औरंगाबादमध्ये फ्लिपकार्टवरुन हत्यारांची खरेदी, चौघांना अटक

औरंगाबादमध्ये फ्लिपकार्टवरुन हत्यारांची खरेदी, चौघांना अटक

प्रातिनिधिक फोटो

औरंगाबादमध्ये गुप्ती, तलवार, चाकू आणि धारदार शस्त्र ऑनलाईन खरेदीचा प्रकार घडला आहे. फ्लिपकार्टवरून हत्यारांची खरेदी करणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने ही शस्त्रे मागविणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. औरंगाबाद येथील गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री इस्टाकोर्ट सर्व्हिस या कुरिअर कंपनीच्या नागेश्वरवाडी आणि सिडको क्षेत्रातील गोदामांवर छापा टाकला. यामध्ये पोलिसांनी १२ तलवारी, १३ चाकू, एक गुप्ती, एक कुकरी एवढी हत्यारे जप्त केली.
खेळण्यांच्या नावावर अमृतसरहून ही हत्यारे मागविण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांना सदर पार्सल संशयास्पद वाटल्याने या सहा पार्सल्सचा तपास केला असता त्यामध्ये धारदार हत्यारे असल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी नावेद खान, सागर पाडसवन, चंदू लाखलकर आणि मुकेश पाचवणे यांना पोलिसांनी अटक केली. तर आणखी तीन संशयीत आरोपींचा शोध चालू आहे.
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या हत्यारांची मागणी केली असल्याचा संशय असून, त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. या हत्यारे खरेदी प्रकरणी पोलिसांनी क्रांती चौक आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: May 29, 2018 12:06 PM
Exit mobile version