शिंदेंच्या गटाला सेनेच्या 12 खासदारांचा पाठिंबा?, उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार

शिंदेंच्या गटाला सेनेच्या 12 खासदारांचा पाठिंबा?, उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार

मुंबईः राज्यात सध्या शिंदे आणि फडणवीसांचं सरकार असून, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे कमालीचे सक्रिय झालेत. एकनाथ शिंदेंनी ठाणे, पालघर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, बदलापूर, नाशिकमधील बहुसंख्य विद्यमान नगरसेवकांना आपल्या गळाशी लावले आहे. त्यामुळे शिंदेंनी अनेक जिल्ह्यांतील शिवसेना खिळखिळी करण्यास सुरुवात केली आहे.

विशेष म्हणजे नगरसेवकांनंतर शिंदेंनी आता शिवसेनेचे खासदार फोडण्यास सुरुवात केलीय. जवळपास शिवसेनेच्या 39 आमदारांना घेऊन बंड केलेल्या एकनाथ शिंदेंनी आता शिवसेनेचे 12 खासदार आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलं आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीलाही खासदार भावना गवळी आणि खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित नव्हते. तेव्हा शिवसेनेचे खासदारही शिंदे गटाच्या मार्गावर असल्याचं बोललं जात होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची आज मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये एक बैठक झालीय. या बैठकीला शिवसेनेचे जवळपास 12 खासदार उपस्थित होते. शिवसेनेचे लोकसभेत एकूण 18 खासदार आहे, त्यापैकी आता उद्धव ठाकरेंच्या गटात फक्त सहा खासदार राहिलेत. अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, गजानन कीर्तिकर, राजन विचारे, संजय जाधव आणि विनायक राऊत हे उद्धव ठाकरेंबरोबर असल्याचं सांगितलं जातंय. खरं तर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आधीच शिंदे गटात दाखल झाल्यात. शिवसेनेच्या खासदारांनीही उद्धव ठाकरेंवर दबाव टाकत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यास सांगितलेय.

विजय शिवतारेंचाही शिंदे गटाला पाठिंबा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आतापर्यंत 51 आमदार सामील झाले असून, राष्ट्रवादी-काँग्रेसच्या त्रासाला कंटाळून आम्ही फारकत घेतल्याचे अनेक आमदारांनी आतापर्यंत स्पष्ट केलंय. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांनीही शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. महाविकास आघाडीत राहून शिवसेनेचं नुकसान होतंय, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा अन्याय सहनशक्तीच्या पलिकडे गेल्याने आमदारांना फारकत घ्यावी लागली, असंही विजय शिवतारे म्हणालेत.


हेही वाचाः शिंदेंकडून शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, रामदास कदम यांची नेतेपदी पुनर्नियुक्ती

First Published on: July 18, 2022 5:27 PM
Exit mobile version