ठाण्याच्या ग्रामीण भागातील ० ते १८ वर्षीय बालकांची होणार संपूर्ण आरोग्य तपासणी

ठाण्याच्या ग्रामीण भागातील ० ते १८ वर्षीय बालकांची होणार संपूर्ण आरोग्य तपासणी

जोपर्यंत दुखत खुपत नाही तोपर्यंत एखाद्या पालकांना आपल्या बालकाला काय होते हे समजत नाही. मात्र आता त्या बालकांची ‘जागरूक पालक सुदृढ बालक’ उपक्रमांतर्गत शिंदे सरकार काळजी घेणार आहे. या उपक्रमाचा श्रीगणेशा येत्या गुरूवारी ९ फेब्रुवारी राज्यभरातील ३५० ठिकाणी होणार आहे. या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमधील ० ते १८ वर्षीय बालकांच्या डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत ची तपासणी (बॉडी चेकअप) केली जाणार आहे. ही तपासणी शाळा, महाविद्यालय, शाळाबाह्य, अंगणवाडी,बालवाडी तसेच अंगणवाडीबाह्य अशा ठिकाणी असलेल्या एकूण ४ लाख ९३ हजार ८३४ बालकांची केली जाणार आहे. यामध्ये ६ ते १८ वर्षीय बालकांची संख्या ही ३ लाख ३८ हजार १३४ इतकी आहे. तर ० ते ६ वर्षीय बालकांच्या १ लाख ५५ हजार ७०० मध्ये मुलींची संख्या जास्त आहे.

या उपक्रमांतर्गत तपासणीचा सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार विविध स्तरावर प्रथम, द्वितीय स्तर पथके व “बाल आरोग्य तपासणी पथक तयार केले असून प्रत्येक तपासणी पथकाला दिवसभरात किमान १५० विद्यार्थ्यांची तपासणीचे नियोजन केले आहे. आरबीएसके पथकांमार्फत त्यांच्या नियोजनातील तपासणी करण्यात येणाऱ्या शाळा व अंगणवाडी वगळून कार्यक्षेत्रातील इतर सर्व उर्वरित शाळा व अंगणवाडीच्या तपासणीचे गठित “बाल आरोग्य तपासणी पथकाने नियोजन केले आहे. तसेच जिल्ह्यातील अंध- दिव्यांग शाळा, बालगृहे, अनाथ आश्रम, समाज कल्याण व आदिवासी विभाग वस्तीगृहे (मुले/मुली) यातील विद्यार्थ्यांची तपासणी आरबीएसके पथकामार्फत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात चार जणांचे एकूण १७५ पथके कार्यान्वित असणार आहेत. त्यांच्यामार्फत जिल्ह्यातील ४ लाख ९३ हजार ८३४ बालकांची डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत सविस्तर तपासणी करण्यात येणार आहे. याचबरोबर वजन व उंची घेवून SAM/MAM/BMI (६ वर्षावरील बालकांमध्ये) काढणे करणे.

आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे BP व तापमान मोजणे व गरजू विद्यार्थ्यांना त्वरित उपचार केले जाणार आहे. याशिवाय नवजात बालकांमधील जन्मजात व्यंग ओळखणे. रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सी ई. आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखणे तसेच, ऑटीझम, विकासात्मक विलंब (Developmental Delay), Learning Disability, ई. च्या संशयित रुग्णांचा शोधून त्वरित डीईआयसी केली जाणार आहे. तर किशोरवयीन मुला-मुलींमधील शारीरिक/ मानसिक आजार शोधून त्यांना आवश्यकतेनुसार उपचार केले जातील असेही सांगण्यात आले आहे.

” हा उपक्रम शासनाचा आहे. या उपक्रमांतर्गत ज्या ठिकाणी बालके असतात, तेथे जाऊन तपासणी केली जाणार आहेत. या तपासणीत कोणाला ही आजार असल्यास त्याच्यावरील उपचार हे शासनाच्या विविध योजनेनुसार किंवा शासनाशी संलग्न असणाऱ्या खासगी रुग्णालयात वेळप्रसंगी तेही मोफत केले जातील. उपक्रमांतर्गत सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. हा उपक्रम आठ आठवडे राबविला जाणार आहे. “- डॉ कैलाश पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे.

First Published on: February 5, 2023 10:14 PM
Exit mobile version