CoronaVirus: राज्यात कोरोनाचे १४५ नवे रुग्ण, आकडा ६३५वर!

CoronaVirus: राज्यात कोरोनाचे १४५ नवे रुग्ण, आकडा ६३५वर!

राज्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. आज राज्यात कोरोनाचे १४५ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६३५वर पोहोचली आहे. आतापर्यंत ५२ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले असून त्यांनी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे. राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या ३७७वर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या राज्यात भीतीचे वातावरण पसरत आहे. आज राज्यात ६ करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी १ रुग्ण मुंब्रा ठाणे येथील तर १ रुग्ण अमरावती येथील आहे. उर्वरित ४ रुग्ण मुंबई येथील आहेत.

मुंब्रा येथील इलेक्ट्रिशियन असणाऱ्या ५७ वर्षीय पुरुषाचा आज सकाळी केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे आजार होते. काल संध्याकाळी मुंबईच्या नायर रुग्णालयात एका ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तिला फुप्फुसाचा तसेच हृदयविकार होता. मधुमेह असणाऱ्या या महिलेला हायपोथायरॉडिझम हा आजारही होता. तसंच काल सकाळी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात निवृत्त बेस्ट वाहनचालक असणाऱ्या ६७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना १० वर्षापासून मधुमेह होता. ५३ वर्षीय पुरुषाचा काल पहाटे मुंबईच्या के ई एम रुग्णालयात मृत्यू झाला. निवृत्त मिल कामगार असणाऱ्या या रुग्णाने परदेशात प्रवास केलेला नव्हता. ३ एप्रिल रोजी मुंबईच्या के ई एम रुग्णालयात ७० वर्षीय पुरुषाचा संध्याकाळी मृत्यू झाला असून त्याने परदेश प्रवास केलेला नव्हता.

अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात एका ४७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. व्यवसायाने मेकॅनिक असणाऱ्या या व्यक्तीला अस्थमाचा त्रास होता. त्याने कोठेही प्रवास केल्याचा इतिहास नाही. त्यामुळे आज कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३२ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मुंबई ३७७
पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ८२
सांगली २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा ७७
नागपूर, अहमदनगर प्रत्येकी १७
यवतमाळ ४
लातूर ८
बुलढाणा ५
सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद प्रत्येकी ३
कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव प्रत्येकी २
सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, वाशीम, अमरावती, हिंगोली प्रत्येकी १
इतर राज्य – गुजरात १
एक रुग्णाच्या पत्त्याची खातरजमा करण्यात येत आहे.


हेही वाचा – CoronaVirus: मुंबईत गेल्या २४ तासात ५२ नवे रुग्ण, आकडा ३३०वर!


 

First Published on: April 4, 2020 11:32 PM
Exit mobile version