदार, पर्यटक .. प्लास्टिकसह सर्व कचरा तिच्या नदीपात्रात आणि किनार्‍यावर ढकलून मोकळे होतात. नद्यांचे पावित्र्य राखणे फक्त २ टक्के लोकांनाच शक्य होते.

सभोवतालच्या निसर्गाची, पवित्र स्पंदनांची अनुभूती घेत आम्ही आमच्या चालीने..चढाई करत होतो. पायी चालणार्‍या भक्तगणांचा.. ‘हर.. हर.. महादेव, बम.. बम.. भोले.. जय शिवशंभू भोले की फौज.. करेगी मौज असा जयघोष करत मार्गक्रमण करत होते. सहस्त्रधारा धबधब्याने आमचे चित्त वेधून घेतले. भरपूर लोक स्नानाचा आनंद घेत होते. आम्ही डोळे भरून सारा नजारा बघितला. आठवण म्हणून कॅमेर्‍यातही कैद केला नि पुढे निघालो. जंगलचट्टीतच भैरवनाथांचे मंदिर आहे म्हणून ह्यास भैरवचट्टी असेही म्हणतात. गौरीकुंडापासून चार किलोमीटर आम्ही आलो होतो. थंडी असूनही कठीण चढाईमुळे घामाघूम होत होतो. सर्वत्र बर्फाचे डोंगरच डोंगर..२०१३ मध्ये झालेल्या हानीचे अवशेष… बदललेला रस्ता, मोडलेले पूल, ढासळलेले डोंगर, मोडकी दुकाने बघून मन नाराज होत होते.

त्यापुढे दोन किलोमीटर आल्यानंतर ‘भीमबली’ येथे भीमाची छोटी मूर्ती आहे. नंतर रामबाडा.. छोटी लिंचोली.. मोठी लिंचोली.. छानी कॅम्प अशी चढाई ‘ॐ नम: शिवाय’ च्या नामस्मरणात छान होत होती. इतक्या सुंदर आणि समृद्ध निसर्गाचे वरदान ह्या पृथ्वीमातेस लाभले.. त्यातही भारत देशाला भरभरून.. इतर कोणत्याही देशात फक्त एक किंवा दोन प्रकारात मोडणारी जंगले आढळतात, परंतु आपल्या देशात चक्क १६ प्रकारात मोडणारी अतीविस्तीर्ण अशी जंगले आहेत..चढाई दरम्यान बांधलेला पायरी रस्ता सोडून इतर सर्व ठिकाणी दाट जंगल, वृक्षवेली, खळाळणारी नदी, हिमशिखरे, रस्त्याच्या दुतर्फा साचलेला बर्फ दृष्टीक्षेपात होते.

आम्हास..
पायी चढाईचा नाद..
दर्शनासाठी..
शंभो भोलेनाथ..
घालत होता साद..

त्यामुळेच लक्ष्य होते फक्त चढाई.. केदारनाथाची.. पूर्ण करण्याची. अधिकाधिक ‘खडी चढाई ’ होत असल्याचे जाणवत होते. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ हे तत्व हृदयी लेवून चढाई सुरू असतानाच एक ६९ वर्षांच्या आजी आणि ७२ वर्षांचे आजोबा स्वबळावर चढाई करत असताना भेटले. ते म्हणाले, बेटी.. कें.. मोक्ष, दार.. द्वार, नाथ.. तारणहार.. सर्वांचा स्वामी साकार स्वरूपात मंदिरात बसला असताना.. भय ते कसले??? आम्ही दरवर्षी पायीच चढाई करतो. काही बरे-वाईट घडले तरी मुक्ती निश्चितच.. कारण हे ‘मुक्तीचे द्वार ’आहे. अशी माणसे बघून स्फुरण चढत होते.१२ ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात जास्त उंचीवरील, पंचकेदारातील एक केदार, छोटा चारधाम यात्रेतील तिसरा खडतर धाम.. उत्तराखंड सरकारने ‘केदारनाथ वन्यजीव अभयारण्य’ (गोपेश्वर) म्हणून संरक्षण दिल्याने वृक्षतोड.. तस्करी थांबून पशुपक्ष्यांना अभय मिळाले आहे.

जास्त थकवा वाटल्यास आपण ‘लिंचोली’ येथे नाश्ता-जेवण-आराम-मुक्कामही करू शकतो. सर्वच आनंद घेत मोठी लिंचोली, छानी कॅम्प, रुद्रा पॉईंट येथे पोहोचलो.. तेव्हा तिन्ही सांजेची चाहूल लागत होती. आकाश आणि सारा आसमंत रविराजांना निरोपाचे विडे देण्यास सज्ज झाला होता. वडिलोपार्जित तालेवारी ल्यालेल्या ह्या हिमालयाच्या पोटातून हसत.. खेळत.. खळाळत बाहेर पडणारे असंख्य धबधबे स्वतःचा काहीएक विचार न करता मंदाकिनीच्या पवित्र पात्रात अलगद सामावून तिच्या संगतीने जीवसृष्टीस संपन्न करण्यात धन्य.. धन्य समजत होते. चालण्याचा वेग.. घोडे, खच्चर, डोली ह्यांच्या गर्दीमुळे.. दांडगाईमुळे वाढविणे शक्य होत नव्हते. काही विपरीत घडण्यापेक्षा सावध राहिलेले केव्हाही उत्तम. थोडी सपाटी दिसली की तेथे दुकान, तंबू दिसत होते. कोरडे हवामान आणि स्वच्छ.. सुंदर.. गार वारा सध्यातरी थकवा जाणवू देत नव्हता.

आणि वायू, प्रेमळा हे, बंधमुक्ता, येऊनी
छेडिली आनंदवीणा माझीया प्राणातुनी..
गे निशे, आलीस तू आधारसिंधू घेऊनी
अन.. उषेची भव्य आशा तू दिली गर्भातुनी..

रात्र झाली म्हणजे अंधारात चालणे अवघड होईल असे वाटत असतानाच सर्वत्र दिव्यांची रोषणाई झाली. एका रांगेत लागलेले परंतु वळणा-वळणाच्या, गर्द हिरवाई, बर्फाच्छादित पर्वत मुकुटांवर अन विविधरंगी तंबुंच्या पार्श्वभूमीवर शांतशा सांजछटा.. अस्ताचली निघालेल्या रविकरांचा संधीप्रकाश अन.. ह्या दिव्यांच्या प्रकाशाचे मिलन अतिशय मोहक असे भासत होते.. मोठे विहंगम दृश्य होते. तिन्ही सांजेची पवित्र केदारघाटीतील स्पंदने.. एक वेगळीच.. कधीही अनुभवली नाहीत अशी अनुभूती देत होते. देव आपल्यासोबतच आहे ही खात्री ते क्षण आम्हा उभयतांस देत होते.

खरोखरच खूप भाग्यशाली आहोत आपण म्हणून आपले गुरु आणि शिवशंभू ही चढाई आपल्याकडून करवून घेत आहेत. हा विचार क्षणभरही आम्ही विसरत नव्हतो. अधुनमधुन पाणी पिणे.. जवळील काही खाणे चालू होते. पाठीवर सॅक घेऊन चालणे अवघड होत असताना गढवाली बंधू पाठीवर माणसांचे ओझे कसे बरे वाहत असतील? घोडे.. खच्चरांकडुन खूप जास्त श्रम करवून घेत होते. मुक्या जिवांची पाठीची सालही रक्ताळलेली दिसत होती. रस्त्यात अतिश्रमाने मृत्यू झाला म्हणजे त्याला तेथेच पडू देत होते. ह्या सर्व कारणांमुळे आम्हास त्यावर बसावेसे वाटत नव्हते.

कातळ पर्वतरांग.. खोल दरीतून विशाल पात्रात खळखळाट करत वाहणारी पांढर्‍याशुभ्र स्फटिकासमान पवित्र जलाची गौरीकुंडापासून तर बेसकॅम्प पर्यंतची मंदाकिनीची अविरत सोबत होती. सुरक्षिततेसाठी एका बाजूने बॅरिकेड्स लावलेले. हिमाच्छादित पर्वतमुकुटांवर कृष्णमेघांचा पाठशिवणीचा खेळ चांगलाच रंगला होता.चढाई.. दमणं.. ताजेतवाने होणं.. पुन्हा चालणं.. निसर्गाचा हृदयस्थ आनंद घेणं.. माथा गाठणं.. हेंच ध्येय.. आता ६५ ते ८० अंशांची खडी चढाई.. पावलागणिक कस लागत होता.. मन आणि शरीर.. सकाळपासून अविरत चालत असलेल्या.. थकल्या.. भागल्या पायांना.. थोडंच राहिलंय म्हणून समजावत होते.

कितीही चाललो तरी दुसरी वळणाची वाट तयारच..शेवटी किती राहिले हे बघणेच सोडून दिले. यायचे तेंव्हा येईल.. आपण फक्त चालायचे.. आता वर्दळ कमी होऊन थंडी वाढलेली.. बर्फवृष्टी सुरु झालेली.. ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याने डोके गरगरायला लागलेले. दहा.. बारा पावलेच मी चालू शकत होते. थांबून घोटभर पाणी पिऊन कापूर हुंगायचा.. पुन्हा चालणे सुरु. रस्त्यात आम्ही दोघेच चालत होतो. अशी भरपूर कस पणाला लावणारी शारीरिक, मानसिक, बौद्धिक चढाई झाल्यानंतर बेस कॅम्पचा फलक दृष्टीस पडला. अतिशय थकल्याभागल्या जीवाला कोण आनंद झाला म्हणून सांगू???

आम्ही आमचे कुटुंब मित्र श्री. प्रकाश थोरात ह्यांना फोन लावून आमच्या तंबूचे ठिकाण विचारले. रात्री १ वाजता.. त्यांनी आवश्यक ते मार्गदर्शन केल्यामुळे लवकर तंबू सापडला. समोरून एक बाई दर्शन करून येत होत्या. त्या म्हणाल्या, बेटी.. हम सुबह से कतार में खडे थे, अभी दर्शन हों सका, ‘तेरी तो राह देख रहा हैं शिवशंभो, जल्दी से जाकर दर्शन कर लो, अभी कोई नहीं हैं मंदिर में, आमची अवस्था फारच बिकट होती. सामान येथे ठेऊन पाणी पिऊन जाण्याचा विचार मनात आला. पाठीवरील सॅक काढून थोडं पाणी पिऊन पाठ टेकताच केंव्हा झोप लागली ते कळलेच नाही. सकाळी बाहेर बोलण्याच्या आवाजाने एकदम जाग आली. तशीच उठून बाहेर आले… बघते.. तो.. काय??

वर्णनातीत.. नजारा समोर होता. खूप दिवसांपासून स्वतःच्या पायांनी चालून केदारनाथ येण्याचे स्वप्न पूर्ण झालेले मी उघड्या डोळ्यांनी बघत होते. उगवतीच्या दिनकराने त्याचे सहस्त्र बाहू कोवळ्या लोभस किरणांसोबत केदारनाथ शिखर आणि त्याच्या अफाट पसरलेल्या मांदियाळीवर अगदी मुक्तहस्ताने पसरले होते. जणू सोनेरी मुकुट घालून ह्या सर्वांचा स्वागत.. सत्कार.. समारंभ चाललेला. ह्या गडबडीत दाट धुकेही मागे हटण्यास तयार नव्हते. पांढर्‍या, निळ्या.. कृष्णवर्णी ढगांसोबत धुक्याची लगट पाहण्यासारखी होती. हे हिमालयीन निसर्ग कलेचं कोंदण अफाट अशा क्षितिजापर्यंत दाटीवाटीनं पसरलेलं.. बर्फाच्छादित हिमालयीन पर्वत रांगा अन नितळ निळे आकाश.. हा अलौकिक नजराणा अनुभवण्याचे.. डोळ्यात साठवण्याचे.. दर्शनापूर्वी अनुभवलेला निसर्गाविष्कार.. हा साक्षात्कार घेण्याचे सुख.. काय म्हणावे बरे याला? याचसाठी.. केला.. होता.. अट्टाहास..

दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालो. काल सकाळपासून केदारघाटी चढत असताना निसर्गाची अफाट, अद्भुत, किमयागारी रूपे जवळून न्याहाळता आली होती. ३५८१ मीटर..२२००० फूट मंदाकिनीच्या तटावर अभिमन्यूचा नातू जनमेजयाने इंटरलॉकिंग टेक्निक वापरून इतक्या उंचावर किमती दगड आणून मंदिर कसे उभारले असेल? मध्ये गेलेल्या हिमयुगात ४०० वर्षे ही मंदिरे बर्फाखाली गाडली गेली होती. आदी शंकराचार्य आठव्या शतकात सनातन हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी हिमालयात गेले असता ती मुक्त केलीत. मंदिराच्या शिळावर कोणतेही ओरखडे, खुणा दिसत नाहीत. स्कंध, वायू, केदारकल्प, केदार खंडात वर्णन आले आहे. बाराशे वर्षांपासून ही यात्रा सुरू आहे. नर आणि नारायणाला जवळ राहण्याचे वरदान दिले होते.

गुप्तकाशी येथे गुप्त होऊन हिमालयीन रेड्याचे रूप धारण करून पांडवांच्या अपार श्रद्धा, नि:स्सीम भक्तीवर प्रसन्न होऊन धरतीमधुन प्रगट होऊन पाठीच्या रूपात त्रिकोणी शिवलिंग धारण करून पांडवांना दर्शन दिले. त्याभोवतीच उखळ पद्धतीने एकसमान शिळा वापरून मजबूत मंदिर बांधले आहे. आद्य शंकराचार्यांनी देखभाल व पूजा कर्नाटकच्या लोकांकडे सोपवले होते. आजतागायत तसेच सुरू आहे. कन्नड भाषेत मंत्र उच्चारण होते. दरवाजे अक्षय तृतीयेला उघडून भाऊबीजेस सहा महिन्यांसाठी बंद होतात. मूर्ती मिरवणूक काढून ओखीमठ ‘येथे नेऊन पूजा करतात. येथे तेवत असलेला दीपक सहा महिने चालूच असतो. सहा महिन्यांनी कपाट उघडल्यावर सर्वत्र स्वच्छ आणि आताच पूजा केल्यासारखे प्रसन्न वाटते. फुले टवटवीत असतात. तेथूनच ५०० मीटर वर शिवाचा सेनापती वीरभद्र.. भैरवनाथाचे मंदिर आहे. क्षेत्रपाल म्हणून घाटीच्या संरक्षणाची जबाबदारी ह्यांचीच असते. पाठीमागे आदी शंकारांचार्यांचे समाधीस्थळ आहे. भीमशिळाही आहे.

सारा इतिहास आठवत मंदिरासमोर आलो तर भलीमोठी दर्शनरांग होती. आमचे सोबत असलेले मित्र श्री व सौ. दिवाकर ह्यांच्या ओळखीतील मुख्य सायं पुजारी ‘औसेकर गुरुजी’ ( बार्शी ) ह्यांच्या निवासस्थानी आम्ही चौघे गेलो. प्रसाद म्हणून दिलेला चहा थंडीमध्ये अमृतासमान भासला. त्यांनी आम्हाला ‘केदारनाथ महादेवाचे’ दर्शन त्वरित घडवले. चौकोनी चांदीच्या चौरंगात त्रिकोणी पाठीच्या आकारातील शिवलिंग बघून त्यापुढे नतमस्तक होऊन आम्ही धन्य.. धन्य झालो. तेथील स्पंदनांमुळे आमचा थकवा.. शीण कोठल्या कोठे पळाला. नंतरही त्यांच्या घरी नेऊन आम्हांस तेथील उदी आणि प्रसाद दिला. ज्या महंतांमुळे इतक्या गर्दीतही चटकन दर्शन झाले त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांना यथायोग्य दक्षिणा देऊन तंबूकडे निघालो.

सामान बांधून सॅक पाठीला लावल्या. अन.. उतराई सुरू केली. आता होत असलेली बर्फवृष्टी अधिक सुखावह वाटत होती. कारण दर्शनामुळे झालेली तृप्तता सोबत होती. रस्त्यात बर्फ फोडून बाजूला करण्याचे काम सुरूच होते. साडेतीन चार तासातच गौरीकुंड येथे पोहोचून गरम पाण्यात डुबक्या मारल्या. दोन तास टॅक्सीसाठी रांगेत उभे राहिलो. तेथून सोनप्रयाग आलो. तीन किलोमीटर चालत आमची गाडी असलेल्या ‘सीतापूर’ पार्किंगला गेलो. खूप मोठे पार्किंग असल्याने बर्‍याच चालीनंतर गाडी मिळाली. मग आम्ही गुप्तकाशी येथील आमच्या लॉजवर आलो. दोन घास खाल्ले. मनात विचार आला.. आमचे पाय आज किती चालले असतील बरे? भगवंताने त्याच्या कृपेचा वरदहस्त आमच्यावर ठेऊन इतकी अवघड चढाई आमच्याकडून करून घेतली. कर्ता.. करविता परमेश्वर असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.

First Published on: August 27, 2023 5:15 AM
Exit mobile version