Sanjay Raut : कांदा निर्यातीच्या मुद्द्यावरून राऊतांचा केंद्रावर निशाणा, म्हणाले…

Sanjay Raut : कांदा निर्यातीच्या मुद्द्यावरून राऊतांचा केंद्रावर निशाणा, म्हणाले…

कांदा निर्यातीच्या मुद्द्यावरून राऊतांचा केंद्रावर निशाणा

मुंबई : देशभरात कांदा निर्यात बंदी असतानाच केंद्राने गुजरातमधून तब्बल दोन हजार मेट्रीक टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला मंजूर दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याच कांदा निर्यातीवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला खडेबोल सुनावले आहेत. गुजरातमधील शेतकरी मालामाल झाला पाहिजे, पण महाराष्ट्रातील शेतकरी मेला पाहिजे, अशी मोदींची भूमिका असल्याचा आरोप राऊतांकडून करण्यात आला आहे. (Sanjay Raut targets Central government over the issue of Onion export)

शनिवारी (ता. 27 एप्रिल) प्रसार माध्यमांसमोर खासदार संजय राऊत म्हणाले की, दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा कांदा मुंबईच्याच न्हावा-शिवा पोर्टस् वरून परदेशात जाणार आहे. ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्राचा कांदा हा सडत आहे, त्याला भाव नाही. येथे तुम्ही निर्यातबंदी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार तर लगेच बंदी केली. पण गुजरातचा पांढरा कांदा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रिय आहे, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा… Sanjay Raut : छत्रपती शाहूंच्या पराभवासाठी पंतप्रधान कोल्हापुरात, राऊतांचा भाजपावर हल्ला

तर, केंद्राने गुजरातच्या कांदा उत्पादकांसाठी घेतलेल्या कांदा निर्यातीच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत आहे. पण, गुजरातचा कांदा हा मोदींना प्रिय पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी हे केवळ गुजरातचे पंतप्रधान आहेत, ते देशाचे पंतप्रधान नाही. त्यामुळे त्यांच्याकडून हा भेदभाव करत आहे, असे टीकास्त्र खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर डागले आहे.

शेतकऱ्यांना दोन हजार एकर जमीन द्या…

शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून ठाकरेंना पचनी पडत नाही, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रचार सभेत वारंवार करण्यात येत आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. “कोण शेतकऱ्याचा मुलगा? महाराष्ट्रातल्या साडेआठ कोटी शेतकऱ्यांना या शेतकऱ्याच्या मुलाप्रमाणे दोन हजार एकर जमीन द्या आणि शेतात उतरण्यासाठी पाच हेलिकॉप्टर द्या असे माझं देवेंद्र फडणवीसांना आवाहन आहे,” असे प्रत्युत्तर खासदार राऊतांकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा… Maharashtra Congress : इथून पुढे काँग्रेसचा प्रचार नाही, नसीम खान यांची उघड नाराजी


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 27, 2024 1:57 PM
Exit mobile version