दहावी, बारावीची लेखी परीक्षा परीक्षा केंद्रांवरच प्रत्यक्ष होणार

दहावी, बारावीची लेखी परीक्षा परीक्षा केंद्रांवरच प्रत्यक्ष होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. कारण ऑनलाईन परीक्षा घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातर्फे दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या आढावा बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान या परीक्षा ऑफलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या परीक्षा ऑनलाईन होणार नाही, असे स्पष्ट दिसत आहे.

दहावी, बारावीची परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे. राज्यात सध्या दहावीचे 16 लाख, तर बारावीचे 14 लाख विद्यार्थी आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

कोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

First Published on: February 23, 2021 4:50 AM
Exit mobile version