मोबाईलचा नाद खुळा!

मोबाईलचा नाद खुळा!

गेल्या काही महिन्यांत मुलांमध्ये हिंसा वाढत असल्याची वृत्ते प्रसारमाध्यमांतून समोर येत आहेत. तीव्र स्वरूपाच्या हिंसक घटना, हत्या, बलात्कार अशा घटनांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग स्पष्ट होत आहे. शाळा स्तरावर शिक्षकांशी बोलल्यानंतर विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची सवय कमी झाली आहे. विचार करून वर्तन करण्यापेक्षा आणि पुस्तकात रमण्यापेक्षा विद्यार्थी दूरदर्शन, मोबाईलमध्ये अधिक रमत आहेत. वाढत्या स्क्रिन टाईममुळे विद्यार्थ्यांच्या मनातील हिंसेची पातळी उंचावत आहे. इतक्या लहान वयात विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेली हिंसेची भावना चिंताजनक आहे.

त्यामुळे याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या कालखंडात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल, टॅब देण्यात आले. घरात बसून राहावे लागत असल्याने पालकांसोबत मुलेही दूरदर्शनच्या कार्यक्रमात वेळ घालवत होती. इतर वेळी असलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ मुले दूरदर्शन, मोबाईलच्या समोर होती. हाती आलेल्या मोबाईलचा उपयोग करण्यास मुले चांगली सरावली होती. अभ्यासाबरोबर यू ट्यूब तसेच विविध संकेतस्थळे विद्यार्थी सहजतेने हाताळत होती. पालकांनी विद्यार्थ्यांच्या हाती शिक्षणासाठी आंतरजालाशी जोडणी करत मोबाईल दिल्याने मुले त्याचा पुरेपूर उपयोग करत होती.

विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी म्हणून मोबाईल हाती देण्यात आला होता, मात्र आता प्रत्यक्षात शाळा सुरू झालेल्या आहेत, मात्र त्या काळात मोबाईल तत्सम साहित्यासाठीच्या वेळेची सवय फारशा वेगाने कमी होताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करता कोरोनाच्या काळात कितीतरी पट अधिक वेळ विद्यार्थी स्क्रिन टाईमसमोर होती. शाळा सुरू झाल्याने काही प्रमाणात वेळ कमी झाला असला तरी पुरेशा प्रमाणात विद्यार्थी स्क्रिन टाईमपासून दूर गेलेले नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलची सवय इतकी रूजली आहे की त्याशिवाय जणू त्यांचा अभ्यासच होणार नाही. कोरोना काळातील सवयीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या संपादनावर होत आहे. येत्या काही काळात शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवरदेखील परिणाम झालेला अनुभवास येईल. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांच्या हाती हे तंत्रज्ञान देताना विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या वाटा अधिक काटेरी तर करत नाही ना? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शेवटी तंत्रज्ञान कितीही चांगले असले तरी ते वापरण्याचा विवेक आणि शहाणपणा याची नितांत गरज असते.

कोणतेही तंत्रज्ञान नव्याने आले की त्याचा शिक्षणात उपयोग करण्याचा विचार केला जातो. तसे होणे सहाजिक असले तरी ते चुकीचे आहे असेही नाही, मात्र काही कालावधीनंतर त्याचा खरंच गुणवत्तेवर परिणाम झाला आहे का? याचा अभ्यास करण्याचीदेखील गरज आहे. मुळात नवीन काही आले की त्यासंदर्भात जाहिरातीच्या माध्यमातून समाजमन घडविण्यासाठी बरेच काही सांगितले जाते. त्या जाहिराती हा बाजारीकरण व्यवस्थेचा नियम आहे, मात्र खरंच तसं काही घडत आहे का? खात्री करण्याची गरज असते. आरंभी जेव्हा दूरदर्शन संच हे साधन हाती आले तेव्हा त्याची जाहिरात होती की दूरदर्शन संच घरी आल्यानंतर घरात सारे एकत्रित येतील, मात्र तसे काही झाले का? त्याप्रमाणे आपण दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहिल्यानंतर शिक्षण झाले का? याचे उत्तर नाही असेच आहे. जगभरातील अभ्यासकांच्या मते दूरदर्शनवरील कार्यक्रमात मुले जेव्हा गुंतून पडतात तेव्हा मुले केवळ वेळ वाया घालवत असतात.

त्यांच्या या वाया जाणार्‍या वेळेमुळे ते बाहेरील अनुभवांना मुकत असतात. अर्थात दूरदर्शनवरील कार्यक्रमाने शब्दसंपत्ती, आत्मविश्वास, नवीन ज्ञान, बाहेरील जगाचे ज्ञान मिळेल असे मोठ्यांना वाटत असते. ते कार्यक्रम पाहिल्याने मुले शहाणी होतील असं वाटणं आणि तसं होणं यात अंतर आहे हे लक्षात घ्यायला हवं. आपल्याकडे दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवरील सादर होणार्‍या कार्यक्रमांकडे पाहिले तर मुलांना जाणून घेणारे आणि त्यांच्या वयाला अनुरूप विशेष कार्यक्रम निर्मितीचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. त्या मुलांचे भावविश्व, त्यांचा परिसर, त्यांचा वयोगट, भाषा यांचा विचार करून कार्यक्रम निर्मिती होत नाही. त्यामुळे ते कार्यक्रम पाहिल्याने फार काही ज्ञानात भर पडेल असे संशोधनातून समोर आलेले नाही. पाश्चात्य देशात याबाबत बरेच संशोधन झालेले आहे. त्या संशोधनातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. कैसर फौंडेशनच्या अभ्यासात त्यांनी मांडलेली मते विचारात घेतली तर आपल्या सहजतेने लक्षात येईल.

त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार झोपण्याच्या खोलीत दूरदर्शन संच असेल तर विद्यार्थ्यांच्या संपादन स्तरात बदल होत असल्याचे समोर आले आहे. झोपण्याच्या खोलीत दूरदर्शन संच असलेले आणि संच नसलेल्या विद्यार्थ्यांच्या संपादनाचा अभ्यास केला असता भाषा विषयाच्या संपादनात साधारण साडेसात टक्क्यांचा फरक असल्याचे दिसून आले. गणिताच्या संपादनात साधारण दहा टक्के इतका फरक आढळून आला आहे. दूरदर्शन संच ज्यांच्याकडे आहे आणि अधिक वेळ मुले जर दूरदर्शन संच पाहत असतील तर त्यांच्या झोपेवर त्याचा विपरीत परिणाम होतो हे यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. आज अनेक कुटुंबात विद्यार्थ्यांच्या झोपेचा प्रश्न आहे. त्याबरोबर आरोग्याच्या समस्यादेखील समोर आल्या आहेत. त्याचबरोबर नेत्र आजाराच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या हाती मोबाईल, घरात दूरदर्शन संच आहे. मुले या माध्यमातून अनेक प्रकारच्या गोष्टी पाहत असतात. त्यातून त्यांच्या मनात निर्माण होणार्‍या विचारात हिंसेचे विचारही येत असतात. भावनिक विकासाचा प्रश्नही निर्माण होतो. खरंतर किती वेळ आपण स्क्रिनसमोर असायला हवे यासंदर्भात काही संशोधने झाली आहेत. आपण त्याबाबत विचार करण्याची गरज आहे. अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स या संस्थेने म्हटले आहे की, दोन वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना अजिबात दूरदर्शन पाहायला देऊ नये. त्यानंतर शालेय वयातील विद्यार्थ्यांनी साधारण आठवड्याला दहा तास दूरदर्शन कार्यक्रम पाहिले तर विद्यार्थ्यांच्या संपादनावर परिणाम होत नाही, मात्र त्यापेक्षा अधिक वेळ दूरदर्शन पाहणार्‍या विद्यार्थ्यांच्या संपादनावर परिणाम झालेला दिसून येतो. आज तर साधारण आपल्याकडे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहत आहेत.

त्याच कार्यक्रमासोबत विद्यार्थी मोबाईलवरील कार्यक्रम पाहतात. त्यामुळे त्याचा होणारा परिणाम लक्षात घेतला तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता खालावली असल्याची बाबही समोर येते. मुले जेव्हा अधिक काळ स्क्रिन टाईमवर असतात तेव्हा त्यांच्या भावनिक क्षमतांवर विपरीत परिणाम झाल्याची बाबही समोर येते. याबाबत अनेक अभ्यासकांनी मत व्यक्त केले आहे. आपण जेव्हा डिजिटल गॅझेटवर अधिक वेळ खर्च करतो तेव्हा मुलांमधील सहनशीलता कमी होते. आभासी जीवनाची सवय लागत जाते. वेगवेगळ्या कार्यक्रमात जे पाहतात तेच खरे ही भावना दृढ होत जाते. तेथील कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जे पाहतो त्यातून कार्यक्रम आपल्या आवडीप्रमाणे सतत बदलता येतात, मात्र प्रत्यक्ष जीवनात तसे घडताना दिसत नाही. त्यामुळे नेटाने काम करण्याची सवय हरवली जाते. सतत उत्तेजनांचा शोध, नवनवीन काही पाहण्याची सवय वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात चिडचिड निर्माण होते.

विद्यार्थी आभासी प्रतिमेच्या प्रेमात पडतात. तेथे कसे छान छान असते, तेथे जे दिसते त्या स्वरूपात आपल्याकडे नाही याबद्दलची भावना निर्माण होते आणि त्यातून स्वत:बद्दलची न्यूनगंडाची भावना वाढत जाते. विविध स्वरूपाचे कार्यक्रम पाहिल्याने तुलना होते, उणिवांची जाणीव होते. वास्तवाचे भान विसरले जाते. त्यातून चिडचिड वाढते. त्यातून विद्यार्थ्यांचा संताप वाढत जातो. त्याचबरोबर यासारख्या बदलांमुळे एकाग्रता कमी होते. अनेकदा नैराश्य वाढते. त्यातून विद्यार्थ्यांच्या मनावर ताण येतो. त्यातून विकारात भर पडते आणि मुले अधिक चिंताक्रात होतात. त्याचा परिणाम म्हणून मुले स्वत:ला संपविण्याचा विचार करतात.

भावनाशून्यता आल्यास मुले हिंसत बनतात. आपण जेव्हा अधिक वेळ मोबाईल खेळतो तेव्हा मोठ्या माणसांवरदेखील परिणाम होतो हे समोर आले आहे. मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थी खेळ खेळत असल्याने त्यात अधिक वेळ वाया घालवतात. ही बाब गंभीर असल्याने चीनने त्या वेळेवर बंधने आणण्याचा विचार केला आहे. त्यादृष्टीने कडक नियम केले आहेत. विद्यार्थ्यांनी रोज ऑनलाईन किती वेळ खेळ खेळावेत यासंदर्भात कंपन्यांवर बंधने टाकली आहेत. त्यामुळे येत्या काही काळात आपणासही तसा विचार करावा लागेल का? आपणही राज्यात शालेय व महाविद्यालय आवारात मोबाईल वापरण्यावर यापूर्वी बंधने टाकली होती, पण दुर्दैवाने मोबाईल अपरिहार्य झाला आहे. आज विवेकाने वाट चाललो नाही तर भविष्यात सृजनाच्या वाटा बंद होतील.

(लेखक शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत)

First Published on: December 18, 2022 1:00 AM
Exit mobile version