Dilip Kumar Death: विक्रमादित्य दिलीप कुमार!

Dilip Kumar Death: विक्रमादित्य दिलीप कुमार!

दिलीप कुमार यांचे पार्थिव रुग्णालयातून आणले घरी ,संध्याकाळी 5 वाजता करणार अंत्यसंस्कार

ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचे आज सकाळी 7.30वाजता निधन झाले असून ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. दिलीपकुमार यांच्या निधनाने बॉलिवूडसह जगभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, बॉलिवूड विश्वात 50 च्या दशकात जणू एकमेव हिरो असलेल्या ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांच्या मुगल-ए-आझमनं इतिहास घडवला.

50 च्या दशकातला एकमेव हिरो

1950 ते 60 च्या दशकात जोगन, बाबुल, हलचल, दीदार, तराना, दाग, संगदील, शिकस्त, अमर, उडन खटोला, इन्सानियत असे किती तरी गाजलेले चित्रपट दिलीपकुमारांनी दिले. 1985 च्या दाग चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. देवआनंद यांच्यासोबतचा देवदासही याच दशकातला होता. नया दौर, मधुमती, यहुदी, पैगाम असे कित्येक यशस्वी चित्रपट दिलीपकुमारांनी दिली. ट्रॅजेडी किंग असा बहुमानही त्यांना याच दशकात मिळाला. पण हा बहुमान धोकादायक ठरता ठरता राहिला. अनेक शोककारी पात्रांमध्ये खोल शिरण्याच्या खटाटोपात दिलीपकुमार स्वतःच डिप्रेशनची शिकार झाले. मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर त्यांनी हलकेफुलके चित्रपट करायला सुरुवात केली. 1952 मधल्या आनमध्ये त्यांनी विनोदी भूमिका केली. या चित्रपटाचा प्रिमियर लंडनमध्येही आयोजित केला गेला होता. आझादमधली चोराची भूमिका, रोमँटिक कोहिनूरमधली राजपुत्राची भूमिका चाहत्यांच्या मनात घर करुन राहिली.

1955 ते 59 दरम्यान ते झपाटल्यासारखं चित्रपटात काम करत राहिले. अभिनय फुलत गेला. डायलॉगवर लोकांच्या टाळ्या आणि शिट्या पडत गेल्या. गाणी अभिनयासकट लोकांच्या मनात बसत गेली..या दशकात सर्वाधिक गल्ला जमवणाऱ्या टॉप 30 चित्रपटांमध्ये 9 चित्रपट तर दिलीपकुमारांचेच होते. दिलीपकुमार त्यावेळी एका चित्रपटासाठी 1 लाख रुपये घ्यायचे. म्हणजे सध्याचे रुपयाचे मूल्यमापन लक्षात घेतले तर ते 1 कोटी रुपयांवर जाते.

मुगल-ए-आझमनं इतिहास घडवला

वैजयंतीमाला, मधुमाला, नर्गिस, मीनाकुमारी, निम्मी, कामिनी कौशल अशा त्यावेळच्या आघाडीच्या आणि सुपरहिट अभिनेत्रींबरोबर दिलीपकुमारांची पडद्यासह सहज चपखल जोडी जमत गेली. 1960 साली आलेला मुगल-ए-आझमनं तर इतिहास रचला. सर्वाधिक महागडा चित्रपट तर होताच पण तो इतका यशस्वी ठरला की 11 वर्षे सर्वाधिक पैसा कमावणारा चित्रपट राहिला. 2004 ला रंगीत मुगल-ए-आझम आला होता, म्हणजे त्याची जादू दिलीपकुमार चित्रपटसृष्टीतून बाहेर पडल्यावरही कायम होती. 2011 च्या मूल्यमापनानुसार चित्रपटाचा गल्ला 1 हजार कोटींचा होता. राजपुत्र सलीम आणि त्याच्या तोंडचे संवाद अजूनही लोकांच्या तोंडी राहावे असेच आहेत. 1971 ला आलेल्या राजेश खन्नांच्या हाथी मेरे साथी आणि 1975 च्या शोलेनंच मुगल-ए-आझमचे विक्रम मोडले.

दिलीपकुमार यांना 1961 ला चित्रपट निर्माता होण्याची हुक्की आली होती. त्यांनी वैजयंतीमालाला घेऊन गंगा जमुना चित्रपटाची निर्मिती केली. पण निर्मितीचं वेड याच चित्रपटाबरोबर संपलं. ब्रिटीश दिग्दर्शक डेव्हिड लीन यांनी लॉरेन्स ऑफ अरेबिया या इंग्रजी चित्रपटाची दिलीपकुमार यांना ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली. ब्रिटीश अभिनेत्री एलिझाबेथ टेलरसोबतही ताजमहाल चित्रपटासाठी त्यांना ऑफर होती. पण हा चित्रपटच रद्द झाला. एकूणच परदेशी दिग्दर्शकांनाही दिलीपकुमारांच्या अभिनयानं मोहित केलं होतं..


Dilip Kumar Death: असा होता ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांचा बॉलिवूडमधील प्रवास

First Published on: July 7, 2021 10:06 AM
Exit mobile version