अटीतटीची झुुंजाझुंज !

अटीतटीची झुुंजाझुंज !

टेनिस आणि क्रिकेट

हिंदी सिनेमातील एक गाणे आहे.. ममैं इधर जाऊं या उधर जाऊं?.. गेल्या रविवारी क्रीडाप्रेमींची अवस्थाही यासारखीच .म्हणजे .. हे पाहू का ते पाहू? .. अशी झाली होती. एकीकडे विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना तर दुसरीकडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होता आणि दोन्हीतील थरार अनुभवायचा मोह काही आवरत नव्हता. त्यामुळे एकदा ही वाहिनी तर एकदा ती वाहिनी, अशी सारखी बदलाबदल करावी लागत होती. क्रिकेटमधील दोन षटकांच्या मधल्या काळात टेनिसकडे तर टेनिसमधील दोन सेटच्या विश्रांतीच्या वेळी क्रिकेटकडे असा थोडासा दिलासा मिळत होता. पण तरीही प्रत्येक वेळी तिकडे काय झाले असेल, अशी शंका मनात असायची.

नेमतके तेवढ्या वेळात काहीतरी महत्त्वाचे घडलेले पाहायचे राहून तर जाणार नाही ना? ही धाकधूक मनात काय असायची. तरीही दोन्हीकडे फिरत राहायला पर्यायच नव्हता. कारण एकीकडे फेडरर आणि जोकोविच यांची 8-8, 9-9 अशी बरोबरी तर दुसरीकडे डाव संपताना न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांची बरोबरी, नंतर सुपर ओव्हरमध्येही बरोबरी. अशी अक्षरशः जीवघेणी म्हणावी अशी लढत.

अशी झुंज, अशी चुरस, आणि तीही अगदी अखेरच्या क्षणापर्यंत, क्वचितच पाहायला मिळते. म्हणजे बोर्ग-मॅन्केन्रो, फेडरर-नदाल यांच्यातील विंम्बल्डन टेनिस स्पर्धेचे अंतिम सामने किंवा क्रिकेटमधली अविस्मरणीय टाय टेस्ट! या ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजमधील कसोटीच्यावेळी सुदैवाने तेव्हा कोंडीफोड (सुपर ओव्हर) वा चौकारांची मोजदाद असा काही प्रकार नव्हता. त्यामुळे दोन्ही संघांना समान न्याय मिळाला होता आणि मालिका हरूनही फँ्रक वॉरेल यांच्या संघाची विजेत्यांच्या थाटात मिरवणूक काढून त्यांना ऑस्ट्रेलियन रसिकांतर्फे प्रेमाचा निरोप देण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया जिंकले होते आणि विंडीजनेही प्रेक्षकांची मने जिंकली होती. जशी टेनिसमधील लढतींतही दोन्ही खेळाडूंनी क्रीडारसिकांची मने जिंकली होती.

विम्बल्डन आणि विश्वचषक क्रिकेट. टेनिस आणि क्रिकेट जगतातल्या दोन मानाच्या स्पर्धा. योगायोगाने या वर्षी या दोन्ही स्पर्धंचे अंतिम सामने एकाच दिवशी खेळले गेले. त्यातही अधिक चुरशीचा सामना कोणता, या बाबत उत्तर देणे अतिशय अवघड काम आहे. दोन्ही सामन्यांतली चुरस शेवटपर्यंत कायम होती आणि नंतरही खरा विजेता कोण याचे उत्तर देणे त्याहूनही कठीण होते. अटीतटीची झुंज म्हणजे काय हे या दोन्ही सामन्यांमध्ये दिसून आले. त्याचबरोबर नियमांबाबत चर्चाही रंगली. कारण असे की विजेतेपद विभागून देणे हे बहुधा संघटकांना मान्य नसावे. एकच विजेता हवा हा अट्टाहास कशापायी? आणि त्यासाठीचे निकषदेखील वादातीत नाहीत.

त्यामुळेच या सामन्यांमध्ये कोण विजयी आणि कोण पराभूत हे ठरविणे अशक्य झाले. खरे तर संयुक्त विजेते असेच जाहीर करायला हवे होते असे बहुसंख्य क्रीडाप्रेमींचे मत असेल अशीच शक्यता आहे. कारण एकाला जेता ठरविले तर आपण दुसर्‍यावर अन्याय करत आहोत, ही खंत मनाला बोचत राहिली असती आणि कुणावरही अन्याय करणे ही काही खिलाडूवृत्ती नाही, हे सर्वांनाच माहीत होते.

या दोन्ही अंतिम सामन्यांबाबत सविस्तर बरेच सविस्तर लिहून आले आहे, त्यामुळे ते पुन्हा सांगण्याची गरज नाही. मात्र रसिकांना खटकणार्‍या काही गोष्टी आहेत आणि त्याबाबत दीर्घकाळ चर्चा होत राहणार हे नक्की. पहिली गोष्ट म्हणजे झटपट निकाल मिळावा यासाठीचे नियम खेळाडूंवर अन्याय करत नाहीत का? चूक पंचांची असो वा नियमांतील दोष असो, त्याचा फटका कुणालातरी सोसावाच लागतो, हे मान्य करायचे तर त्याबरोबरच आपण दुसर्‍यावर अन्याय तर करत करत नाही ना? ही शंका सतत पोखरत राहते.

म्हणजे दीर्घकाळ चाललेल्या लढतीचा निकाल टेनिसमध्ये दोन गेमच्या फरकाऐवजी दोन गुणांच्या फरकावर लावला जातो. ठीक आहे, पहिल्या चार सेटमध्ये हा निकष वापरला जातो, पण अखेरच्या निर्णायक सेटमध्येही का? भले बारा-बारा गेम अशी बरोबरी झाल्यावर तो वापरला गेला. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की रॉजर फेडररने दोन सेट जिंकताना नोवाक जोकोविचची सर्व्हिस तीनदा तरी भेदली होती. उलट जोकोविचने दोन सेट जिंकले ते टायब्रेकरवर. आणि पाचवा सेट आणि सामना जिंकला तोही टाय-ब्रेकरवरच. निर्णायक पाचव्या सेटमध्ये ही दोघांनी एकमेकाची सर्विस भेदली होती. त्याबाबतीतही दोघे समान होते.

मग त्या निकषावर तो फेडररच श्रेष्ठ ठरत नाही का? किंवा विश्वचषक क्रिकेटचा विजेता ठरवण्यासाठी जास्त चौकार कोणत्या संघाचे, हे बघितले गेले. (आणि असा काही नियम बर्‍याच काळापूर्वी करण्यात आहे, याची माहितीही बहुतेकांना नव्हती, कारण याआधी कधीही त्याचा वापर केला गेला नव्हता व त्यामुळे तो जणू काही विस्मरणातच गेला होता.) मग कोणत्या संघाने जास्त बळी मिळवले हे का नाही पाहायचे? न्यूझीलंडने इंग्लंडचे सर्व गडी बाद केले होते तर इंग्लंडने न्यूझीलंडचे आठच गडी बाद केले होते. चौकार हा निकष मानायचा तर डॉट बॉल म्हणजे ज्या चेंडूंवर धाव काढण्यात अपयश आले ते चेंडू का मोजायचे नाहीत? मग त्यानुसार अशा प्रकारे जास्त चेंडूंवर धाव घेण्यात अपयशी झालेल्या संघाला पराभूत का मानायचे नाही? असे प्रश्नही विचारले जाऊ शकतात.

बहुसंख्य क्रीडाप्रेमींना या दोन्ही सामन्यांचे प्रतिस्पर्धी हेच खरे मानकरी आहेत असे वाटते. त्यात उजवे डावे करण्याची त्यांची तयारी नसते. खरे तर एखाद्याचे नशीब म्हणून सोडून देण्यासाख्या या बाबी नाहीत. एक गोष्ट मात्र खरी की, दोन्ही सामन्यांत पराभूत झालेल्यांनी त्याबाबत अजिबात तक्रार केलेली नाही. त्यांनी खिलाडूवृत्तीने पराभव स्वीकारला. न्यूझीलंडच्या खेळाडूंनीच नाही, तर त्यांच्या पाठीराख्या प्रेक्षकांनीही त्याच वृत्तीने संयम दाखवून तो मान्य केला. त्यामुळे तर त्यांचे कौतुक करावे तितकेच थोडे. फेडररच्या पराभवामुळे दुःख झाले, पण जोकोविच जिंकला म्हणून राग आला नाही, तर त्याचेही कौतुकच वाटले. त्यानेही नव्याने बर्‍याच प्रेक्षकांची मने जिंकली. कोर्टवर जवळजवळ पाच तास खेळणे, आणि तेही कडव्या प्रतिस्पर्ध्याबरोबर हे काही येर्‍यागबाळ्याचे काम नाही. त्याला शरीराच्या तंदुरुस्तीबरोबरच मनाचा खंबीरपणाही आवश्यक असतो, आणि तो फेडरर आणि जोकोविच यांनी दाखवला.

क्रिकेटमध्येही अटीतटीच्या प्रसंगी मनावर दडपण न घेता शांत राहणे, महत्त्वाचे असते कारण संयम सुटला तर कोणतीही साधीशी चूक होऊ शकते. त्यामुळे सामना गमवायचीच वेळ येते. पण केन विल्यमसन आणि इऑन मॉर्गन या उभय कर्णधारांनी (आणि त्यांच्या संघातील बहुतांश खेळाडूंनीही) अगदी कूऽल कूऽऽल म्हणजे काय, याचे प्रदर्शन घडवले त्यांवरून कितीजण बोध घेतात हे पाहायचे. कोणत्याही प्रकारचा त्रागा न करता ज्याप्रकारे विल्यमसन पत्रकार परिषदेत बोलत होता ते पाहून सर्वांनाच थक्क व्हायला झाले. तो भावनाविवश झाला असेलही, पण त्याने त्यांचे प्रदर्शन कुठेही केले नाही. तो शांतपणे सार्‍या प्रश्नांची उत्तरे देत होता. खेळाडूंनी आणि त्यांच्या चाहत्यांनीही असा शांतपणा, असा संयम बाळगणे आवश्यक आहे! मॉर्गननेदेखील शांतपणे सांगितले की, नियम काही आम्ही केलेले नाहीत. अर्थातच न्यूझीलंडला पराभूत केले जावे याची हळहळ त्यालाही जाणवत असावी! केन विल्यमसन म्हणाला, जे काही झाले ते लाजिरवाणे होते. भविष्यात सामना अशा अगदी निर्णायक अवस्थेत असेल, तेव्हा तरी अशी चूक होऊ नये! त्याच्याशी सारेच महमत होतील. केवळ न्यूझीलंडच्या निशॅमने आपले दुःख बोलून दाखवले. पण तेही सामन्याच्या निकालावर टिप्पणी न करता.

आता पंचांच्या निर्णयांबाबत. डीआरएस मागण्याचा हक्क संपल्यामुळे न्यूझीलंडच्या रॉड टेलरला पंचांनी चुकीने पायचीत दिले हे कळल्यानंतरही तो निर्णय मात्र कायमच राहिला. ज्यावेळी ओव्हरथ्रोवर सहा धावा देण्यात आल्या त्यावेळीही पंचांनी नियमांकडे दुर्लक्ष केले किंवा त्यांच्याकडून ते झाले. त्यावेळी दोन्ही खेळाडूंनी दुसरी धाव घेताना एकमेकांना ओलांडले नव्हते व त्यामुळे त्यावेळी पाचच धावा द्यायला हव्या होत्या असे सायमन टॉफेल यांच्यासारख्या अनुभवी आणि श्रेष्ठ पंच असल्याचे पारितोषिक मिळवणारे सायमन टॉफेल यांचे मत आहे. मात्र त्यांनी पुढे म्हटले आहे की, जे घडले त्याची झळ न्यूझीलंडला पोहोचली हे खरे. पण याबाबतीत इंग्लंड, न्यूझीलंड व पंचांचाही थेट सहभाग आहे, असे म्हणता येणार नाही.

खरे तर क्षेत्ररक्षक गुप्तिलचा थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून नंतर सीमापार गेला होता, त्यामुळे बॅटला लागल्यानंतर तो चेंडू डेड ठरवायलाही हरकत नव्हती. त्यामुळेतर इंग्लंडला केवळ एकच धाव मिळाली असती. पण तसे काही घडले नाही. त्यामुळेच या प्रसंगाचे माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने तर डायगो मॅराडोनाच्या महॅन्ड ऑफ गोल्डय प्रमाणेच हा (स्टोक्स) मबॅट ऑफ गोल्डय म्हणावे, असा प्रकार झाला म्हणायचे! अशी टिप्पणी केली. (ती अगदी सार्थ म्हणावी अशीच आहे. कारण नंतर स्टोक्सही म्हणाला की नकळत झालेल्या या प्रकारबद्दल मी जन्मभर विल्यमसनची माफी मागेन. तो मूळचा न्यूझीलंडचा. म्हणून तर त्याला असे वाटले नसेल? मॉर्गनने मात्र त्या थ्रोला स्टेक्सने दिशा दिली, की यष्टीरक्षकाने ते पाहू शकलो नाही, असे म्हटले होते. अर्थात एकंदरीत सर्वांनीच पंच हेदेखील माणूसच आहेत, असे म्हणून सायमन टॉफेल यांनी यावर पडदा पाडला, हेही खिलाडूवृत्तीला साजेसेच झाले.

या सार्‍यानंतर जर तर च्या काही बाबी, नाही म्हटले तरी मनात येतातच. निर्णाय पाचव्या सेटमध्ये जोकोविचची सर्व्हिस भेदण्याची संधी फेडररने गमावली नसती तर .. टेलरला पायचीत ठरवण्याची चूक पंचांनी केली नसती तर .. बोल्टने सीमारेषेवर झेल घेताना दुर्लक्ष होऊन पाय सीमारेषेबाहेर जात असताना चेंडू उंच फेकून पुन्हा आत येऊन झेल घेतला असता तर? सुपरओव्हरमधील आर्थरचा पहिलाच चेंडू वाईड झाला नसता तर .. असे कलाटणी देणारे क्षण आणखीही दाखवता येतील. पण होणारे न चुके । जरि येई ब्रह्मा तया आडवा! म्हणजे कुणीही कितीही अडथळा आणला, तरी जे व्हायचे ते होतच असते, असे म्हटले जातेच ना! मग नसती काळजी करायची कशाला.. आता आपण त्या सामन्यांमधला थरार आठवून, केवळ त्यातील रंजकता अनुभवायची … कारण यापुढे कधी अशा अटीतटीच्या लढती पुन्हा पाहायला मिळतील, आणि त्याही एकाच दिवशी अशी शक्यता फारच कमी दिसते. खरे ना?

– आ. श्री. केतकर

First Published on: July 21, 2019 4:30 AM
Exit mobile version