‘सोलो ट्रेक्स’ निखळ जीवनानुभव !

‘सोलो ट्रेक्स’ निखळ जीवनानुभव !

‘मी’ या एका अक्षरात प्रत्येकाच्या जीवनाचे जणू महाभारत सामावले असावे. मी कोण ? हा तत्त्वज्ञानातील आद्यतम प्रश्न. त्याचं उत्तर पोथी चोपडीत न मावणारं खरंतर सृष्टी पटलावर ते अनुभूतीनं जगावं.

गिर्यारोहणातल्या वैयक्तिक ‘सोलो’ पदभ्रमंतीत हा ‘मी’उलगडतो आणि ‘मी पण’ मावळून जातं. पस्तीस वर्षापूर्वी माझ्यातल्या ‘मी’ चा शोध प्रवास सुरु झाला. गड दुर्गांच्या वाटा धुंडाळताना रानोमाळ उनाडताना केव्हाच दमल्यासारखे वाटत नव्हते. फार क्वचितच कुलंग-मदन-अलंगचा ट्रेक किंवा हरिश्चंद्र गडाची बेलपाडा घळीची वाट संपता संपत नसल्याने आंगठ्याची नखं तेवढी बळी पडायची. पण चेहरा काही सुकायचा मात्र नाही. कारण एकच जिथं जातोय ते इप्सित स्थळ एकदाचं मिळावं. गडाचा पडका तट किंवा जमीनदोस्त झालेलं द्वार जरी नजरेस दिसलं की श्रम सार्थकी लागल्यागत सुख मिळायचे. काय होतं हे सुख? कोणती होती याची परिभाषा? त्याचं गमक अजूनही सापडलं नाही बुवा.
फक्त एक सूत्रं, एक तत्व त्या राजाच्या कर्तृत्वानं तनामनांत जखडलं गेलं होतं. त्या विलक्षण वेडापायी सगळे मोह- आप्त-नातीगोती अलिप्त होत होती.

गडाच्या अवतीभवतीचा परिसर आपलासा वाटायचा. पर्वतांचे ते चढउतार, ती गच्च गर्द वनराई, त्या रानवाटा, खाचखळगे, ते डोह, नद्यांची सताड ओली-सुखी पात्रं, त्या वस्त्या, ती आपल्याहून वेगळ्या बोलीभाषा पेहरावातली माणसं या सर्वांशी एक ऋणानुबंध असल्यागत वाटायचे.

वनचरांशी, वृक्षवल्लींशी, पशुपक्ष्यांशी, दर्‍या-खोर्‍यांशी, गडकोटांशी, हवा पाणी पर्यावरण यांच्याशी असणारे माणसाचे मित्रत्वाचे नाते समजावून सांगणारा निसर्ग हा माझ्या भावविश्वाचा भागच झाला होता. त्यामुळे ती अनामिक ओढ मनात सदैव गुंजारव घालीत असे.

साहजिकच गजबजलेल्या शहरातून कधी एकदाचा पळ काढावासा वाटेबंधन झुगारण्याचा कोडगेपणा आपसुख स्वीकारला होता.

‘ट्रेक दि सह्याद्रीचे’ नकाशे उघडायचे. किल्ले निवडायचे. रेंज ठरवायची रूट ठरवायचा. खिशात जुजबी पैसे किती हवेत ठरवायचे आणि ती बेगमी झाली की खुशाल घर सोडायचं. कुठे जातोय नि कधी येतोय ? घरातून प्रश्न नाही त्यामुळे उत्तराची पर्वा नसायची. ते वेड होतं.घरच्यांच्या दृष्टीने मी सुधारण्या पलीकडे ठार वेडा झालो होतो.
डोंगर चढून पोट भरणार का? गपगुमान कुठे चार चौघासारखी नोकरी करावी चार पैसे जमवावेत हीच त्यांची सुखा समाधानाची व्याख्या आणि माझ्याकडून अपेक्षा होती.

माझं वेड त्याही पलीकडच्या सुखाशी एकरूप झालं होतं. फुलांचा वास फुलाच्या पाकळ्यांत असतो. फळाची चव फळातच असते. व्यक्तिसुख देखील व्यक्तित्वाचे अंग असते. जसे झर्‍याचे पाणी झर्‍यातून, तसे माणसाचे सुख मनातून पाझरते. सुख हे कशाचे संपादन नसते तर फक्त आपल्याच अंतरंगाचे आविष्कारण, प्रकटीकरण असते. ज्यासाठी मला निसर्ग गडकोट आणि त्या साहसी वाटा सादावीत असायच्या.

एक दोन किल्ल्यांवर एकट्याने जायची सवय जेव्हा रुजली, त्यानंतर यथावकाश आलोच आहोत तर आजूबाजूचेही किल्ले पाहून घ्यावेत यातून माझं माझ्यापुरता स्वतःच असं ‘सोलो ट्रेक्स’चे तंत्र निर्माण झालं.

‘चांदवड ते सप्तश्रृंगी’ ही किल्ल्यांची सातमाळा रेंज ठरवली की,अंदाजे साताठ दिवसांची खूणगाठ बांधून विनातिकीट कसारा गाठायचे. तिथून नाशिक हायवेवर चालत येत तिथल्या एक चहाच्या टपरीवर पोहोचायचे. तिथे थांबलेल्या मालवाहतुकीच्या ट्रक ड्रायव्हरास विनंती करून लिफ्ट मिळवायची.

खिशात एवढे पैसे हवेत की पूर्ण प्रवासांत फारतर 2 वेळेस ड्रायव्हराचे कटिंग चहाचे पैसे आपण पुढे पुढे करून भागवायचे. मध्ये इकडच्या तिकडच्या गोड संवादात त्याला आपलासा करायचा. मुद्दाम चार केळी जवळ ठेवून वाटेत एखादे पुढे केले. एवढे करता आले की दूरचा प्रवासही फुकट झाला समजायचा. आपल्या प्रेमापुढे काय बिशाद त्या ड्रायव्हरची, आपल्याकडून पैसे मागायची. हे उपद्व्याप मी ठरवून केलेयत. मग चांदवड पाशी किंवा जवळपास उतरायचं. त्यातूनही जमलेच तर अगोदर मनमाड जवळचे अंकाई टंकाई हे दोन किल्ले अगोदर करून यायचे.

जवळपास तीसेक वर्षापूर्वीचे दिवस ते. आता वाटांचे रस्तेरस्त्यांचे हायवे झालेयत.जुन्या खुणा बदलल्यात.चांदवड किल्ला अहिल्याबाई होळकर यांचा वाडा पाहून इंद्रायीदुर्गाच्या वाटेवर पहिला साडेतीन डोंगराला वळसा घालून पुढे इंद्रायीचा चढाव धरायचा. इथे एक झाप होता. साद घातली असता, अगदी काळाकुट्ट अवलिया बाहेर येतो. मागून 2-3 शेमडा मातीनं माखलेली इवली इवलीशी पोरं. आश्चर्य वाटतं, या उन्हातान्हात हा इथे काय करतो, का राहतोय?. भूक लागली म्हणून भात आहे का विचारलं तर बाजरीची पार कडकडीत भाकरी हातावर ठेवली. रात्रीस होईल विचार करून सोबत ठेवली.

कातळात खोदलेल्या भल्यामोठ्या पायर्‍या पार केल्यात की गडाच्या वार्‍यावर पोहोचतो. निर्मनुष्य एकांत त्यामुळे गडाचे एकटेपण अंगावर आल्याचा भास व्हायचा. त्यात आपण एकटेच. सन्नाटा एकांताचीसुद्धा भीती हावी होतेच. त्यामुळे होईल तो संवाद आपलाच आपल्याशी गड हिंडायचा. गडाच्या बालेकिल्ल्यावरून पार सप्तश्रृंगी-अहिवंत-अचलापर्यंत सादावीत असलेली गिरीदुर्गाची शृंखला डोळ्या-मनात साठवून घ्यायची.

गडावरच्या डोंगर कपारीत दडलेल्या महादेवापाशी आपल्यापुरता सुरक्षित निवारा शोधायचा.
विस्तव जमा करायचा. आणि बिनधास्त इंद्रायीच्या आसमंताशी संवाद साधत काळोखातून उजाडायची वाट पाहायची.
दुसर्‍या दिवशी राजदेर गडापायथ्याशी वसलेल्या राजदेर वाडीत पोहोचून नंतर गड चढून-उतरून पुन्हा पुढील किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचायचे असे नियोजन करायचे. एकदा का वाडी वस्ती दिसली की पावलं चालत नव्हती तर अक्षरशः पळत असत. अंकाई- टंकाई , चांदवड, इंद्रायी-राजदेर-कोलदेर-कांचन मांचन- धोडप-(इखारिया)-रावळ्या जावळ्या-मार्कंडेय- ते थेट सप्तश्रृंगी गडापर्यंत ही मजल दरमजल नियोजनबद्ध ठरवावी लागे.

किल्ला पायथ्याच्या प्रत्येक वाडी वस्तीत कुणी दूरवरून एकटा युवक गडाच्या ध्यासाने फिरतोय याचे बहुतांश आश्चर्य-कौतुक व्हायचे. त्यामुळे मुक्कामाची जेवणा खाण्याची पाहुण्याप्रमाणे सोय व्हायची. इतकंच काय तर पुढच्या प्रवासात भुकेची व्यवस्था म्हणून न मागताही भाकरी ठेचा कांदापात, भुईमुगाच्या शेंगाची शिदोरीही काळजीने मिळायची. कुठेही एक पैका खर्च नाही.त्यांच्या मनाच्या श्रीमंतीनं माझं मन भरून यायचं. माझ्या पिट्टूत तेव्हाचे दोन रुपयात मिळणारे 4-5 पार्ले जी माझ्यासाठी अडीअडचणीत ठेवत असे. मुक्काम सोडताना घरातील एखाद्या चिमुकल्याच्या हाती यातील एक ठेवताना तेवढेच बरे वाटे.

हा असा माझा ‘एकला चलो रे प्रवास’ तिथून सुरू झाला, तो आजतागायत सुरू आहे.

सह्याद्रीच्या चार मुख्य पर्वत धारेतील गडकोटांची शृंखला एका मागोमाग एक होऊ लागल्यात. अंजनेरीपासून त्र्यंबकेश्वर-हरिहर-बासगड-उतवड तर केव्हा सिंहगड-राजगड-तोरणा-बोराट्याच्या नाळीतून लिंगाणा ते रायगडकधी नाणेघाट-जीवधन-हडसर-हाटकेश्वर-चावंड-दुर्ग धाकोबापर्यंत. किल्ल्यांच्या ध्यासातून सोलो ट्रेकचा प्रवास माझ्या जगण्याचा आधार झाला होता. यात सर्वात कष्टदायक आणि जिवावरही बेतणारी ठरली ती कुलंग-मदन-अलंग-रतनगड ते हरिश्चंद्रगडाची पूर्णतः निर्मनुष्य जंगलातील आणि कातळ प्रस्तरारोहणाचे आव्हान असलेली खडतर भ्रमंती. या सोलोत, कानावर हात लावण्याचे माझ्यावर असे कित्येक प्रसंग ओढवलेत. चांदवड आणि मदनगडाचा तुटलेला प्रवेश त्यासाठी करावे लागलेले विदाऊट बिले प्रस्तरारोहण आणि इखारिया सुळक्याची चिमणी क्लाइंबिंग हे जीवावर बेतणारे प्रस्तरारोहण होते. पुन्हा एकटा कधी या वाटेस जाऊ नये, असे ठरवले.

पण भटकंतीची आस आणि न आवरता येणारी वैयक्तिक खाज स्वस्थ बसू देत नाही म्हणूनच तर या ओढीने बघता बघता 438 किल्ले पाहून झालेत. कुणासाठी-कुणावर कधी विसंबून इतका प्रवास झाला नसता.

गिर्यारोहणात अशा सोलो भटकंतीत आपसुखपणे कळत नकळत असे अनेक गोड-कटू-कठीण अनुभव संस्कार वाट्यास येत असतात. किंबहुना प्रत्येक खेपेस काहीतरी वेगळे. फक्त ते कुठून कसे केव्हा येतील ते कळायचे आणि सामोरे जायचे कसब-सभान हवे.

धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी धोडांबे गावात वस्तीस असता रात्री जेवताना त्या घरधणीन माऊलीने माझ्या ताटातील भाकरीच्या तुकड्यावरील करपलेला पापुद्रा तिच्या लक्षात येताच तो मलाही कळायच्या आत झटकन उचलून बदलावयास कोणता संस्कार-श्रीमंती म्हणावी? हा संस्कार आपण कुठे किती पैका खर्च करून मिळवू वा देऊ शकतो का? असे खूप काही पदोपदी जणू जगणं समृध्द करावयाचे धडे मांडलेलेच असावे.

‘सोलो ट्रेक’, ही माझ्यासारख्या सामान्य युवकास संजीवनी होती. जगण्यास समृध्द करण्यास आवश्यक ते ते गिरीकंदरी हिंडत असता मिळत गेले. कारण ते तिथेच होते. निवडण्याची स्वीकारण्याची तळमळ होती. माणसांनी कशासाठी जगायचे? याचे उत्तर जगण्यात असते. जीवन या नावाची विशुद्ध आणि निसर्ग दत्त अशी जी स्फूर्ती, तिची अभिव्यक्ती आयुष्यभर घडत राहते. या स्फूर्तीचे आविष्कारण हेच जीवनाचे अंतिम प्रयोजन. अनेक अंगांनी, रंगांनी, रूपांनी बहरत जाणे हा जीवन शक्तीचा विलास असतो. हे सारे काही या सोलो-प्रवासात अनुभवता येत होते.

आज गिर्यारोहण आणि मुद्दाम अनुभवावे असे दुर्मीळ क्षण पार बदलून गेलेयत. सोलो ट्रेकच्या भानगडीत कुणी सहसा जातही नसेल. स्थळ-काळ-लय-गती समजण्या पलीकडे बदललीय. भावना जिव्हाळा आटू लागलाय.

आज, प्रत्येकाची गडापर्यंत वाहनं पोहोचतात त्यामुळे एस.टी.च्या प्रतिक्षेची, प्रवासाची, त्यात भेटणार्‍या इरसाल माणसांची ताटातूट झाली.

एस.टी.च्या थांब्यापासून गावकर्‍यांशी विचारपूस करीत गडाची वस्ती-माथा गाठायचा सुख संवाद हरवला. हरिश्चंद्र गडावर जर चायनीज नॉनव्हेज मिळू लागलं तर तिथे झुणका भाकर ठेच्याचा सुगंध दुर्मिळच होणार ना? बिसलेरी, ही कातळ डोहातल्या थंडगार जलाची चव घेईल काय? आजही माझ्या भ्रमंतीमध्ये मला लाभलेल्या, मला संस्कारित करून गेलेल्या माणसांच्या मनाची श्रीमंती आणि कर्तृत्वाची उंची आठवते. जी मला केव्हा गाठता आली नाहीय. माझे वंदनीय गुरुवर्य बाबासाहेब पुरंदरे यांच्यासोबत एकदा रायगडचा चढ चढत असताना महादरवाजापाशी थांबलो असता बाबासाहेब म्हणाले होते, रामेश्वर, कोणत्याही गडाच्या पवित्र भूमीवर जाशील तेव्हा तुला या गडाच्या इतिहास भूगोलात डोकावता यावयास हवं. ही चैनीची स्थळं नव्हेंत तर इथे आल्यावर बेचैन हो. इथे का-केव्हा-कसे-कुणी-कधी असे एक ना अनेक प्रश्न मनात पडावयास हवेत. त्याची उत्तरं शोधावयाचा अट्टाहास धर.

एकदा वणीच्या सप्तश्रृंगीनंतर नाशिकहून परतताना तात्या शिरवाडकर म्हणजे आपले लाडके कुसुमाग्रज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेलो असता, उन्हातान्हात रापलेला माझा चेहरा बघून म्हणालेत, रामेश्वर, ध्यास दिसतोय. डोळे, कान, मन जागृत ठेव. या वाटेवर तुला बरंच काही मिळेल, कदाचित मिळणारही नाही. पण थांबू नकोस. मार्ग पवित्र आहे. माझ्यासाठी तात्यांचे आशीर्वाद बहुमोल ठरलेत. याच गडकोटांच्या-निसर्ग दर्‍याखोर्‍यांच्या वाटेवर मला खूप काही मिळालं. जगण्याचा अर्थ आणि अर्थपूर्ण जगण्याचा मार्ग सापडला.

स्वामी विवेकानंद यांनी जगात ईश्वर आहे का ? या जिज्ञासा वृत्तीने जीवनाचा धांडोळा घेतला असता शेवटी ते मी या भगवंताचे लेकरू, या अनुभूतीपर्यंत पोचले. I have truth to teach, I I the child of God.
बा.भ.बोरकर म्हणतात, ‘मी पण ज्यांचे गळले हो, जीवन त्यांना कळले हो’.
‘मी’ -पण मावळल्यानंतर उदयास येणारा ‘मी’ हेच माझे ‘स्व-रूप’.
‘मी कोण’ ? हे आरंभी सतावणारे कोडे असते. ‘मी तर ब्रम्ह’हा त्याचा उलगडा असतो.
निसर्ग-प्रवास इथवर तर पोहोचलाय.

-रामेश्वर सावंत

First Published on: February 14, 2021 7:10 AM
Exit mobile version