हरवलेला उंबरा…

हरवलेला उंबरा…

पूर्वी घराची चौकट ही प्रामुख्याने लाकडाचीच असायची, आणि तिला जोडणारा दुवा म्हणजे उंबरा किंवा उंबरठा, मंदिरातच्या गाभार्‍यात प्रवेश करण्यापूर्वी, तेथे असणार्‍या उंबर्‍यावर आधी मस्तक टेकवले जाते ते या मुळेच, भगवान विष्णू यांनी तो पुराणात पावन करून टाकला आहे. जुन्या काळात कोणतीही आचारसंहिता नसतानादेखील काटेकोरपणे तिचे पालन केले जात असे, म्हणजे उंबरा ओलांडताना आधी उजवा पाय टाकावा, घरातील जी कुणी व्यक्ती बाहेर गेली असेल ती लवकर घरी परत यावी म्हणून स्टीलचे फुलपात्र उंबर्‍याजवळ उपडे ठेवावे, संध्याकाळच्या वेळी उंबर्‍यावर बसू नये, जर कदाचित उंबर्‍याजवळ उभे असताना शिंक आली, तर लगेच उंबर्‍यावर थोडेसे पाणी लगेचच शिंपडावे, असे खूप अलिखित नियम उंबर्‍याविषयी होते व ते पाळलेही जात.

पूर्वी गावाची लोकसंख्या मोजत असताना, सहज शब्द निघून जाई साधारणपणे हे हजार ते पाचशे उंबर्‍यांचं गाव असेल. एक उंबरा म्हणजे एक घर, असा त्याचा अर्थ व्हायचा. आताशा घरांना उंबरेच राहिलेले नाहीत त्यामुळे तसं काही होताना दिसत नाही. एखादा कुणी आगंतुक जर का आपल्या घरी येऊन उंबर्‍यावर बसला, तर मग गमतीने आपण म्हणतो, की कायरे भो, माझ्याकडे तुझं काही घेणं आहे का ?, बसला माझ्या दारात येऊन..!

मराठी चित्रपटात तर हे वाक्य असतंच, आता मी जातो पण सांगून ठेवतो, की जेव्हा याचा सूड घेईन तेव्हाच या घराचा उंबरठा ओलांडेन…, किंवा नातं संपल्याचं वाक्य म्हणजे, आता मरेपर्यंत मी या घराचा उंबरठा ओलांडणार नाही, म्हणजे आपल्या आयुष्यात या उंबरठ्याचं किती महत्व आहे, स्वर्गीय स्मिता पाटील व गिरीश कर्नाड यांचा ‘उंबरठा’ हा चित्रपट कोण विसरेल ? गंजल्या ओठास माझ्या धार वज्राची मिळू दे, असं कदाचित उंबरा आम्हास सांगत असावा, असं मला वाटतं.

नववधू उंबर्‍यावरील धान्याचे माप ओलांडून, आपल्या पतीच्या घरात प्रवेश करते, मात्र अगोदर तिला आपल्या घराचा उंबरा हा ओलांडावा लागतो, म्हणजे दोन्ही ठिकाणी उंबरा साक्षी, आनंद व दुःख यांचा मूक साक्षीदार, पण आता जमाना बदलला, फ्लॅट अपार्टमेंट, घरातील उंची फर्निचर कार्पेट, ट्रॉली, भारी सोफे, ते टेरेस गार्डन छताला लटकणार्‍या झुंबराच्या झगमगाटात मात्र त्या उंबराच्या असण्या नसण्याचे महत्वच कुणाला वाटेनासे झाले आहे. आजकाल घरासाठी आपण कर्ज घेतो, त्याचे हप्ते भरतो व यासाठी आपण स्वतःचे एक बजेट बनवतो, एवढा खर्च घरासाठी हा करतो, मात्र कुठल्याच फ्लॅटला लाकडी उंबरा नसतो, वा दिसतच नाही, कुणी त्यासाठी खर्चही करत नाही, किंवा त्यासाठी तरतूद ही करत नाही.असं म्हणतात की, उंबर्‍यामध्ये त्या घरा बाहेरील नकारात्मक ऊर्जा अडवण्याची प्रचंड अशी शक्ती असते, घराबाहेरील ऊर्जा ही सूर्यऊर्जा, तर घरातील म्हणजे उंबर्‍याच्या आतील ऊर्जा ही चंद्रऊर्जा असते. आता घराला उंबराचं नाही म्हटलं की बाहेरची नकारात्मक ऊर्जा ही घरात येणारच, म्हणूनच आजच्या पिढीची सकारात्मकता ही कमी झालेली असावी.

–महेंद्र जोशी, नासिक

First Published on: April 17, 2022 5:25 AM
Exit mobile version