साताऱ्यात म्युकरमायकोसिसचा वाढला धोका; आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू

साताऱ्यात म्युकरमायकोसिसचा वाढला धोका; आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू

साताऱ्यात म्युकरमायकोसिसचा वाढला धोका; आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाची दुसरी लाट मंदावताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून काही जिल्ह्यांमध्ये कोरोना कहर सुरुच आहे. अशा परिस्थिती म्युकरमायकोसिसने डोकं वर काढले असून साताऱ्यात म्युकरमायकोसिसचा धोका वाढला आहे. साताऱ्यात म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर जास्त असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी आणखीन वाढली आहे. आतापर्यंत साताऱ्यात म्युकरमायकोसिसमुळे १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनानंतर म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारामुळे भयंकर परिस्थिती निर्माण होत आहे. साताऱ्यात गोळ्यांपासून ते इंजेक्शनपर्यंतचा तुटवडा भासत आहे. यातच म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. काल बुधवारी साताऱ्यात १० म्युकरमायकोसिस रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या १३२वर पोहोचली आहे. आतापर्यंत १९ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला असून ३७ जणांनी यावर मात केली आहे. जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर १६ टक्क्यांवर तर कोरोनाचा मृत्यूदर ६.९५ टक्क्यांवर आहे. कोरोना मृत्यूदरापेक्षा ७ पटीने म्युकरमायकोसिसचा मृत्यूदर असल्यामुळे प्रशासनाचे आणखीन टेन्शन वाढले आहे.

साताऱ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव देखील वाढत आहे. २ महिन्यांत कोरोनाबाधितांची संख्या १ लाखांहून अधिक वाढली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा चौथ्या टप्प्यात पोहोचला आहे. कोविड-१९ इंडिया ट्रॅकरनुसार, साताऱ्यात काल ९१५ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ९७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर १ लाख ४३ जण बरे होऊन घरी गेले आहेत. साताऱ्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ८२ हजार ३७६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ हजार २७६ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ७० हजार ५८७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – Weather Update: मुसळधार पावसामुळे रत्नागिरीत दरड कोसळली; पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा


 

First Published on: June 17, 2021 8:50 AM
Exit mobile version