खळबळ! पालघर लिंचिंगमधील ११ आरोपींना कोरोना

खळबळ! पालघर लिंचिंगमधील ११ आरोपींना कोरोना

कोरोना विषाणू

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालघर झुंडबळी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. या आरोपींची कोरोना तपासणी केली असता. ११ आरोपींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सारेच हादरले आहेत. दरम्यान, या सर्वांची कोरोना चाचणी अहवाल आल्यानंतर वाडा पोलीस ठाणे आणि बाजूला असलेले तहसीलदार कार्यालय दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पोलिसांच्याही करण्यात आल्या चाचण्या

या अकरा आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांची देखील कोरोना चाचणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच खबरदारी म्हणून वाडा पोलीस ठाणे दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाडा भागात सापडलेला पहिला कोरोना रुग्ण

पालघर झुंडबळी प्रकरणातील एका आरोपीचा कोरोना चाचणी अहवाल २ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. वाडा भागात सापडलेला हा कोरोनाचा पहिला रुग्ण ठरला होता. मात्र, आता त्यात आणखी ११ जणांची भर पडली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यासह आजूबाजुचा परिसर हादरुन गेला आहे.

काय आहे प्रकरण?

पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात झुंडबळीचा धक्कादायक प्रकार घडला होता. दोन साधू आणि त्यांच्यासोबत असलेल्या वाहनचालकांवर चोर समजून जमावाने हल्ला केला होता. त्यात या तिघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याप्रकरणी शंभरहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा – बिबट्याचा पाच वर्षाच्या मुलीवर हल्ला; बाभळेश्वर येथील घटना


 

First Published on: June 16, 2020 9:15 PM
Exit mobile version