आहार भान – मटण/ कोंबडी वडे

आहार भान – मटण/ कोंबडी वडे

आहार भान - मटण/ कोंबडी वडे

नवीन वर्षाचे स्वागत चमचमीत पदार्थाने करुया. मटण/ कोंबडी वडे म्हणजे मटण किंवा चिकन घालून केलेले वडे नाही तर मटण / चिकन बरोबर खायचे वडे. हे वडे तुम्ही काळया वाटण्याचे सांबार किंवा फ्लॉवर मटारची गरम मसाला लावून केलेली रस्सा भाजी बरोबर पण खावू शकता.

आजकाल बाजारात तयार वडे पीठ मिळते. कधी तुमच्याकडे हे पीठ नसेल आणि वडे खायची जबरदस्त इच्छा झाली तर एक सोपा पर्याय तुम्हाला सांगते.

कृती – 

१. पाऊण वाटी उडीद डाळ कढईत खमंग भाजून घ्यावी.

२. मिक्सर मधून वाटून घ्यावी.

३. ज्वारी, तांदूळ पीठ, बेसन वेगवेगळे थोडे भाजून घ्यावे.

४. सर्व पिठे एकत्र करून त्यात धने जिरे पावडर, स्वादानुसार मीठ घालावे व मिक्स करून घ्यावे.

५. एका कढईत थोडे तेल गरम करत ठेवावे. तेल चांगले कडकडीत तापले की चमच्याने थोडे थोडे तेल वरील पिठात घालावे. चांगला चर्र आवाज यायला हवा. असे ४-५ छोटे चमचे तेल सर्व पिठावर घालावे. चमच्याने मिक्स करावे.

६. एका भांड्यात पाणी कोमट करून घ्या. या कोमट पाण्याने पीठ बांधायचे आहे. चपातीच्या पिठा पेक्षा बरेच जास्त सैल पीठ बांधायचे आहे.

७. पीठ बांधून झाल्यावर दुसरे भांडे त्यावर उपडे घालून २-३ तास मटण वड्याचे पीठ बाजूला ठेवा. म्हणजे ते चांगले मुरेल, भिजेल आणि वडे फुगतील, चवीष्ट होतील.

८. मधल्या काळात तुम्ही मटण/ चिकन सगोती किंवा रस्सा भाजी करून घ्या.

९. २-३ तासांनी एका कढईत तळण्यासाठी तेल गरम करत ठेवा.

१०. थोडे थोडे वड्याचे पीठ चांगले मळून घ्या. त्याचे लाडू एवढे गोळे करून केळीच्या पानाला अथवा प्लास्टिक च्या जाड पिशवीवर थोडे तेल लावून वडे थापा. वडे थोडे जाडसर ठेवायचे म्हणजे चांगले फुगतात. पण सर्व बाजूने समान थापायचे.

११. कढईत तेल चांगले तापले की अलगद वडा सोडायचा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तळायचा.

या वड्यांचे वैशिष्ट्य म्हणजे गरम गरम झणझणीत रश्श्या बरोबर तर मस्त लागतातच, पण शिळे झाले की दुसऱ्या दिवशी चहा बरोबर पण भन्नाट लागतात. काही काही पदार्थ मोजून मापून करता येत नाहीत . भरपुरच करायला लागतात. त्यातलाच मटण/ कोंबडी वडे हा प्रकार. जरूर बनवा आणि कसे झाले ते मला जरूर कळवा.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

डॉ. ऋजुता पाटील कुशलकर
drrujutak@gmail.com

First Published on: January 2, 2021 7:00 AM
Exit mobile version