तारापूरमध्ये कारखान्याच्या सांडपाण्यामुळे २० कुत्र्यांचा मृत्यू

तारापूरमध्ये कारखान्याच्या सांडपाण्यामुळे २० कुत्र्यांचा मृत्यू

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांचे सांडपाणी प्रक्रिया करणार्‍या जुन्या 25 एमएलडी सीईटीपीच्या आवारात 20 कुत्रे मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कुत्रे अचानक विव्हळत असल्याचे येथील कामगारांना दिसून आले. कुत्रे एकापाठोपाठ एक मृत्युमुखी पडल्यानंतर येथील व्यवस्थापकाने याबाबत कोणत्याही विभागाला न कळवताच मागील जागेत त्यांना पुरल्याचे उघडकीस आले. यापूर्वी मागील वर्षी टी झोनमध्ये में. लुपिन लि. या कंपनीजवळ पहाटेच्या वेळी सोडण्यात आलेल्या उग्र वासाच्या वायूने शेकडो चिमण्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अधिकार्‍याच्या निष्काळजीपणामुळे काहीच माहिती हाती लागली नाही तसेच कोणावर कारवाईही झाली नाही. तर सहा महिन्यापूर्वीच या परिसरात जवळपास 4 ते 5 म्हैशींचा मृत्यू झाला होता. याच साईटीपीच्या व्यवस्थापकाने म्हैशींच्या मालकांना मोबदला देऊन प्रकरण दाबले होते असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

विशेष म्हणजे गंभीर प्रकरणाची माहिती संबंधित विभागांना व प्रशासनास न देताच सीईटीपीच्या व्यवस्थापकाने मागील बाजूस मृत श्वानांना गाडल्याने या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून कोणतीही प्रक्रिया न करताच पाणी सोडण्यात येत असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

याप्रकरणाची मीहिती तालुका पशु वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी कळवण्यात आले आहे.
– मनिष होळकर, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप विभाग तारापूर.

ही सीईटीपी आमच्या गावाजवळ असल्याने नेहमीच येथून उग्र वास येत असतो. वारंवार यातील प्रदूषित पाणी नैसर्गिक नाल्याच्या मार्गाने परिसरात पसरत असल्याने याचा नेहमीच त्रास सहन करावा लागतो. चार दिवसांपूर्वीच एका गाईचाही मृत्यू झाला होेता. यावर लवकरात लवकर कारवाई केली जावी.
-प्रितम पाटील, ग्रामस्थ

चार ते पाच महिन्यांपूर्वी याच साईटीपीच्या दूषित पाण्यामुळे सालवड गावातील एका शेतकर्‍यांच्या म्हैशींचा मृत्यू झाला होता. वारंवार खाडीतील माशांचाही मृत्यू होत असतो. सीईटीपीच्या या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास 20 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सालवड परिसरातील शेती व प्राण्यांसह मानवी जीवन धोक्यात आले आहे. यावर प्रशासनाने त्वरित कारवाई केली पाहिजे.
– वैदेही वाढाण, जि. प. सदस्या

First Published on: March 3, 2020 2:11 AM
Exit mobile version