जुन्या चवीचे मेरवान

जुन्या चवीचे मेरवान

Brun maska cake

शनिवारी खूप वर्षांनी ग्रॅण्ट रोडच्या स्टेशनबाहेरच्या मेरवान कॅफेत गेलो. तेथे पाऊल ठेवताच कॉलेजच्या आठवणी जागा झाल्या. १९८८ ते १९९१ या काळात मी विल्सन कॉलेजमध्ये होतो. मध्य मुंबई, उपनगरात रहाणारे आम्ही मित्र गॅण्ट रोडला उतरायचो. स्टेशनला उतरल्यावर मेरवान ठरलेले असायचे. आता शिरल्याबरोबर डाव्या बाजूच्या कोपर्‍यात आम्हा मित्रांचा ढेरा जमायचा. गप्पा, चहा आणि ब्रून मस्का असा नाश्ता झाला की, कॉलेजचा रस्ता पकडायचा. खिशात जरा जास्त पैसे असले तर मग खास मेरवान केक, आम्लेट पाव, मावा समोसा, पॅटीस आणि सोबत ड्युक्सचे सोडालेमन. असा बेत व्हायचा. पण त्याहीपेक्षा गल्ल्यावरचा पारसी कितीही वेळ तेथे बसले तरी हटकायचा नाही याचेच अप्रूप होते.

कधीकधी तर दोन-तीन तास गप्पांचा फड जमायचा. परवा मेरवानमध्ये शिरलो तेव्हा या सर्व आठवणी जाग्या झाल्या. मात्र यावेळी गप्पांसाठी कॉलेजचे मित्र मात्र सोबत नव्हते. मेरवानमध्ये खूप बदल झाले होते. मुख्य म्हणजे गल्ल्यावरचे म्हातारे पारसी बाबा नव्हते. सर्व वेटरही नवीन होते. टेबल-खुर्चा त्याच असल्या तरी हॉटेल खूप जुने झाले असल्यामुळे एकप्रकारची अवकाळा आली होती. नेहमीप्रमाणे चहा आणि ब्रून मस्का मागवला. चहाचा पहिला घोट आणि ब्रून मस्काचा बाईटने मात्र पुन्हा जुनी चव चाळवली. मेरवान बदलले असले तरी त्यात मिळणार्‍या पदार्थांची चव काही कमी झालेली नव्हती. केक, मावा समोसा, पॅटीस, पुडींग ट्राय केले, तर तेही त्याच चवीचे. कुठही आपण नवीन काही पदार्थ खातोय हे जाणवले नाही.

सध्या ड्युक्सचे लेमन कुठेही मिळत नाही. त्यामुळे वेटरला विचारले सोडा लेमन मिलेगा क्या? तर तो चक्क हो म्हणाला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. काही वेळात त्याने ड्युक्सचा सोडालेमन समोर आणून ठेवला. सोड्यात मिसळून लेमन जो प्यायला आहे त्यालाच त्याची चव माहित असणार. ती चव सुमारे दोन दशकांच्या अंतराने घेत होतो. उरलेले पदार्थ तसेच पॅक करून घरी घेऊन गेलो. बिलही खूप झाले पण त्यांनी जागवलेल्या आठवणींपुढे ते काहीच नव्हते. गॅण्ट रोड स्टेशनच्या पुर्वेला असलेले मेरवान कॅफे म्हणजे गप्पीष्टांचा अड्डा. पण त्यामुळे ते नावारुपाला आले नाही तर त्यात मिळणार्‍या पाणीकम चाय आणि इतर पदार्थांमुळेच मेरवान फेमस झाले.

आता जागोजागी मेरवान आहे. पण ग्रॅण्ट रोडच्या मेरवान कॅफेची त्याला सर नाही. खास मेरवानचा फेमस केक आणि इतर पदार्थ खाण्यासाठी तेथे जायलाच हवे. पण कॅफे मेरवानमध्ये जाताना एका गोष्टी काळजी घ्यायला हवी ती म्हणजे येथील केक आणि ब्रून हे खूपच प्रसिद्ध असल्यामुळे ते लगेच संपतात. ते पुन्हा तयार होतात पण त्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे मेरवानमध्ये शिरल्याबरोबर जर तुम्हाला हे दोन पदार्थ मिळाले तर आपण भाग्यवान आहोत, असे समजाला काहीच हरकत नाही.

First Published on: December 24, 2018 5:19 AM
Exit mobile version