मोबाईल अ‍ॅपशिवायच अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात!

मोबाईल अ‍ॅपशिवायच अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सोपी, सुलभ व पूर्णपणे ऑनलाईन व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात येणार जाहीर करण्यात आले होते. मात्र १ ऑगस्टला अकरावी प्रवेश प्रक्रियेला शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ झाल्यानंतरही हे मोबाईल अ‍ॅप विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून मोबाईल अ‍ॅप कधी उपलब्ध होणार अशी विचारणा करण्यात येत आहे.

अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला शनिवारपासून सुरुवात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. प्रवेश अर्ज भरल्यानंतर कागदपत्रे सादर करणे व शुल्क जमा करण्याची प्रक्रियाही यंदा ऑनलाईनच करण्यात येणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेचा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला शनिवारपासून सुरुवात करण्यात आली. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे धोकादायक असल्याने तसेच अनेक विद्यार्थी हे गावाकडे असल्याने त्यांना संगणक उपलब्ध होऊ शकत नाही. तर अनेकांना सायबरमध्ये किंवा शाळेमध्ये जाणे शक्य होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात येणार्‍या अडचणी लक्षात घेऊन त्यांना मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्यावर मोबाईल अ‍ॅप उपलब्ध होईल अशी आशा विद्यार्थी व पालकांना होती. परंतु शनिवारी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केल्यानंतर मोबाईल अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले नाही. विद्यार्थ्यांना स्मार्टफोनवरू अर्ज भरणे सोईस्कर ठरणारे असल्याने विद्यार्थी व पालकांकडून अ‍ॅप कधी उपलब्ध होईल अशी विचारणा करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकार्‍याने दिली.

काही तांत्रिक अडचणी

दरम्यान, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असली तरी मोबाईल अ‍ॅपसाठीचे प्ले स्टोरवर आवश्यक असलेले रजिस्ट्रेशन अद्यापही शिक्षण विभागाकडून झाले नाही. तसेच काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे अ‍ॅप सुरू करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

First Published on: August 1, 2020 10:25 PM
Exit mobile version