SRH vs DC: हैदराबादच्या गोलंदाजांपुढे दिल्लीची दाणादाण; हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान जिवंत

SRH vs DC: हैदराबादच्या गोलंदाजांपुढे दिल्लीची दाणादाण; हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान जिवंत

हैदराबादने गोलंदाजांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सवर ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. वॉर्नर-साहाची झंझावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने शेवटच्या षटकातील तडाखेबाज खेळी याच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावा करत दिल्लीला २२० धावांचं आव्हान दिलं. हैदराबादच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांना फक्त १३१ धावांपर्यंतच मजल मारता आली. हैदराबादच्या गोलंदाजांपुढे दिल्लीच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. राशिद खानने ७ धावांत ३ बळी पटकावले. या विजयाने हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान कायम आहे. तर दिल्लीच्या संघाची पराभवाची हॅटट्रिक झाली.

वृद्धिमान साहाने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २१९ अशी धावसंख्या उभारली. यंदाच्या मोसमात दोनशेहून अधिक धावसंख्या उभारण्याची ही हैदराबादची केवळ दुसरी वेळ होती. हैदराबादच्या संघाला यंदाच्या मोसमात चांगला खेळ करता आलेला नाही. त्यांनी याआधी ११ पैकी केवळ चार सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा संघ आयपीएलच्या गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहे. दुसरीकडे दिल्लीच्या संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली असून हा संघ १४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

वॉर्नर-साहाची शतकी सलामी

आज दुबईत होत असलेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हैदराबादने यष्टीरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टोला वगळण्याचा मोठा निर्णय घेतला. त्याच्या जागी वृद्धिमान साहाला संधी मिळाली आणि साहाने या संधीचे सोने केले. त्याने कर्णधार डेविड वॉर्नरसोबत ९.४ षटकांतच १०७ धावांची सलामी दिली. वॉर्नरने आक्रमक शैलीत फलंदाजी करत ३४ चेंडूत ६६ धावांची खेळी केल्यावर त्याला अश्विनने बाद केले. साहाने मात्र आपली अप्रतिम फलंदाजी सुरु ठेवत ४५ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावा केल्या. अखेर त्याला एन्रिच नॉर्खियाने माघारी पाठवले. अखेरच्या षटकांत मनीष पांडेने (३१ चेंडूत नाबाद ४४) फटकेबाजी केली. त्यामुळे हैदराबादने २० षटकांत २ बाद २१९ अशी धावसंख्या उभारली.

First Published on: October 27, 2020 11:18 PM
Exit mobile version