रायगडच्या रिंगणात 16 उमेदवार; 8 जणांची माघार

रायगडच्या रिंगणात 16 उमेदवार; 8 जणांची माघार

politician

रायगड लोकसभा मतदारसंघाचे चित्र अखेर सोमवारी स्पष्ट झाले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 8 जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे प्रत्यक्षात 16 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी वैशाली माने, माहिती अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे उपस्थित होते. 2014 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांचे नामसाधर्म्य असलेला उमेदवार निवडणूक रिंगणात होता. त्याने 9 हजाराहून अधिक मते घेतली. यावेळीही नामसाधर्म्याचा प्रयोग अवलंबिण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्यासह सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे हे दोन अपक्ष उमेदवार आहेत.

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी 28 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. 5 एप्रिल ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. 6 एप्रिलला छाननीत दोन अर्ज बाद झाले. त्यामुळे 26 अर्ज शिल्लक राहिले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी यापैकी 8 जणांनी माघार घेतली. यामध्ये विलास गजानन सावंत (महाराष्ट्र क्रांती सेना), संजय अनंत पाशिलकर (बळीराज पार्टी), अख्तरी जैनुद्दीन चौधरी (अपक्ष), अनिल बबन गायकवाड (अपक्ष), अशोक दाजी जंगले (अपक्ष), रामदास दामोदर कदम (अपक्ष), श्रीनिवास सत्यनारायण मट्टपर्ती (अपक्ष), सचिन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी) यांचा समावेश आहे.

16 उमेदवार प्रत्यक्ष लढविणार निवडणूक
रायगड मतदारसंघात खरी लढत शिवसेनेचे अनंत गीते आणि महाआघाडीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यात होणार असली तरी आणखी 14 उमेदवारांनी आपले भवितव्य आजमाविले आहे. त्यामध्ये नथुराम भगुराम हाते (बहुजन मुक्ती पार्टी ), सुमन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी ), मिलिंद भागुराम साळवी (बहुजन समाज पार्टी ), मधुकर महादेव खामकर (अपक्ष), संदीप पांडुरंग पार्टे ( बहुजन महा पार्टी), सुनील सखाराम तटकरे (अपक्ष), सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), संजय अर्जुन घाग (अपक्ष), गजेंद्र परशुराम तुरबाडकर, (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके (भारतीय किसान पार्टी), अविनाश वसंत पाटील (अपक्ष), सुनील पांडुरंग तटकरे (अपक्ष), योगेश दीपक कदम (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष) यांचा समावेश आहे.

रुग्णवाहिका उपलब्ध
नुकताच हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून रायगड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर रुग्णवाहिका, मेडिकल कीट, वैद्यकीय उपचार यांची सोय केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात 7736 दिव्यांग असून 1220 अंध (क्षीण दृष्टी) आहेत. दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा मतदान केंद्रांवर आहेत. एकंदर 673 व्हील चेअर्सची मागणी असून 300 पेक्षा जास्त व्हील चेअर्स उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

First Published on: April 9, 2019 4:12 AM
Exit mobile version