गरोदरपणातील ‘हायपरटेन्शन’

गरोदरपणातील ‘हायपरटेन्शन’

जन्माला येण्यापूर्वी बाळाची सोशल मीडियावर विक्री!

गरोदरपणातील काळ हा स्त्रीच्या आयुष्यातील आनंददायी काळ असायला हवा. मात्र, काही वेळा काही गरोदर महिलांमध्ये हायपरटेन्शन (रक्तदाब वाढणे) सोबतच हातांना आणि पायांना सूज (शरीर पाणी साठवून ठेवत असल्याने) आणि मूत्रात प्रोटीन जमा होणे, अशा समस्या उद्भवू शकतात. याला प्री-एक्ल्मप्शिया म्हणतात. प्री-एक्ल्मप्शियाचे वेळेत निदान न झाल्यास त्यातून माता आणि बाळासाठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यातून मातेमध्ये एक्ल्मप्शिया (गंभीर स्थिती) आणि ‘हेल्प’ (एचईएलएलपी-हेमोलायसिस, यकृतातील एन्झाइम्स वाढणे, प्लेटलेट्स कमी होणे) ही स्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यातून मूत्रपिंडाचे कधीही भरून न निघणारे नुकसान होऊ शकते.

हायपरटेन्शनचे वेळात निदान होणे गरजेचे

रक्तदाब वाढणे हे प्री-एक्ल्मप्शियाचे पहिले लक्षण असू शकते. त्यामुळे, हायपरटेन्शनचे वेळात निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे सुरू करणे. वैद्यकीय चाचण्या, बाळाच्या हालचालींचे मोजमाप, सोनोग्राफी आणि डॉपलरच्या माध्यमातून माता आणि गर्भाशयातील बाळावर देखरेख ठेवणेही महत्त्वाचे आहे. देखभालीच्या यापैकी कोणत्याही पद्धतीतून मातेला किंवा बाळाला धोका असल्याचे निदान होत असल्यास डिलिव्हरी करावी लागते. त्यामुळेच, गरोदरपणात प्रीएक्ल्मप्शिया असलेल्या मातांची पूर्ण दिवस भरण्याआधीच ठरवून डिलिव्हरी केली जाते.

५ टक्के गरोदर महिलांमध्ये उच्च रक्तदाब

बऱ्याचदा गरोदर महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रश्न पडतो की सर्व प्रकारे उत्तम काळजी घेतल्यानंतरही रक्तदाब का वाढला? खरे तर प्री-एक्ल्मप्शियामागे कोणतेही एक ठोस कारण नाही. मात्र, गर्भाच्या वारेत किंवा गर्भवेष्टनात पुरेशा रक्तवाहिन्या तयार न होणे हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे पाहण्यात आले आहेत. शिवाय, बऱ्याचदा नंतरच्या गरोदरपणाच्या तुलनेत पहिल्या गरोदरपणातच प्रीएक्ल्मेप्शियाचा त्रास होतो. सुमारे ५ टक्के गरोदर महिलांमध्ये उच्च रक्तदाब आढळतो आणि यातून गंभीर स्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याने प्रीएक्ल्मप्शिया रोखण्यासाठी गेल्या काही दशकांमध्ये संशोधन करण्यात आले आहे. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कमी मात्रेत अॅस्पिरिनचा डोस दिल्यास (बेबी अॅस्पिरिन) प्रीएक्ल्मप्शिया होण्याची शक्यता कमी होते, असे निदर्शनास आले आहे. डॉपलर सोनोग्राफीसारख्या स्क्रीनिंग पद्धती आणि गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यात काही एन्झाइम्ससाठी रक्तचाचणी केल्यासही संबंधित महिलेला प्रीएक्ल्मप्शिया होण्याची शक्यता आहे का, याचा अंदाज बांधता येतो.

वैद्यकीय उपचारांमधील आधुनिकता हा एक मोठा लाभ आहे आणि या प्रकारच्या आजारांचे नियंत्रण आणि ते उद्भवू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यात येत आहे. त्यामुळे, माता आणि तिच्या गर्भातील बाळाच्या जीवाला धोका ठरणाऱ्या अशा आजारांपासून त्यांना वाचवता येईल.

डॉ. राजेश्वरी पवार, कन्सलटंट, ओब्स्टेट्रिक्स अॅण्ड गायनॅकोलॉजी (प्रसुतीशास्त्र आणि स्त्रीरोग), मदरहूड हॉस्पिटल्स, खराडी, पुणे

First Published on: May 20, 2019 7:30 AM
Exit mobile version