आहार भान – दिवाळी स्पेशल: तीन डाळींचे वडे

आहार भान – दिवाळी स्पेशल: तीन डाळींचे वडे

आहार भान - दिवाळी स्पेशल: तीन डाळींचे वडे

म्हणता म्हणता दिवाळी आली. दिवाळी म्हणजे चकल्या, लाडू, करंज्या, चिवडा, शंकरपाळे इ. असा आपला समज असतो. पण महाराष्ट्रात, गोव्यात, कारवार पट्ट्यात इतके अनोखे पदार्थ या काळात होतात की आपण आश्चर्यचकित होतो. निसर्गातील सर्व घटकांना सामावून घेत, सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून, आरोग्यदायी पदार्थ बनवले जातात, आनंदाने सण साजरा केला जातो.

गोव्यात, कारवार पट्ट्यात चकली, लाडू, करंजी हे पदार्थ चवथीला म्हणजे गणेश चतुर्थीला उत्साहात केले जातात. दिवाळीच्या पहिल्या अभ्यंगस्नानानंतर मान असतो तो पोह्यांचा. भाताचे नवीन पीक आलेले असते. पूर्वी घरोघरी त्याचे पोहे बनत असत. पोहे कांडताना त्याचा मंद सुगंध आजूबाजूला दरवळत दिवाळीची वर्दी देत असे. पहाटे नर्कासुराला मारून अभ्यंगस्नान केले की कमीत कमी पाच प्रकारचे पोहे केले जातात. गूळ, ओले खोबरे घालून गोडाशे फोव. हिरवी मिरची, ओले खोबरे घालून तिखाशे फोव, ताकतील, सोलकढीतील, फोडणी दिलेले फोव म्हणजे पोहे. दिवाळीचे आमंत्रण देताना म्हणतात, “फोव कालेलत म्हणजे सर्वजण फराळाला या”.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील काही गावात वेगळीच प्रथा. वसुबारसला तिकडे वाघ बारस म्हणतात. गाय वासराची रांगोळी पाटावर काढतात, पूजा करतात आणि नैवेद्य दाखवतात. नैवेद्य असतो बाजरीची भाकरी, पालेभाजी आणि गवारीची भाजी यांचा. गावातील लोक रानात जावून तांदळाची खीर बनवतात. वाघोबला हाका मारून खिरीचा नैवेद्य दाखवतात. “आमची गाई गुरे खावू नको, आमच्या रानात येऊ नको” अशी प्रार्थना करतात. सणाचे निमित्त साधून केलेले हे वन भोजन किंवा आजच्या भाषेत पिकनिक.

माझे आजोळ पालघर जिल्ह्यातील. माझ्या माहेरी दिवाळीच्या पहिल्या दिवशी मान असतो हळदीच्या पानातली भोपळ्याच्या तहवाळ्यांचा किंवा पातोळ्यांचा. भोपळा खिसून वाफवून घ्यायचा. त्यात गूळ, वेलची पूड घालून जाईल एवढे तांदळाचे पीठ घालायचे. हे मिश्रण १० मिनिटे उकडवून घ्यायचे. हळदीच्या पानात थापून परत १० मिनिटे उकडवायचे. झीरो फॅट, झीरो कोलेस्टेरॉल, चवीष्ट, पथ्याच खाणे.

दिवाळीचे २-३ दिवस झाले की सानथोर मंडळी फराळ खायला कंटाळा करतात. दिवाळीत पाडव्याला माझ्या सासरी तींन डाळींचे वडे करतात. सकाळी सकाळी हे वडे तळताना घमघमाट सुटतो. आमच्याकडे नवीन वर्षाला भेटायला येणाऱ्यांची खास फरमाईश असते या वड्यांची.

या तीन डाळींच्या वड्यांची कृती बघुया. रुग्णांच्या तब्येतीला झेपेल असे काही बदल मी मूळ पाककृतीत केले आहेत.

साहित्य:

कृती:

१. मुगडाळ, मसूर डाळ, उडीद डाळ ३ वेळा धुऊन एकत्र रात्री पाण्यात भिजत घाला. २-३ तास भिजवले तरी चालेल डाळी पटकन भिजतात.

२. सकाळी दगडी खलबत्त्यात किंवा पाट्यावर वाटले तर जास्त चव येते. पण आजकाल ती सोय नाही म्हणून मिक्सर मध्ये वाटावे. पाणी न घालता डाळ वड्या सारखे भरड वाटावे.

३. आले, लसूण, जिरे ठेचून घ्यावे.

४. वाटलेल्या डाळीत आले, लसूण, बारीक कापलेला कडीपत्ता, कोबी, कोथिंबीर, जिरे चवीनुसार मीठ घालावे. चांगले मिक्स करून घ्यावे.

५. कांदा भजी सारखे तेलात तळून घ्यावे.

६. गरम गरम पुदिना चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर खायला द्यावे.

डॉ. ऋजुता पाटील कुशलकर
drrujutak@gmail.com

First Published on: November 16, 2020 2:48 PM
Exit mobile version