IPL 2020 : क्रिकेटप्रेमाला बेटिंगचा बट्टा; पोलिसांकडून अटकसत्र सुरूच!

IPL 2020 : क्रिकेटप्रेमाला बेटिंगचा बट्टा; पोलिसांकडून अटकसत्र सुरूच!

प्रातिनिधीक फोटो

गेल्या महिन्याभरापासून IPL 2020 चा ज्वर भारतात पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रचंड नैराश्यपूर्ण वातावरणात आयपीएलमुळे लोकांचं मन कोरोनावरून हटवण्यासाठी एक चांगलं कारण मिळाल्याचं बोललं जात आहे. मात्र, असं असताना दुसरीकडे दरवर्षीप्रमाणे आयपीएल सट्टेबाजांचंही फावलं आहे. गेल्या महिन्याभरात पोलिसांनी धाडी टाकून अनेक सट्टेबाजांना अटक केली आहे. देशभरात असे सट्टेबाज सापडत आहेत. त्याच प्रकारची एक घटना मुंबईजवळच्या मीरा-भाईंदरमध्ये समोर आली आहे. भाईंदरमधून पोलिसांनी आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱअया दोघांना अटक केली आहे.

भाईंदर पूर्व परिसरात सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा मारला असता दोन व्यक्ती भाईंदर पूर्वच्या जय महल लॉजमध्ये भाड्याने खोली घेऊन तिथून आयपीएलवर सट्टा चालवत असल्याचं दिसून आलं. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांच्या पथकानं शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास जय महल लॉजवर छापा मारला. यामध्ये आयपीएल सट्टा चालवणाऱ्या शैलेंद्रसिंह मालावत आणि सुमित जैन या दोघा सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॉप, एलईडी आणि रोख १ लाख ३ हजार रुपये असा ऐवज सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. लॉजमधली ही खोली घेण्यासाठी भलत्याच व्यक्तीच्या आधार कार्डचा वापर या दुकलीनं केला होता.

First Published on: November 1, 2020 11:33 PM
Exit mobile version