सुवर्णा सुकाळेंचा विदेशी भाजीपाला

सुवर्णा सुकाळेंचा विदेशी भाजीपाला

सुवर्णा सुकाळे यांनी आईसबर्ग, झुकिनी, पॅकचॉय, रेड लोलोरोझा अशा विदेशी भाजांची लागवड केली आहे. हा भाजीपाला मुंबई, ठाणे, पुण्यात विक्री होत असून यांची दर महिन्याला लाखांची उलाढाल होते. हा विविधरंगी भाजीपाला पाहण्यासाठी दूरदूरहुन लोक भेट देत आहेत. या सर्व कामासाठी आत्मा कृषी विभाग आणि कृषी अधिकारी यांचे नेहमी सहकार्य लाभत असल्याचे सुवर्णा यांनी सांगितले.

शेती पारंपरिक पद्धतीने केली तर शेतकर्‍यांना तोटादेखील सहन करावा लागतो. शेतकरी शेतीत खर्च करतो, मात्र हवा तसा भाव मिळत नाही. त्यामुळे अभ्यासू शेतकरी मार्केटचा अंदाज घेऊन नवीन पीक पद्धती अवलंबत आहेत. आज घडीला अनेक शेतकरी दर्जेदार उत्पन्न घेत आहेत. मात्र विक्री व्यवस्था आपल्या हातात नसते. त्यामुळे अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात निराशा सोडून काहीच उरत नाही. असाच अनुभव सुवर्णा यांना आला. त्यामुळे त्यांनी पारंपरिक फळभाज्या न घेता विदेशी फळभाज्या लागवडीचा निर्णय घेतला. शिवाय स्थानिक बाजारपेठेतही या भाज्यांना चांगलीच मागणी असल्याचे दिसून आले.

सुवर्णा सुकाळे या प्रगतिशील शेतकरी पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यांनी मार्केटमधील मागणी बघितली आणि त्यानुसार पीक पध्दतीत बदल केला. विदेशी फळभाज्यांचा भाव केला जात नाही. शेतकरी सांगेल ती रक्कम मोजून द्यावी लागते. सुवर्णा यांनी स्वतःचा शेतमाल विक्रीसाठी तशी व्यवस्था उभी केली. त्यांच्या कामात पती समीर यांनी खंबीरपणे साथ देत आहेत. त्यांनी संपूर्ण बाजारपेठेचा अभ्यास केला. त्यानंतर फळभाज्या लागवड करण्याचा निर्णय घेतला. पीक लागवडीचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केले. त्यांनी एकरभर विदेशी भाजा लागवड केली. सहा एकरवर कलिंगड लागवड केली. फक्त आपली शेतीच समृध्द न करता आजूबाजूच्या शेतकर्‍यांचाही माल त्या विक्री करतात. त्यामुळे शेतकर्‍यांनादेखील प्रत्यक्ष मदत होत आहे.

सुवर्णा यांच्याकडे दहा एकर शेती आहे. पूर्वीपासून पारंपरिक पीक म्हणून भात आणि भाजीपाला लागवड करत होते. मात्र त्यात खर्च अधिक आणि उत्पन्न कमी होत असे. त्यामुळे शेतीत बदल करणे काळाची गरज होती. भात काढल्यानंतर शेती अनेक महिने खालीच राहत होती. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की त्यात नवीन पीक पध्दत अवलंबता येईल. सुरूवातीला त्यांनी मार्केट सर्व्हे चांगल्या पध्दतीने करून घेतला. त्यानंतर विदेशी भाज्या लागवड केली. त्यात त्यांनी आईसबर्ग, झुकिनी, पॅकचॉय, रेड लोलोरोझा असे नवनवीन विदेशी पिके लागवड केली. यासोबतच त्यांनी उर्वरित क्षेत्रावर मिरची, टोमॅटो, कलिंगड लागवड केली. सुकाळे पिकांवर सर्व प्रकारचे सेंद्रिय किडनाशक फवारणी करतात. तसेच सेंद्रिय खतांचाही अधिक वापर असतो. त्यामुळे बाजारपेठेत त्यांच्याकडील मालाची गुणवत्ता आणि चकाकी बघून चांगला दर मिळतो.

सुवर्णा यांना सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. विक्री व्यवस्था तसेच कोरोना काळात स्थानिक बाजारपेठा बंद होत्या. त्यामुळे भाजीपाला विक्री कुठे करणार ही समस्या भेडसावत असतानाच त्यांनी परिसरातील शेतकर्‍यांशी चर्चा केली. त्यांचादेखील भाजीपाला त्यांनी पुणे, ठाणे, मुंबई येथे विक्रीसाठी पाठवला. माल काढणीनंतर शीतगृहात ठेवला. प्लास्टिकची पॅकिंग करून ग्राहकांना घरपोच पाठवू लागल्या. चांगली पॅकिंग आणि ताज्या भाजीपाल्यामुळे ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळू लागला. त्यामुळे मार्केटमध्ये त्यांच्या मालाची अधिक मागणी वाढली.
जास्तीत जास्त पोषणमूल्य असणार्‍या भाज्या व वर्षभर पुरवठ्यातील सातत्य यात विदेशी भाजीपाला सरस ठरत आहे. शेतकर्‍यांनाही या पिकांचा मोबदला चांगला मिळत असल्याने ते भाजीपाला उत्पादनाकडे वळले आहेत. त्यात सर्वात जास्त महत्वाचे म्हणजे परदेशी भाज्यांची शेती. आज परदेशी भाज्यांची मागणी वाढत आहे. शेतीला किफायतशीर बनवणारी ही पिके जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. यांची मागणी कमी होणार नाही.

शेतीतून दर्जेदार उत्पादन मिळत असले तरी विक्री व्यवस्था आपल्या हातात नसेल तर काही वेळा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. असाच काहीसा अनुभव कांबरे बु.(ता. भोर, जि. पुणे) येथील प्रयोगशील महिला शेतकरी सुवर्णा समीर सुकाळे यांना आला होता. त्यामुळे त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास आणि ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल केला. तसेच स्वतःची शेतीमाल विक्री व्यवस्था उभी करण्याचे चांगले नियोजन केले. याचा त्यांना सकारात्मक परिणाम दिसून आला. गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी पती समीर यांच्या साथीने शेतीमाल उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत नियोजन केले आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून सुकाळे यांनी स्वतःच्या शेतीमध्ये पीक लागवडीचे नियोजन केले. उपलब्ध क्षेत्र आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेतली.

भाजीपाला विक्रीचे नियोजन

सुवर्णा यांना पहिली दोन ते तीन वर्षे उत्पादित शेतीमालाची विक्री करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यावर त्यांनी मार्ग काढला. लॉकडाउनच्या काळात सर्व बाजारपेठा बंद होत्या. भाजीपाल्याचे नुकसान होत होते. हे टाळण्यासाठी त्यांनी गावातील शेतकर्‍यांशी चर्चा केली. त्यांच्या भाजीपाल्याचे संकलन करून पुणे, मुंबई, ठाणे शहरांत विक्रीस सुरुवात केली. भाजीपाल्याची काढणी केल्यानंतर तो पुण्यातील शीतगृहात आणला जातो. तेथे भाजीपाल्याची प्रतवारी केली जाते. त्यानंतर हा भाजीपाला पनेट पॅक, प्लॅस्टिक पिशवीमध्ये पॅकिंग करून ग्राहकांना दिला जातो. योग्य पॅकिंगमुळे ताजा भाजीपाला ग्राहकांना मिळत असल्याने चांगला प्रतिसाद मिळू लागला.

शेतीमालाच्या विक्रीसाठी पुढाकार घेतल्यानंतर वाहतूक आणि शेतातून भाजीपाला गोळा करण्यासाठी सुवर्णाताईंनी गावकर्‍यांची मदत घेण्याचे ठरविले. यामध्ये शेतकर्‍यांच्या शेतीवरून भाजीपाला गोळा करणे, प्रतवारी, वाहतूक आणि ग्राहकांपर्यंत भाजीपाला पोहोचविण्याचे नियोजन केले जाते. शेतीमालाच्या वाहतुकीसाठी सुवर्णाताईंनी शेतकरी कंपनीच्या माध्यमातून सात रेफर व्हॅन घेतल्या आहेत. आवश्यकतेनुसार सुवर्णाताई स्वतः गाडी घेऊन भाजीपाला ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवितात. मागील तीन वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने भाजी विक्री करत असल्यामुळे ग्राहकांपर्यंत भाजीपाला योग्य पद्धतीने पोहोचत आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात अडचणी असतानाही पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई शहरातील सोसायटीधारकांपर्यंत भाजीपाला पोहोचविण्यात सुवर्णाताई यशस्वी झाल्या. सुरुवातीला चार ते पाच दिवस ग्राहकांचा प्रतिसाद कमी मिळत होता. मात्र, ग्राहकांची असलेली गरज ओळखून हळूहळू पॅकिंगमध्ये भाजीपाला विक्रीचे नियोजन करण्यात आले. यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली. आता हक्काने आमच्या सोसायटीत या असे अनेक सोसायटीधारक आवर्जून सांगतात.

–राकेश बोरा 

First Published on: June 19, 2022 6:30 AM
Exit mobile version