कोबीची भाजी उरली असेल आणि परत ती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर ती गॅसवर परतून घेऊन त्यात डाळीचं पिठ १-२ चमचे घालून परतून घ्या आणि नेहमीप्रमाणे कणिक मळून कणकेत हे सारण स्टफ करून कोबीचे स्टफ्ड पराठे बनवा.
कोणत्याही पाककृतीत पनीर वापरायचे असल्यास, पनीरचे क्यूब्ज करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्ज १०-१५ मिनिटे ठेवा. मग एका चाळणीत ५ मिनिटे पनीर निथळत ठेवा. आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डीशमध्ये वापरण्यासाठी तयार.
कोणताही पुलाव, जिरा राइस किंवा स्पेशल भात जर डायरेक्ट स्टीलच्या कुकरमध्ये करणार असाल तेव्हा, तांदळाच्या दीडपट पाणी घालावे आणि २ शिट्ट्या कराव्यात. भात मोकळा आणि फडफडीत होतो.
गरमागरम इडली, इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे. यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात.
काही भाज्या, उसळी किंवा भात करताना तयार मसाले फोडणीत टाकले की चांगला स्वाद येतो. अशावेळी हे मसाले डायरेक्ट फोडणीत टाकले तर ते करपतात. त्याऐवजी १ चमचाभर तेलात थोडा मसाला (पूड) घालून मग ते तेल फोडणीमध्ये घातले तर मसाले करपत नाहीत आणि मसाल्याचा स्वादही पदार्थात चांगला उतरतो.