तुलना टाळा, संवाद साधा

तुलना टाळा, संवाद साधा

लहान कुटुंब सुखी कुटुंब अशी म्हण आहे, पण खरेच हे कुटुंब सुखी असल्याचे द्योतक म्हणजे कुटुंबातील लहान सदस्यांचा पालकांशी असलेला सुसंवाद. हम दो हमारे दो नुसार आज शहरांसह गावांमध्येही कुटुंब नियोजन केले जाते. हळुहळू एकत्र कुटुंबपद्धतीचा लोप होत असून, विभक्त कुटुंब पद्धतीचा अवलंब करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे आई-बाबा, आजी-आजोबा, काका-काकू एका छताखाली नांदणारी सर्वच नाती आज दुरावल्याचे चित्र आहे.

कुटुंबातील मोठ्या सदस्यांना या बदलाचा फारसा फरक पडत नसला तरी कुटुंबातील लहान सदस्यांच्या वाढीवर, विकासावर या बदलाचा नक्कीच परिणाम होतो. आई-बाबा आणि त्यांची मुले एवढ्यावरच आज कुटुंबाची व्याख्या सीमित झाली आहे. त्यातही दोघेही कमावते म्हटल्यावर मुलांच्या सर्वांगीण वाढीकडे थोडेफार दुर्लक्षच होते. अशावेळी एकापेक्षा अधिक पाल्य असणार्‍या विभक्त कुटुंबातील पालकांना मुलांच्या संगोपनावेळी विशेष काळजी घ्यावी लागते.

विभक्त कुटुंबात पालक आणि मूल एवढेच सदस्य असल्याने त्यांच्यात नियमित सुसंवाद असणे गरजेचे आहे. अनेकदा लहानसहान कारणांवरून कुटुंबातील मोठ्या मुलाला पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागते किंवा लहानग्यांचा हट्ट पुरविण्यासाठी मोठ्या मुलांची समजूत घालण्याचा मार्ग पालक निवडतात. असे करून वेळ निभावून नेल्याची भावना जरी पालकांमध्ये निर्माण होत असली तरी यामुळे नकळत आपण मुलांमध्ये भेदभाव तर करत नाही ना? किंवा आपल्या या कृतीचा पाल्यांवर काय परिणाम होईल? याबाबत पालकांनी विचार करणे गरजेचे आहे.

लहान, विभक्त कुटुंबांमध्ये एकापेक्षा अधिक पाल्य असल्यास मुलांमध्ये पालकांच्या मुलांप्रती वागणुकीमुळे विविध उलटसुलट प्रश्न निर्माण होऊ शकतात. अनेकदा कुटुंबातील खोडकर, हट्टी मुलांची समजूत काढताना पालक आपल्या दुसर्‍या मुलांची समजूत काढतात. त्यांचा हा मार्ग काही प्रमाणात योग्य असला तरी त्यामुळे दुसर्‍या पाल्याच्या मनात पालकांच्या या वागणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन, आई-बाबांना माझ्यापेक्षा तोच (खोडकर, हट्टी मुले) जास्त प्रिय असल्याची भावना निर्माण होते. पालकांच्या सततच्या या वागणुकीमुळे पालकांचा मुलांशी असलेला सुसंवाद खुंटतो.

कुटुंबातील मुलांची एकमेकांशी तुलना केल्यानेही मुलांमध्ये आत्मसन्मान दुखावला जाण्याची शक्यता असते. तसेच पालकांच्या या तुलनेमुळे पालक आणि मुलांमधील संवाद तुटून, कालांतराने भावंडांमधील नातेही दुरावले जाऊ शकते. त्यामुळे विशेष करून विभक्त कुटुंबातील पालकांनी मुलांचे संगोपन करताना तुलना टाळून, त्यांच्याशी संवाद साधावा. त्यामुळे मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण न होता, लहान सुखी कुटुंबाचा आनंद कुटुंबातील प्रत्येकाला अनुभवता येईल.

First Published on: April 21, 2019 4:16 AM
Exit mobile version