बिच्चारा गणू!

बिच्चारा गणू!

गणूने ठरवलं, आता आपण काळासोबत राहायचं. आपला ढ विद्यार्थ्यासारखा गेटअप बदलून टाकायचा. ऑफिसात, सोसायटीत, ट्रेनमध्ये, कुणीही येतो आणि आपल्याला टपलीत मारून जातो ही परिस्थिती अंतर्बाह्य बदलून टाकायची. गणूमध्ये असं एकाएकी परिवर्तन होण्याचं कारणही तसंच होतं. गणूच्या बॉसने त्या दिवशी ऑफिस सुटता सुटता त्याला अर्धाएक तास थांबायला लावलं. त्याला ऑफिसच्या निर्मनुष्य गच्चीत नेलं आणि गणूची सरळ बिनपाटीदप्तराची शाळा घेतली.

बॉस म्हणाला, गणू, सगळे जण तुझी खेचत असतात, ताणत असतात, मला हे सगळं बघून खूप वाईट वाटतं. मला हे सगळं खूप हिंसक वाटतं. हे कुठेतरी थांबायला हवं. तुझा सन्मानाने जगर्‍याचा हक्क तुला मिळायला हवा.

आपल्या रोजच्या भळभळत्या जखमेवर आपल्या ऑफिसातला बॉसच अशी फुंकर मारतो आहे हे पाहून गणूच्या सर्वांगावर शहारा आला. त्याने बॉसला विचारलं, हे सगळं थांबवण्यासाठी काय करायला हवं हे तुम्हीच सांगा!

बॉस म्हणाला, हे सगळं थांबवण्यासाठी जे काही करायचं ते तुलाच करायचं आहे. तुझ्या मनाचा गबाळेपणा तुलाच दूर करायचा आहे. तुझ्या मनाचा दुबळेपणा तुलाच घालवून टाकायचा आहे.

बॉसच्या प्रत्येक शब्दाला चांगलीच धार चढली होती. बॉसचा प्रत्येक शब्द ऐकताना गबाळ्या मनाच्या दुबळा गणू आत्मविश्वासाने नुसता फसफसत होता. येताजाता आपली टर उडवणार्‍यांची आता आपणच कशी भंबेरी उडवू शकतो ह्या विचारानेच त्याचा चेहरा फुलून आला होता.

गणूने बॉसच्या नजरेला नजर भिडवत करारीपणे विचारलं, त्यासाठी मला काय करावं लागेल बॉस?

बॉस म्हणाला, तुला स्वत:ला अपडेट करावं लागेल…तुला नेहमी अपडेटेड राहावं लागेल!

बॉस हा सल्ला देतानाच बॉसला गबाळ्या गणूचा दुबळा चेहरा वाचता आला. त्या चेहर्‍यावर आपल्या सल्ल्यातलं अवाक्षरही पोहाचलं नसल्याचं बॉसला स्पष्ट दिसलं. बॉस आतल्या आत किंचित वैतागला, पण गबाळ्या मनाचा दुबळा गणू आणखी गबाळ्या, आणखी दुबळा होऊ नये म्हणून त्याने गणूला स्पष्टच सांगून टाकलं, गणू, हे बघ, तू आता रोज चार-पाच वर्तमानपत्रं विकत घेत जा, हे लोक तुझी राजकारणावरून हुर्रेवडी उडवत असतात ना, आता तू त्यासाठी स्वत:चा वेळ काढ, राजकारणातली बित्तंबातमी वाच, प्रत्येक वर्तमानपत्रातले संपादकीय लेख वाच, त्यातली व्यंगचित्रं डोळ्याखालून घाल, इंटरनेटवर जा, इथूनतिथून उभीआडवी माहिती मिळव आणि मग एकेकाची अशी जिरव की आपल्या ऑफिसातल्या प्रत्येकाने राजकारणावर बोलताना तुझी ट्युशन लावायला हवी.

झालं, गणूने दुसर्‍या दिवशीपासून आपलं गबाळेपण, दुबळेपण भिरकावून द्यायचं ठरवलं. बॉसचा सल्ला शिरसावंद्य मानून दुसर्‍या दिवसापासून वर्तमानपत्रांचा रतीब लावला. इंटरनेटवर जाऊन टुकार-भिकार बातम्यांपासून चुकार बातम्याही वाचू लागला. विद्वज्जड शब्दांत लिहिणार्‍या साक्षेपी संपादकांचे लेख वाचू लागला. त्यातल्या जड-अवजड शब्दांची न कंटाळता फोड करू लागला. अमेरिकेतल्या व्हाइट हाउसपासून जळगावच्या महानगरपालिकेपर्यंतची खडान्खडा बातमी त्याला आता मिळू लागली.

आता त्याला लोकशाही कळू लागली, लोकशाहीच्या वेष्टनात मिटलेली लोकशाही कळू लागली. घटना कळू लागली. हायकमांड कळू लागलं. चिंतन बैठका कळू लागल्या. जनाधार कळू लागला. शून्य प्रहर कळू लागला. निषेध, धिक्कार, कडी निंदा कळू लागली. भद्र-अभद्र युती कळू लागली. बातमीमागची बातमी कळू लागली. बातमीच्या पोटातली बातमी कळू लागली. तापलेली बातमी कळू लागली, ढापलेली बातमी कळू लागली. दडवलेली बातमी कळू लागली.

एखादी सिटी स्मार्ट झाली नसेल, पण गणू स्मार्ट झाला. त्याच्या चेहर्‍यावरचं दुबळेपण ओसरलं, त्याच्या व्यक्तिमत्वातलं गबाळेपण गळून पडलं.

आता त्याने राधाकृष्ण विखेपाटलांचा मूळ पक्ष बरोबर सांगितला.

नारायण राणेंचा आताचा पक्ष बरोबर सांगितला.

आजच्या कुणाचा उद्याचा पक्ष कोणता असेल तेही बरोबर सांगितलं.

कोणत्या सिनेमातला कोणता कलाकार, खेळाच्या मैदानावरचा कोणता क्रिकेटपटू उद्या कुणाच्या बाजूने असेल, कुणाच्या बाजूला बसेल हेही त्याने बरोबर ओळखलं.

आता कुणालाच त्याची फिरकी ताणता येइनाशी झाली. कुणालाच त्याला गिर्‍हाईक बनवता येईनासं झालं. आता तो टाइमपासचं साधन बनणं अशक्य झालं होतं.

फक्त परवा काय झालं, जिलेटिनच्या काड्यांचा आकडा त्याला सांगता आला नाही…आणि ऑफिसात पुन्हा गणूची टिंंगलटवाळी सुरू झाली…बिच्चारा गणू!

First Published on: March 28, 2021 4:30 AM
Exit mobile version